बजेट

युवा विवेक    13-Aug-2021   
Total Views |

बजेट
budget_1  H x W

चित्रपटाची आखणी करताना पटकथा जितकी महत्वाची आहे, तितकीच बजेटची आखणीही महत्त्वाची आहे. नेमका किती खर्च लागणार आहे याचा एक आराखडा आपल्याकडे तयार हवा. पहिला प्रोजेक्ट असेल तर, तो एक मर्यादित खर्चात करणं केव्हाही चांगलं. पहिला चित्रपट नेहमी एक प्रयोग असतो. त्यावर अवास्तव खर्च करणं केव्हाही टाळावे. परताव्याची गणितं खूप मोघम आणि बेभरवशाची असतात. बॉक्स ऑफिस, सॅटेलाईट आणि इतर स्रोतांच्या आधारावर नेमका किती परतावा मिळणार आहे, याची खात्री भले-भले देऊ शकत नाहीत. निर्माते याच कारणाने नवीन दिग्दर्शक आणि नवीन कलाकार घेऊन चित्रपट करण्याचं टाळतात. बजेटच्या आखणीपासून तडजोडीपर्यंत पैसा वाचवण्याची आणि व्यवस्थित वापरण्याची कला या क्षेत्रात खूप कमी लोकांना अवगत असते. एकदा खर्चाला सुरवात झाली की, तो एखाद्या फ्लो सारखा वाढत जातो. त्यावर वेळोवेळी नियंत्रण आणणे आवश्यक असतं.

जुन्या काळचे काही कलात्मक चित्रपट नीट पाहिले तर, आपल्या लक्षात येतं त्यांचे खर्चावर प्रचंड नियंत्रण होतं. त्याच लोकेशन्समध्ये थोडाफार बदल करून कलेवर, वेशभूषेवर आणि रंगभूषेवर जास्त खर्च न करता त्यांनी काही दर्जेदार कलाकृत्या सादर केलेल्या आहेत.

१९७६ साली श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला, विजय तेंडुलकर यांनी लिहिलेला 'मंथन' हा चित्रपट सर्वश्रुत आहे. 'Crowd Funding' च्या माध्यमातून साकारलेला हा पहिलाच प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला. साधारण पाच लाख शेतकऱ्यांनी जमा केलेल्या रकमेतून हे आश्चर्य साकारलं गेलं होतं. एका खेडेगावात, कुठल्याही कृत्रिम सेटवर जास्त खर्च न करता हा चित्रपट तयार झाला, यशस्वीदेखील झाला. तो काळ वेगळा होता. चित्रपटाकडे कला आणि सामाजिक माध्यम म्हणून बघितलं जायचं. आजच्या व्यावसायिक विचारसरणीच्या हिशोबामुळे असे प्रयोग आता दुर्मिळ झाले आहेत. प्रत्येकाला आपण लावलेला पैसा वसूल करण्याची घाई असतेच. हा पैसा वसूल करण्याच्या भरपूर आयडियाज तो वापरत असतो, पण 'मंथन' च्या बाबतीत घडलेला इतिहास खूप काही शिकवून जातो. प्रामाणिकपणा, मनापसून काम करण्याची प्रवृत्ती आणि कोणाचं तरी भलं होतं आहे ही वृत्तीदेखील हवी.

त्याकाळी कुणाला बुडवण्याची प्रवृत्ती सहसा कुणात नसावी. कलाकार आणि तंत्रज्ञदेखील मिळेल त्यावर आनंदी असायचे. सगळे आपल्या कामाशी, व्यवहाराशी आणि चांगुलपणाशी एकनिष्ठ होते. 'मंथन' चित्रपट म्हणजे 'अमूल'च्या निर्मितीची कहाणी आहे. चित्रपट व्यवसायात मी शिकाऊ असताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. हे सगळ्यांसाठीच लागू होतं असं नाहीये ! पण काही ठिकाणी विशेष करून नवीन किंवा ज्यांचा हा पहिला प्रयोग आहे असे लोक, निर्मात्यांना फसवू बघतात. एखाद्या माणसाला चित्रपटासाठी पैसा लावण्याची इच्छा झाली की, तो माणूस आपल्या तावडीत सापडला असं नसतं. त्याला खर्चाचा प्रामाणिक आकडा देणं गरजेचं असतं, तसेच वेळच्यावेळी हिशोब देणंही अपेक्षित असतं. कुणाचे कष्टाने कमवलेले पैसे गुंतवले जात आहेत याचं भान असणं गरजेचं असतं.

बजेट बनवताना काही बाबी लक्षात ठेवाव्या.

१. काही लोक अ)पर डे ब) एकूण रक्कम c)पॅकेज तंत्रावर काम करतात. उदा. कॅमेरामन- ५००० / पर डे असेल आणि तात्पुरते कामाचे वेळापत्रक जर ३० दिवसांचं असेल तर, कॅमेरामनचं मानधन १,५०,००० होतं.

२. प्रत्येक डीपार्टमेंट आणि प्रत्येक तंत्रज्ञाची फी अशीच मांडून बजेट फाईल तयार करावी.

३. बजेटमध्ये साधारण ते १० टक्के रक्कम इतका अतिरिक्त खर्च होतो.

४. शक्यतो एखाद्या नामांकित संस्थेकडून प्रत्येक डीपार्टमेंटचा दराचा तपशील एकदा तपासून पहावा आणि मग तंत्रज्ञाचं मानधन ठरवावं.

