‘इस्रो’ची जडण-घडण

युवा विवेक    11-Aug-2021   
Total Views |

‘इस्रो’ची जडण-घडण


isro_1  H x W: १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला टोकियोमध्ये घेण्यात आलेल्या ऑलिम्पिकमधील खेळाचे सामने घरबसल्या लोकांना दिसावेत यासाठी तेव्हा नुकत्याच पुढे आलेल्या अवकाश विज्ञानाचा वापर करण्यात आला होता. या तंत्रज्ञानाचा आवाका खेळांच्या माध्यमातून लोकांना अनुभवायला मिळाला. हे तंत्रज्ञान भारतालासुद्धा अतिशय उपयोगी आहे याची जाणीव होऊन आपल्या भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक
डॉ. विक्रम साराभाई यांनी भारतातसुद्धा या तंत्रज्ञानाचा पाया रचायला सुरुवात केली. एकीकडे अमेरिकाही या तंत्रज्ञानाचे नवनवे प्रयोग करत असताना दुसरीकडे भारतानेसुद्धा या क्षेत्रात उडी घेतली.

या लेखात आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) पाया कसा रचला गेला आणि किती अडचणी आणि कष्ट यातून भारताने अवकाशावर राज्य केले आहे याचा आढावा घेणार आहोत. डॉ. साराभाई यांनी अगदी वेळीच अवकाश तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि त्याचा सामान्य भारतीय नागरिकांना भविष्यात होऊ शकणारा फायदा ओळखून आपली सेना जमवायला सुरुवात केली. देशभरातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळे वैज्ञानिक, तंत्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, इ. असे अनेक लोक त्यांनी आपल्या गटामध्ये सहभागी केले आणि पुढील तयारीला सुरुवात झाली.

भारतीय अवकाश संशोधन मुख्यतः तीन मुख्य स्तंभांवर आधारित आहे. ते स्तंभ म्हणजे संदेशवहनासाठी उपग्रहांचा विकास, अवकाशातील दळणवळण आणि या सर्वांचा सामान्य भारतीय नागरिकांसाठी उपयोग. डॉ विक्रम साराभाई आणि डॉ रामनाथन ह्यांच्या अध्यक्षतेखाली INCOSPAR (Indian National Committee for Space Research) ही संस्था १९६७ मध्ये स्थापन झाली. अहमदाबाद येथे प्रायोगिक तत्त्वांवर विविध सॅटेलाईटचा विकास करणे आणि भारतीय तसेच इतर जागतिक तंत्रज्ञांना प्रशिक्षण देणे हाच या संस्थेचा उद्देश होता. सुरुवातीच्या काळात इस्रोने स्वतःचे सॅटेलाईट बनवायला लगेच सुरुवात न करता, भारतातील टेलेव्हिजनची लोकप्रियता किती असू शकेल याची चाचपणी करण्यासाठी, सर्वांत पहिला कार्यक्रम कृषीदर्शन हा सुरू केला. या कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.

मधल्या काळात साधारण १९७०च्या पुढील वर्षांमध्ये इस्रोने विविध आंतरराष्ट्रीय सॅटेलाईट वापरून त्याद्वारे अनेक लोकोपयोगी असे टेलेव्हिजन (दूरदर्शन) वरचे कार्यक्रम प्रसारित करण्याचे प्रयोग केले. “खेडा संदेशवहन प्रकल्प” ह्या नावाच्या अंतर्गत खेडा गावामध्ये गरजेप्रमाणे संदेशवहन या प्रयोगाला १९८४ मध्ये युनेस्कोचे पारितोषिक प्राप्त झाले. अशा प्रकारे इस्रोने अनेक प्रयोग यशस्वी केल्या नंतर भारतातील तंत्रज्ञान वापरून भारतात तयार करण्यात येतील अश्या “इन्सॅट” नावाच्या सॅटेलाईट कार्यक्रमाचा प्रस्ताव पुढे मांडला, तसेच दुसऱ्या बाजूला, प्रथम भारतीय संदेशवहन उपग्रह – “आर्यभट्ट”चेसुद्धा काम वेगात सुरू झाले होते.

तर, मंडळी आपण या लेखात इस्रोची स्थापना कशी झाली आणि त्या मागे नक्की कोणती प्रेरणा होती ते पहिले. आता पुढील लेखामध्ये आपण पुन्हा एकदा १९६०-६५ च्या दशकात जाणार आहोत आणि वरील लेखामध्ये आपण वाचल्याप्रमाणे हे सोपे नसून त्यामागे आपल्या शास्त्रज्ञांनी किती जास्त कष्ट, मेहनत आणि युक्त्या वापरल्या ते बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हीसुद्धा थोडा अभ्यास चालू करा आणि तुम्हाला सापडलेल्या भारतीय अवकाश संशोधनाच्या कामात घडलेल्या गंमती-जमती नक्की शोधा. 

 - अक्षय भिडे