चित्रपट तयार करताना – भाग - ३

युवा विवेक    02-Jul-2021   
Total Views |

film_1  H x W:  
पटकथेला सुरवात करण्याआधी तिचा कच्चा ड्राफ्ट तयार करणं केव्हाही चांगलं! कथेच्या विस्तारानुसार प्रत्येक सीनआधी कागदावर उरतवून नंतर तो फुलवला तर, आपल्याला कळतं की, कथेच्या अनुरूप आपण चाललो आहोत की नाही! सीनच्या सुरवातीलाच
१. सीनचं टायटल ,
२. पात्र ,
३. लोकेशन,
४. वेळ (दिवस/रात्र)
५. इनडोअर किंवा आउटडोअर
या प्रारंभिक सूचना असलेला तक्ता टाकला की, पटकथा सॉर्टिंग करण्यास सोपी जाते. त्याचसोबत खाली ६. Property Required आणि ७. Artistwise Costumes Required हे पण असायला हवं. ज्याच्या हातात पटकथा जाईल, त्याला आपलं काम सोपं आणि चोख करता यावं, यासाठी हे करणं गरजेचं आहे.
सीनची सुरवात करताना आपल्याला तो पडद्यावर कसा बघायचा आहे याची पूर्ण जाणीव ठेवून सुरवात करावी. पात्रांच्या बारीक हालचाली, त्याचे संवाद (कथेचा लेखक, पटकथाकार आणि संवाद हे एकाच व्यक्तीच्या ताब्यात असण्याचा इथे फायदा होतो.) अगदी स्पष्टपणे असावे. नंतर त्यात अॅडिशन करता येते.
उदा.
१. सीन - सुदामा श्रीकृष्णाला भेटायला येतो
२. पात्र - श्रीकृष्ण, सुदामा
३. लोकेशन - श्रीकृष्णाचा महाल
४. Time ( Day / Night ) - Day, Morning, Sunrise
५. इनडोअर / आऊटडोअर - इनडोअर
६. लागणारी प्रॉपर्टी
७. Costumes Required -
( सुदामा येऊन श्रीकृष्णाच्या महालासमोर येऊन उभा राहतो. )
इथे पात्रांच्या चेहऱ्यावरचे हावभावांचा स्पष्ट उल्लेख असणं गरजेचं आहे. त्यासाठी पात्रांचा नवरसांचा अभ्यास झालेला असावा. शरीराच्या हालचालीदेखील इथे मांडाव्या लागतात. अन्यथा सीन अपूर्ण राहून तो सेटवर पूर्ण करावा लागतो, जे खूप जिकरीचं आहे. पटकथेच्या गरजेनुसारच छायाचित्रीकार ( Cinematographer) आपले छायाधोरण ठरवत असतो. एखाद्या संवादाला कोणाच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि प्रतिक्रिया टिपायच्या आहेत हे पटकथेत जर स्पष्ट नसेल, तर पुढे गोंधळ उडतो. त्यामुळे मूळ पटकथेत या बारीक-सारीक गोष्टी मांडाव्यात. मूळ कथेनुसारच पटकथा पुढे सरकली तर लेखनास सोपं जातं. एकामागून एक सीन लिहिले, की आपला कथेवरचा ताबा सुटत नाही.
कथा जर शॉर्ट असेल, तर पटकथेत ती सोयीस्कर लांबवावी लागते. त्यात addition कराव्या लागतात. हे addition करताना ते कथेशी मिळतं असावं. एखाद्या कथेची कल्पना असते, तिचा विस्तार करताना, त्यात पात्र, घटनाक्रम टाकताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते.
"सदमा" हा चित्रपट तसा खूप मर्यादेचा होता. मर्यादित कलाकार, लोकेशन्सही मर्यादित होते. एक साधं-सरळ कथानक, पटकथा लिहिताना विस्तार पावतं आणि हा-हा म्हणता ते इतिहास घडवून जातं. श्रीदेवी आणि कमल हसन यांनी पटकथेचा पूर्ण अभ्यास केल्याने "सदमा" प्रचंड गाजला. गीत-संगीत, कथा-पटकथा, लोकेशन्स, casting या सगळ्यात "सदमा" एक परिपूर्ण चित्रपट वाटतो. पटकथेत कुठेही जडपणा वाटत नाही. कुठलेही पात्र उगाच आतमध्ये आहे असंही वाटत नाही. सुरुवात, मध्य आणि शेवट यात कमालीची सांगड आहे. कथा भरकटत जात नाहीये.