५. सगळ्यात जास्त खर्च कलाकारांवर होत असतो. काही कलाकार पर डे घेतात अथवा प्रॅाफिट शेअरमध्ये घेतात. ते ठरवून झाल्यावरच त्यांची माहिती बजेटमध्ये रूजू करावी.

६. कोणत्याही प्रकारचा व्यवहार कागदोपत्री असला की, दोन्ही बाजू कायदेशीर बंधनात असतात. ठरलेलं मानधन, तारखा, कामाचं स्वरूप आणि इतर बाबी शक्यतो अॅग्रीमेंट करताना त्यात नमूद कराव्याच. चित्रीकरण, डबिंग आणि त्यानंतर प्रमोशनसाठी लागणाऱ्या कलाकारांचं संपूर्ण मानधन आणि इतर गोष्टी बजेटमध्ये घ्याव्यात.

७. चित्रीकरण सुरू असताना साधारण ५० ते ७० टक्के कामगार आणि तंत्रज्ञ हे पर डेवर काम करणारे असतात. तसंच सेटवर ऐनवेळी लागणारा खर्चही त्यात अधिक असतो. त्यांचा अंदाज करून तो खर्च टाकावा.

बजेट बनवताना खालील तंत्रज्ञ आणि डीपार्टमेंट्स यांची गणना करावी.

१. दिग्दर्शक

२. सहायक दिग्दर्शक आणि त्यांचे सहकारी

३. कार्यकारी निर्माता, निर्मिती प्रमुख, निर्मिती व्यवस्थापक आणि त्यांचे सहकारी.

४. प्रमुख कलाकार

५. सह-कलाकार

६. ज्युनिअर आर्टिस्टस

७. रंगभूषा (शक्यतो कलाकारांचे आपले वैयक्तिक रंगभूषाकार असतात) आणि वेशभूषा (दागदागिने, चष्मा, कपडे या सकट)

८. कला (साहित्यासकट)

९. छायाचित्रकार (कॅमेरा, लेन्सेस, कॅमेराचे तीन ते चार सहायक, कॅमेरा वॅनचं रोजचं भाडं )

१०. लोकेशनचं रोजचं भाडं

११. रहाण्याची व्यवस्था

१२. जेवणाची व्यवस्था

१३. स्पॉट बॅाइज / सुरक्षारक्षक

१४. वॅनिटी वॅन.

१५. जनरेटर आणि त्याचं रोजचं इंधन.

१६. ड्रोन कॅमेरा, जिमी जीब, स्टील फोटोग्राफी, क्रेन्स आणि छायाचित्रीकरणासाठी लागणारं इतर महत्त्वाचं साहित्य आणि सहकारी.

१६. गीत - प्रतिगीत मानधन

१७. संगीत (प्रतिगीत, पार्श्वसंगीत)

१७. डबिंग (डबिंग आर्टिस्ट, डबिंग स्टुडीओ)

१८. फोली साऊंड

१९. कलरिंग

२०. VFX (Special Effects )

२१. कथा आणि पटकथा.

२२. प्रिंटिंग आणि फाईनल कॅापी.

२३. पोस्टर प्रिंटिंग/ ट्रेलर्स/ टीजर्स/

२४. सेन्सर खर्च.

२५. प्रोमोशन आणि रिलीजसाठी लागणारा खर्च.

वरील बाबी साधारण चित्रपटाशी संलग्न आहेत. या सर्व प्राथमिक खर्चात मोडतात. याचा नीट अभ्यास करून तपशीलवार तक्ता तयार केल्यास उत्तम.

फोफावलेला भ्रष्टाचार आणि माणसाची लालची वृत्ती याला हे क्षेत्र सुद्धा अपवाद नाही. या क्षेत्रात कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते याबद्दल विशेष.

१. मानधन बुडवणे किंवा ठरल्याप्रमाणे न देणे, देण्यास दिरंगाई करणे.

२. प्रत्येक खर्चात कमिशन घेणे. त्यामुळे नकळत बजेट वाढतं.

३. निर्माता आणि वेन्डर्स यांच्यात असलेले अघोषित मध्यस्थी

४. नामांकीत संस्थेचे दर माहिती नसणे.

५. चित्रीकरण लांबल्यानेही नकळत खर्चात वाढ होऊ शकते.

नवीन निर्मात्यांकडून अवाच्यासव्वा पैसा उकळून पसार झालेल्या महाभागांबद्दल रोज बऱ्याच तक्रारी ऐकायला मिळतात. अपूर्ण माहिती, अपूर्ण अभ्यास हीच त्याची मूळ कारणं आहेत. सुरवात करतानाच आपण या क्षेत्राची सखोल माहिती घेऊन मगच पाऊलं उचलली पाहिजेत. जे सहकारी आपण रूजू केले आहेत, त्यांचं या आधीचं काम, त्यांचे झालेले व्यवहार याची तपासणी करून मगंच त्यांची नियुक्ती करावी. किती प्रोजेक्ट्स केले आहेत? किती पूर्ण केले आहेत? कामाचा दर्जा काय होता? सहकारी कोण होते? याच बरोबर यांच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही सुरू आहे का? याचीदेखील खात्री करून घ्यावी. शक्यतो चित्रपट महामंडळ किंवा तत्सम अधिकृत संस्थेकडे नोंदणी झालेलेच कलाकार आणि तंत्रज्ञ घ्यावे. कुठे काही फसवणूक झाल्यास अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे त्याची रीतसर तक्रार नोंदवावी आणि पुरावे सादर करावे, पण ती व्यक्ती किंवा तक्रारदार जर नोंदणीकृत सभासद नसेल, तर ती तक्रार पोलीस खात्याकडे करावी.

अनुराग

9511841631