बजेट- २

युवा विवेक    27-Aug-2021   
Total Views |

बजेट-
budget_1  H x W

चित्रपटाच्या बजेटचं बरचसं नियंत्रण कार्यकारी निर्मात्याचं (Executive Producer) असतं. तिकीटबारीवर चांगली चलती असलेले कलाकार आपल्या चित्रपटासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यांचं मानधनदेखील तेवढं असतंच. हे मानधन पर डे किंवा एकूण रक्कम किंवा चित्रपटाच्या एकंदरीत प्रॅाफिट शेअरमधला काही भाग असू शकतं. ते किती असावं आणि त्यात किती तडजोड असावी याचे कौशल्यही पूर्णपणे कार्यकारी निर्मात्याचं असतं. चित्रपटासाठी लागणारी इतर तंत्रमंडळी, इतर कलाकार, रहाण्याची आणि खाण्याची सोय, या सगळ्याची माहिती आणि जबाबदारी कार्यकारी निर्माता आणि त्यांची टीम करत असते. कार्यकारी निर्मात्याच्या मदतीला प्रॅाडक्शन मॅनेजर, प्रॅाडक्शन इनचार्ज असतात, जे व्यवहार करू शकतात. या तिघांचा जनसंपर्क आणि तडजोडीचं कौशल्य दांडगं असावं लागतं. सहसा मोठे बॅनर्स किंवा प्रॅाडक्शन हाऊसेस आपला कार्यकारी निर्माता बदलत नाही, पण जर निर्माती नवीन असेल, तर ही तीन माणसं खूप खंबीर लागतात. त्यामुळे चित्रपट महामंडळ किंवा तत्सम संस्थेकडून मानांकन असलेला कार्यकारी-निर्माता असावा.

काही ठिकाणी आलेले अनुभव हेही सांगतात की, कार्यकारी निर्माता आणि निर्मिती सहायक बऱ्याच ठिकाणी टेंडर किंवा ऑर्डर देताना आपलीही पोळी त्यावर भाजून घेतात. आधीच मानधन ठरलेले असताना अश्या प्रकारची चिरीमिरी घेणं बरोबर नाही किंवा ठरवताना याबद्दल पूर्ण चर्चा करावी. त्यांनी नेमलेले तंत्रज्ञ एकदा बाजरातील इतर तंत्रज्ञाच्या तुलनेने तपासून पहावे. शक्यतो दरपत्रकात किमान मानधन नमूद केलेलं असतं. त्याचाही वापर आपण करू शकतो. कुणालाही मानधन देताना त्याची रीतसर पावती घ्यावी. बजेट हा विषय पुढेही बऱ्याचदा येणार आहे. विविध प्लॅटफॉंर्म आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचं एकूण कलेक्शन, मिडिया, प्रिंट आणि इतर Advertisement partners कडून येणारी आर्थिक तरतूद, अशा बऱ्याच विभागात बजेट आणि कलेक्शनची विभागणी होत असते. तूर्तास बजेटच्या प्रारंभिक चर्चेला पूर्णविराम...!

दिग्दर्शक, सहायक दिग्दर्शक आणि त्यांचे सहकारी...!

१. दिग्दर्शक

कॅप्टन ऑफ द शीप म्हणून ओळखली जाणारी ही व्यक्ती यथार्थने कॅप्टन असते. चित्रपट कसा असावा आणि कसा दिसावा याचं पूर्ण नियंत्रण यांच्याकडे असतं.

सत्यजित रे, राजकपूर, सुभाष घई, गुरुदत्त मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, प्रकाश झा, शेखर कपूर, श्रावणी देवधर, कल्पना लाजमी, समृद्धी पोरे, झोया अखतर, अनुराग कश्यप, अनुराग बासू अशी असंख्य नावं आपण गेली ७० वर्ष रोज ऐकत आलेलो आहोत. यांच्यात नेमकं काय आहे ? सामान्य लोकांच्या मनात असलेल्या भावना पुरेपूर पडद्यावर उतरवल्या आणि लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. असंख्य कलाकारांना यांनी दिशा दिली. असंख्य नवोदितांना त्यांनी संधी दिली. सामान्य माणसाचा जीवनपट त्यांनी कलेच्या माध्यमातून अक्षरशः बोलता केला आणि लोकांना पटवून दिलं की, सिनेसृष्टीतदेखील नवल घडू शकतं.

भारतीय प्रेक्षकांची एक मानसिकता आहे. पाहिलेला प्रत्येक चित्रपट त्यांना सत्य वाटतो. तो फिक्टिशियस असला तरीही हे घडू शकतं याची कल्पना करण्याची शक्ती त्यांच्यात जागृत होते. कलाकार, संगीत, गीत, लोकेशन्स, सुरवात, मध्य, शेवट, सगळं-सगळं त्यांना आपलं वाटतं. आणि याला कारणीभूत असतात ते दिग्दर्शक..! घडलेल्या घटनेचं, कल्पनेचं, भावनेचं हुबेहूब चित्रीकरण करून, ते आपल्यालाच दाखवणारा अवलिया !

" The Pursuit Of Happiness !" सामान्य माणसाची इतकी सूंदर गोष्ट शोधून सापडायची नाही. नायकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून ,त्याची हतबलता आणि संघर्ष पाहून जीव खोल जातो. काही प्रसंगी त्याचं दुःख वाटून घेण्यात आपण माणूस म्हणून कमी पडतो, ही वेदना आपल्यालाही जाणवते. या चित्रपटाची मांडणी,मानवी संवेदनांचा सखोल अभ्यास, प्रत्येक भावनेला चेहऱ्याने दिलेला प्रतिसाद हे सगळं खूप व्यवस्थितपणे मांडलं आहे. उत्तम दिग्दर्शक मानवातील बारीक-सारीक भाव टिपून त्याचे रूपांतर करण्यात पटाईत असतो.

