यज्ञ – भाग ५
महेश स्टाफरूममध्ये प्रियाची वाट पाहत होता. आज दोघे जवळच्या कॉफीशॉपमध्ये जाणार होते. तो छान तयार होऊन आला होता, किंचित अस्वस्थ होता. मनातली अस्वस्थता लपवण्यासाठी मोबाइलमध्ये सोशल मीडियावर स्क्रोल करत होता. तितक्यात स्टाफरूमचे दार कोणी तरी ढकलले, 'प्रिया असावी.' त्याने पटकन वर पाहिले तर, अनुजा होती. त्याची निराशा झाली तरी, चेहऱ्यावर हसू आणत तो तिच्याशी बोलला. ती अखंड बडबड करत होती. वर्गातला गंमतीशीर किस्सा सांगत होती. एरवी त्याने लक्ष देऊन ऐकले असते, दोन चार जोकही केले असते, पण आज तो फक्त आणि फक्त अस्वस्थ होता.
"प्रिया कुठे आहे?" त्याने मध्येच विचारले.
"हं? ती? अरे ती दुपारीच घरी गेली."
"काय?" तो गोंधळला
"हो. काही तरी काम होतं म्हणून. ऐक ना, तुला सस्पेन्स मुव्हीज आवडत असतील तर..."
"असं कसं अचानक काम निघालं?" त्याने मेसेज केला तर, तिचा रिप्लाय नव्हता. अनुजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून जरा दूर जाऊन त्याने प्रियाला फोन केला.
"हॅलो. कुठे आहेस तू? आपण कॉफीसाठी जाणार होतो."
"अरे हो, घरी काम होतं म्हणून लवकर आले. अर्ध्या तासात भेटूया कॉफी शॉपमध्ये."
"ओके."
"तुम्ही सोबतच या."
"तुम्ही? अजून कोण?"
"तू आणि अनुजा."
"तिला पण सांगितलं तू?"
"हो. आपण नेहमी सोबतच जातो ना कुठेही. बरं ऐक, मी तयार होतेय. भेटू तेव्हा बोलू या. बाय."
"हो. बाय." महेश काहीसा वैतागला. ते तिघे नेहमी सोबत आऊटिंगला जायचे, हे खरं होतं, पण आता त्याला अनुजाची अडचण वाटत होती. त्याने काही विशेष प्लॅन केला नव्हता किंवा बोलायचं ठरवलं नव्हतं तरीही...
**********
कॉफी शॉपमध्ये त्याला दर दोन मिनिटांनी अनुजाचा राग येत होता. तिला कोणाचा तरी फोन यावा आणि तिने निघून जावं, असं त्याला वाटत होतं, पण ते शक्य नव्हतं. त्याचं आज बोलण्यात लक्ष नाही हे दोघींना एव्हाना समजलं होतं.
"रोनाल्डो नेटायटयानिकमध्ये छान काम केलंय ना?" अनुजाने महेशला विचारले.
"हो... काय? कोणी?" या त्याच्या उत्तरावर दोघी खळखळून हसल्या आणि तो ओशाळला.
"क्यू आजकल निंद कम ख्वाब ज्यादा है? काय चाललंय हा?" - अनुजा.
"काही नाही. असंच विचार करत होतो..."
"आम्हाला पण कळू दे तुझे विचार." - प्रिया.
प्रियाच्या एका साध्या वाक्याने महेशची कळी खुलली, पण तसंच अनुजाची लहानशी ट्रिक, हजरजबाबी उत्तरं त्याला बोअरिंग वाटत होती. आपल्याला हव्या त्या व्यक्तीने काहीही बोललं तरी ते आवडतं, पटतं याचा नवप्रत्यय. प्रेमाच्या रॅपरमध्ये गुंडाळलेल्या आकर्षणाची हीच गंमत असते. त्यानंतर मात्र प्रियाने त्याला बोलतं केलं. प्रियाला तिचा नवरा घ्यायला आला त्या वेळी महेशला जरा अपराधी असल्यासारखं वाटलं. खरं तर, त्याच्या मनात काय चाललंय हेच त्याला समजत नव्हतं.