कथेच्या उणिवा पथकथा भरून काढते, पण पटकथेत असलेल्या खाचा भरून काढणं अवघड असतं. प्रत्येक सीनचा सारखा मूड असलेले काही ९०च्या दशकातील मारधडपट पाहिले की, लक्षात येतं. मारामारी दाखवायची, जाडजूड संवाद दाखवायचे म्हणून पटकथेला सर्रास बगल दिली जाते. विनोदनिर्मिती व्हावी म्हणून एखादं विनोदी पात्र आत येतं, कथेशी काहीही संबंध नसलेले विनोद घडतात आणि शेवटी चित्रपट पडतो. किरकोळ प्रेक्षक असणारे हे चित्रपट म्हणजे सुटलेल्या पटकथेची उदाहरणं आहेत. Scene Sequence च्या बाबतीत अतिशय घासाघीस झालेली असते. एक उत्तम पटकथा लिहायची असेल तर, डोळ्यांसमोर दृश्य उभं करून ठेवावं. आपल्याला ते पडद्यावर कसं बघायचं आहे. हे जास्त महत्वाचं आहे. त्याला साध्या भाषेत आपण Visualization म्हणू शकतो.
तांत्रिकतेत पटकथेचा एकंदरीत बांधा इतरांचे काम सोपं करणारा हवा. दिग्दर्शकापासून ते कॉल टाइम देणाऱ्या production boy पर्यंत पटकथा पोहोचते. कलाकार, कला दिग्दर्शक, वेशभूषा, रंगभूषा, लोकेशन मॅनेजर, लाईटमन, कॅमेरामन या सगळ्यांच्या शेड्युलची भिस्त पटकथेच्या एका कॉपीवर असते. ती लिहिताना तुम्ही एखादं प्रचलित सॉफ्टवेअर वापरलंच पाहिजे असं नाहीये. साध्या पद्धतीतदेखील तुम्ही ती उतरवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे पात्रांची यादी, लोकेशन्सची यादी असणं गरजेचं आहे. आधी पात्रांची निवड की, आधी पटकथा हा प्रश्न नेहमी पडतो. त्यासाठी आधी पटकथा तयार असली पाहिजे. त्यानुसार पात्र, त्यांची वय, लोकेशन्स, तिथे अतिरिक्त लागणारे साहित्य याची नोंद आणि जुळवाजुळव करणं सोपं जातं.
पुढे आपण पात्र, लोकेशन, budget , चित्रपटासाठी लागणारे विविध departmental heads ( HOD ) आणि इतरही बाबी बघणार आहोत. तदपूर्वी खालील महत्वाचे कारागीर बघू या.
१. निर्माता / गुंतवणूकदार (Financer)
२. दिग्दर्शक
३. सहायक दिग्दर्शक (Associate Director)
४. सहायक दिग्दर्शक (Assistant Director /s)
५. कार्यकारी निर्माता (Executive Producer)
६. निर्मितीप्रमुख (Production Head )
७. कथा-पटकथा ( Story- Screenplay)
८. संवाद (Dialogues)
१०.मुख्य पात्र (Lead Characters)
११. पात्र (Second Lead )
१३. इतर कलाकार (Third Lead )
१५. गीते (Lyricist )
१६. संगीत (Music Director)
१७. छायाचित्रकार (Cameraman / Cinematographer)
१७. प्रकाश ( Lights)
१८. कला (Arts Direction)
१९. रंगभूषा (Makeup)
२०. वेशभूषा (Costumes)
२१. ध्वनी (Sound)
गरजेनुसार किंवा बजेटनुसार यात वाद होऊ शकतात. पण वरील तत्त्व हे चित्रपट निर्मिती करताना आवश्यक असतात.
अनुराग
९५११८४१६३१