दिग्दर्शकाने दैनंदिन जीवनात खालील बाबींकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. विशेष करून जर तुमचं प्रॉडक्ट Realistic असेल तर!

१. भेटणाऱ्या आणि दिसणाऱ्या प्रत्येक माणसाचे सखोल निरीक्षण. त्याची भाषा, हावभाव, पोशाख.

२. कोणत्याही वस्तू किंवा वास्तुकडे कलात्मक दृष्टीने पहाणे.

३. ज्या विषयावर आपण चित्रपट करतोय, त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून मगच त्यात उडी घ्यावी.

४. एखाद्या घटनेवर जर चित्रपट असेल, तर त्या घटनेचा पूर्ण अभ्यास करून, त्याची कारणं आणि परिणाम यावर सखोल अभ्यास करून मगच तो विषय पटावर घेणं गरजेचं आहे.

५. चित्रकरण स्थळाचा पूर्ण अभ्यास आणि ओळख होणं गरजेचं आहे.

६. विविध कॅमेरा अँगल्सचा अभ्यास.

७. विविध वेशभूषा.

८. प्रत्येक पात्र महत्वाचं असून पडद्यावर त्याला हवं तितकं आणि गरजेपुरतं वेटेज देणं.

१०. गीत-संगीताची जाण.

तुंबाड विषयी

सगळ्याच बाबतीत अभ्यासपूर्ण असा हा चित्रपट , दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा सुमारे दहा वर्षाचे सखोल अभ्यास आणि परिश्रम कामी आले आणि 'तुंबाड' एक Fine Art Work' म्हणून भाव खाऊन गेला. विषयाची पूर्ण जाण आली की, ते काम मनासारखं होतं आणि प्रेक्षकांना तो चित्रपट आवडतोसुद्धा. असे खूप कमी दिग्दर्शक आहेत ज्यांचा पहिला प्रयोग प्रचंड यशस्वी झाला आहे. प्रेक्षकांना काय हवं आहे याहून अधिक दिग्दर्शकाला काय दाखवायचं आहे हे प्रभावी ठरलंय. १९९१ पासून ते साधारण २००० पर्यंतच दशक हे अॅक्शन रोमॅन्टिक दशक होतं. अनेक दिग्दर्शक यात आले आणि गेले ही. महेश भट, दीपक शिवदासानी, राज कवर, डेव्हिड धवन, शोमॅन सुभाष घई, मुकुल आनंद, राजकुमार संतोषी, पारतो घोष, अब्बास-मस्तान, राहुल रवैल, विदू विनोद चोप्रा आणि यश चोप्रा! अशी कित्येक नावं आहेत, ज्यांनी हे दशक गाजवलं. अनेक चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. काही पडले. हिंदी चित्रपटाला अनेक नायक, खलनायक, नायिका, सह-नायक, गीतकार आणि संगीतकार मिळाले. १९९१ पासून २००० या दहा वर्षांत कदाचित हिंदी सिनेमाला सगळ्यात जास्त यश-अपयश आणि प्रयोग बघायला मिळाले असतील. त्या मानाने मराठी चित्रपट थोडा मागे पडला. हिंदी सिनेमात असलेली प्रस्थापित घराणी मराठीत नव्हती. आर्थिक दृष्ट्या थोडी कमकुवत असलेली मराठी चित्रपटसृष्टी, नवीन प्रयोगासाठी तयार नव्हती. अनंत माने, विजय कोंडके, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, संजय सुरकर अशी काही नावं आपण आजही मानाने घेतो. कमी बजेट, कलाकारांची कमतरता, अपूर्ण तंत्रज्ञान (खर्चिक तंत्रांची भीती), थेटर्स न मिळणे, प्रमोशनसाठी वेळ आणि खर्च, दोन्ही न मिळणे ! अशी खूप काही कारणं आहेत, ज्यामुळे या दशकात मराठी सिनेमा थोडा मागे पडला, पण यातही वरील दिग्दर्शकांनी आपली जिद्द नाही सोडली. प्रेक्षकांनीदेखील वाट पाहिली.

"तू तिथे मी", "बिनधास्त" यांसारखे नवीन प्रयोग आले आणि मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी मिळाली. "श्वास"सारखा चित्रपट खऱ्या अर्थाने श्वास ठरला. हा दिग्दर्शकाचा आपल्या कामावर आणि निर्मात्यांचा दिग्दर्शकावर विश्वास होता ज्याने या प्रयोगांना धाडस दिलं.

दिग्दर्शक या शीर्षकाखाली आजून खूप काही आहे. मराठीतील काही प्रख्यात दिग्दर्शकांच्या कामाच्या शैली बद्दलही आपण बोलणार आहोतच.

१. जब्बार पटेल

२. राजदत्त

३. अनंत माने

५. सचिन पिळगावकर

६. महेश कोठारे

७. संजय सुरकर

८. केदार शिंदे

९. परेश मोकाशी

१०. रवी जाधव

११. संजय जाधव

१२. समीर पाटील

१३. सुबोध भावे

१४. प्रसाद ओक.

प्रत्येक पिढीवर या दिग्दर्शकांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. यात स्त्रियांचा उल्लेख विशेष आहे. स्मिता तळवलकर, श्रावणी देवधर, सुमित्रा भावे ही नावं त्याहून विशेष. प्रत्येकाची काम करण्याची शैली, शिस्त, अभ्यास, कष्ट, लेखन यातून नवीन पिढीला मिळालेलं ज्ञान अगाध आहे. तांत्रिकदृष्ट्या एकेकाळी कमकुवत असलेला मराठी सिनेमा तेव्हाही समृद्ध होता आणि आजही आहेच..!