गुरू आणि त्याची प्रतियुती

युवा विवेक    18-Aug-2021   
Total Views |

गुरू आणि त्याची प्रतियुती
jupiter_1  H x

येत्या १९ ऑगस्टला आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजेच ‘गुरू’ हा सूर्याबरोबर प्रतियुतीमध्ये असणार आहे. म्हणजेच गुरू ग्रह पृथ्वीवरून पाहताना आपल्याला नेहमीपेक्षा जास्त ठळक आणि अधिक जवळ दिसणार आहे. त्यामुळेच येत्या काळात गुरू ग्रहाचा सखोल अभ्यास करण्याची पर्वणी खगोलअभ्यासकांना मिळणार आहे.

आता गुरू अथवा एखादा ग्रह ‘प्रतियुती’मध्ये असणं म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ या. आपली पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. त्याचप्रमाणे गुरू ग्रह (आणि सूर्यमालेतील इतर ग्रहसुद्धा) सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. आता अंतर्ग्रह जसे की बुध आणि शुक्र या ग्रहांच्या कक्षांचा व्यास हा पृथ्वीच्या कक्षेच्या व्यासापेक्षा कमी असल्याने ते सूर्याच्या अधिक जवळून प्रदक्षिणा घालतात. या उलट बाह्यग्रहांची कक्षा पृथ्वीच्या कक्षेपेक्षा मोठी असल्याने ते ग्रह सूर्याला अधिकाधिक लांबून प्रदक्षिणा करतात. आता प्रत्येक ग्रहाच्या कक्षेप्रमाणे आणि त्याच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेच्या काळाप्रमाणे, प्रत्येक ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास वेगवेगळा कालावधी लागतो. या सर्व बाबींमुळे काही वेळा पृथ्वीवरून पाहताना सूर्य जिथे मावळेल (पश्चिमेला) त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला (पूर्वेला) तो ग्रह उगवतो. अर्थात या वेळी तो ग्रह पृथ्वीच्या जवळदेखील असतो. या सर्व कारणांमुळेच आपल्याला येत्या १९ ऑगस्ट रोजी गुरू ग्रह जवळ दिसू शकेल. येत्या काही दिवसांत तो खूप जास्त तेजस्वी दिसेल आणि एखाद्या सध्या द्विनेत्रींमधून अथवा चांगल्या दूरदर्शकामधून गुरूवरील काही वादळे अथवा गुरू ग्रहाचा लक्षवेधी असा ‘रेड स्पॉट’ म्हणजेच गुरूवर असणारे प्रचंड मोठे चक्रीवादळ. जे वादळ काही शतके चालू आहे तेसुद्धा पाहता येऊ शकेल. प्रतियुतीवरून एक गोष्ट आपल्या सहज लक्षात येईल ती म्हणजे, आपण या प्रतियुतीसारखीच एक घटना दर ३० दिवसांनी अनुभवतो ती म्हणजे पौर्णिमा. दर पौर्णिमेला सूर्य मावळल्यानंतर लगेच चंद्र पूर्वेला उगवतो. हीसुद्धा एक प्रकारची प्रतियुतीच आहे.

आपल्याला जर गुरू ग्रह दूरदर्शकाद्वारे पाहण्याची संधी मिळाली तर ती नक्की पाहा. दूरदर्शकाने आपल्याला गुरूवरील अक्षवृत्तीय वादळांचे पट्टे पाहायला मिळतील. गुरू ग्रहाच्या वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या दरम्यान ही वेगवेगळी वादळे आहेत. गुरू ग्रहाचे सखोल अध्ययन सर्व प्रथम गॅलिलिओने केले होते. त्याने गुरू ग्रहाचे चार चंद्र आणि त्यांच्या स्थितीवरूनच सूर्यकेंद्रित विश्वाचा सिद्धांत मांडला. त्याने याच गुरू ग्रहाचा अभ्यास करून ग्रहांच्या कक्षा आणि त्यांचे आकार याचासुद्धा भरपूर अभ्यास केला. यानंतर पुढे न्यूटन या शास्त्रज्ञानेसुद्धा गुरु ग्रहाचा भरपूर अभ्यास केला. कक्षा आणि त्यांचे आकार, तसेच विविध ग्रहांच्या गतीचे नियम मांडणाऱ्या केप्लर या शास्त्रज्ञालादेखील गुरू या ग्रहाच्या अभ्यासाने भरपूर मदत मिळाली. गुरू या ग्रहाविषयी आणखी एक गंमत म्हणजे आपण जुने भारतीय ग्रंथ वाचले तर, आपल्या लक्षात येईल की, अत्यंत जुन्या ग्रंथामध्येसुद्धा या ग्रहाचे नाव ‘गुरू’ असेच आहे. मुळात गुरू या शब्दाचा अर्थ म्हणजे मोठा. आता वास्तविक पाहता तेजस्वितेच्या प्रमाणात शुक्र जास्त तेजस्वी असून, गुरू केवळ प्रतियुतीमध्ये असताना तेजस्वी दिसतो तर, मग फार पूर्वीच्या भारतीय वैज्ञानिकांनी हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असला पाहिजे ही बाब कशी शोधून काढली याचे नवल वाटल्याशिवाय राहत नाही. गुरू ग्रहाच्या बाबतीत अजून एक गंमत सांगायची झाली तर, साधारण १९९३ च्या सुमाराला एक धुमकेतू ज्याचे नाव शुमाकर-लेवी-९ हा एकवीस तुकडे होऊन गुरू ग्रहावर आदळला होता. या घटनेचे प्रत्यक्ष दर्शन अनेक वैज्ञानिकांनी त्या वेळी मोठ्या मोठ्या दूरदर्शकांमधून घेतले होते.

तर, मंडळी असा हा अनोखा गुरु ग्रह पाहण्याची संधी आपल्याला चालून आलेली आहे. जेव्हा आकाश मोकळे असेल, ढगांचा प्रभाव कमी असेल त्या वेळेस संध्याकाळी पूर्वेला आपण गुरू ग्रह पाहू शकाल. या गुरू ग्रहाबद्दल अजून सांगण्यासारखे भरपूर आहे परंतु ते पुढील लेखांमध्ये. सध्या तरी गुरू ग्रहाची अधिकाधिक माहिती करून घ्या आणि आकाशात येत्या महिन्यात गुरू ग्रह पाहण्याचा नक्की प्रयत्न करा.
 
-अक्षय भिडे