नासाच्या चंद्रा क्ष-किरण दुर्बिणीने काढण्यात आलेल्या आपल्या आकाशगंगेच्या केंद्रास्थानाच्या छायाचित्रात असे दिसून आले आहे की, त्या केंद्रस्थानी अतिउष्ण वायू आणि चुंबकीय तरंग एकमेकांत गुंफले जाऊन त्यामुळे एक अभूतपूर्व दृश्य तयार झाला आहे. हे नवे छायाचित्र चंद्रा क्ष-किरण दुर्बिणीने आधी काढलेल्या आणि आता काढलेल्या छायाचित्रांच्या एकत्रीकरणाने तयार झाले आहे. या छायाचित्रामुळे आपल्या आकाशगंगेच्या चकतीच्या वरचा आणि अधिक लांबचा भागदेखील स्पष्ट दिसू शकतो आहे.
पॅनोरमा या प्रकारच्या त्या छायाचित्रात नारिंगी, निळे, हिरवे असे विविध रंगाचे म्हणजेच क्ष-किरणांच्या वेगवेगळ्या उर्जास्रोतांचे भाग सापडले आहेत, तसेच मीरकात या आफ्रिकेतील दूरदर्शकाच्या साह्याने घेतलेल्या छायाचित्रामध्ये करड्या आणि फिकट पांढऱ्या रंगांचे भाग दिसत आहेत. हे भागसुद्धा आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या विविध प्रकारातल्या क्ष-ऊर्जांचे स्रोत दर्शवतात. चंद्रा दुर्बिणीच्या साह्याने घेण्यात आलेल्या या छायाचित्रात आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या विविध अवकाशीय वस्तूसुद्धा ओळखता येत आहेत. या छायाचित्रात आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या भागातील धनु तारका “अ”, तसेच आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असणारे अतिविशाल असा कृष्णविवराचा भागदेखील दिसत आहे.
या अतिउष्ण वायूंचे प्रवाह हे चुंबकीय क्षेत्रांच्या आधाराने एकमेकांमध्ये गुंफलेले असू शकतात, असा दावा वैज्ञानिकांनी २७ एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या एका खगोल नियतकालिकात केला आहे. शास्त्रज्ञ डॅनियल वॉंग यांनी त्यांच्या दाव्यात असे म्हटले आहे की, आपली आकाशगंगा एखाद्या परिसंस्थेप्रमाणे आहे. आपल्या आकाशगंगेचे केंद्र हे आकाशगंगेच्या भागातील विविध तारे, ग्रह यांची निर्मिती आणि इतर घडामोडी यांच्या उत्पत्तीसाठी जबाबदार आहेत. याच कारणास्तव आपल्या आकाशगंगेच्या केंद्राचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे, परंतु आपल्या आकाशगंगेतील धूळ आणि वायूमुळे आकाशगंगेच्या केंद्राचा अभ्यास करणे फार कठीण आहे. मात्र, चंद्रा क्षकिरण दूरदर्शकाच्या साह्याने आपल्याला धूळ आणि वायू यांच्यावर मात करून आकाशगंगेच्या केंद्रास्थानाचा वेध घेणे शक्य झालेले आहे.
या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी, सदर छायाचित्राच्या माध्यमातून समोर आलेल्या क्ष किरण उत्सर्जन करणाऱ्या विविध स्रोतांचा एक नवीन सिद्धांत समोर येण्याची शक्यता आहे. या सिद्धांताप्रमाणे जेव्हा चुंबकीय शक्तींचे दोन परस्परविरोधी बले एकमेकांच्या समोर येतात तेव्हा ही प्रक्रिया प्रचंड मोठ्या प्रमाणात घडत असून कदाचित याच क्रियेमुळे हे मोठे बल तयार होत असावे आणि त्यामुळेच या मोठ्या चुंबकीय स्रोतांनी निर्माण झालेल्या क्ष-किरणांची निर्मिती होत असावी. कदाचित या एका छायाचित्रामुळे समोर आलेली ही माहिती हे एखाद्या हिमनगाचे टोकच असू शकेल आणि जसे तंत्रज्ञान पुढे विकसित होईल, तसे आपल्याला आपल्याच आकाशगंगेचा अधिक खोलवर ठाव घेणे शक्य होईल.
- अक्षय भिडे