"चल, मी सोडते तुला घरी."
"नको. मी जाईन रिक्षाने." त्याने अजून बाईक आणली नव्हती. घरापासून कॉलेज जवळ असल्याने तो पायीच चालत यायचा.
"अरे चल. मी काही पाडणार नाही तुला." तिने ऐकलं नाही. कॉलेजमधून येताना दोघे स्कुटीवरच आले होते, पण तेव्हा त्याला प्रियाला भेटायची घाई होती. त्यामुळे तो वेगळ्या मनःस्थितीत होता. आता मात्र दहा मिनिटांचा तो स्कुटीवरचा प्रवास त्याला तासभराचा वाटला. एक तर एका मुलीच्यामागे बाइकवर तो कधीच बसला नव्हता आणि त्यात ती अनुजा. काहीही कारण नसताना तो अनुजावर मनातल्या मनात चिडत होता, वैतागत होता. घर आल्यावर त्याने सुटकेचा निःश्वास सोडला.
"निघू मी?"
"हो. थँक यू. बाय."
"मला वाटलं, म्हणशील इथपर्यंत आलीयेस तर, घर दाखवतो."
"अगं, घर नाहीय, रूम आहे एकच.. आणि ते... ओनर जरा...."
"गमतीत बोलले रे. घाबरू नको. येत नाहीय मी लगेच. चल बाय. टेक केअर." छान हसत ती निघून गेली.
**********
महेश बेडवर लोळत होता. आजचा दिवस त्याच्या डोळ्यांसमोरून सरकला. विशेषतः संध्याकाळ. प्रियाचं हसणं, बोलणं, तिचा शांत स्वभाव. सगळं त्याला खूप आवडलं होतं. त्या सगळ्या स्वप्नात अनुजाची लुडबुड त्याला पसंत नव्हती. 'ही का बोलते इतकं? सतत काहीतरी जोक नाही तर, वन लाइनर्स. प्रिया किती छान शांत असते. थोडंच बोलते, पण अर्थपूर्ण!!' आपल्याला कोणी तरी आवडायला लागलं की, इतर अचानक कॉम्पिटिटअर्स वाटायला लागतात. स्वतःचे किंवा समोरच्याचे. खरं तर, ही स्पर्धा असते आपल्या मनातल्या भावनांची आणि संयमाची.
प्रिया त्याला आवडते हे त्याला जाणवलं होतं, पण तिचं लग्न झालंय ही बाब तो नजरेआड करू शकत नव्हता. 'सगळ्या चांगल्या मुलींची लग्नं झाली आहेत किंवा त्यांना बॉयफ्रेंड आहे. काय हे? माझ्या सोबतच का होतं असं? हिचा वाढदिवस कधी असतो? काही तरी गिफ्ट देऊ." त्याने फेसबुक उघडलं, तिचा बर्थडे शोधला, तिचे फोटोज पाहत बसला. तिच्या लग्नाच्या फोटोत ती अजून सुंदर दिसली असती, जर तिचा नवरा शेजारी उभा नसता तर.... असे काय काय विचार त्याच्या मनात येत होते. वाढदिवस दोन महिन्यांनी होता तरी, तो तिला काय गिफ्ट देता येईल हे सर्च करत होता. रात्री उशिरा कधी तरी त्याला झोप लागली.
**********
आज अनुजा आनंदात होती. खूप दिवसांनी तिला कोणी तरी आवडलं होतं. तिच्या वयाचा, छान विचार असणारा, शांत, समजूतदार मुलगा. 'त्यालाही मी आवडले तर? किती छान. घरचे नकार देणार नाहीत आम्हाला. इतका पुढचा विचार आताच नको करायला.' ती लाजली. तिला आठवलं. स्कुटीवर तो अंतर राखून बसला होता. 'इतर मुलांसारखा नाहीय तो. डिसेंट आहे. सुरवातीला तर, मुलींशी बोलायलाही घाबरायचा. किती क्युट ना! पण मी आहे आता, शिकवेन त्याला.' ती परत गालात हसली, लाजली. उद्या हे प्रियाला सांगायचं हे तिने ठरवून टाकलं.
क्रमशः