दुर्गाशक्ती भाग ६ .. पद्मश्री गोदावरी दत्ता

युवा विवेक    07-Jun-2021   
Total Views |

durgashakti 6_1 &nbs 
भारतात आजही अनेक ठिकाणी मुलगी वयात आली की लगेच तिचे लग्न केले जाते. वयात येण्याचे वयही अवघे १२-१३ वर्षे असते. ज्या वयात खरं तर शाळेत जाऊन शिकायचे असते, त्या वयात संसाराची जबाबदारी स्वीकारावी लागते. स्त्रीच्या आवडीनिवडी तर बाजूलाच राहिल्या, पण साधं चांगलं आयुष्यही वाट्याला येत नाही. पण अश्या परिस्थितीतही स्वतःला सिद्ध करत, समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणं हे किती कठीण असेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही. बहादूरपूर, बिहार इथल्या एका गावात गोदावरी दत्ता यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी त्यांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलं. काही वर्षांतच त्यांना बालविवाहाच्या बंधनात अडकवलं गेलं. काही वर्षांत एका मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आली. ज्याच्यासोबत आयुष्यात पुढे जगायची स्वप्नं बघितली, तोच सोडून दिल्लीला निघून गेला, परत न येण्यासाठी. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, एका मुलाची जबाबदारी अश्या परिस्थितीमध्ये त्यांच्या कामी आली ती रंगांची साथ.
वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी गोदावरी दत्ता यांना चित्रकलेची आवड लागली. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला होता. बिहार मधल्या या भागात प्रत्येक मुलीला 'मधुबनी' चित्रकला शिकणं हे गरजेचं होतं. मधुबनी चित्रकला ज्याला 'मिथिला चित्रकला' असेही म्हटले जाते, कारण चित्रकलेचा हा प्रकार बिहारमधल्या मिथिला भागात गेली तब्बल २५०० पेक्षा जास्त वर्षे पिढ्यानपिढ्या वारसा रूपाने जोपासला गेला आहे. असे म्हटले जाते की, जनक राजाने राम आणि सीतेच्या लग्नाच्या वेळी तो प्रसंग काही कलाकारांना चित्ररूपाने काढायला सांगितला होता. हीच चित्रकला एखाद्या सणाच्या दिवशी, समारंभात, चांगल्या दिवशी घराच्या भिंतीवर, जमिनीवर चितारली जाऊ लागली. आज अडीच हजार वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्यावरही या भागातील प्रत्येक आई आपल्या मुलीला हा परंपरेचा वारसा देत आली आहे. गोदावरी दत्ता यांनी सुद्धा आपल्या आईकडून या चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले होते.
स्वतःवरती ऐन तारुण्यात संकटांची मालिका कोसळली, तरी गोदावरी दत्ता यांची आई त्यांच्यासोबत आधारवडाप्रमाणे राहिली. गोदावरी दत्ता यांच्या आई सुभद्रादेवी या त्या भागात मधुबनी चित्रकलेसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांना अनेकदा रामायण, महाभारत यांतले प्रसंग चित्रित करण्यासाठी बोलावलं जायचं, त्याच वेळेस गोदावरी दत्ता यांनी या चित्रकलेचे धडे आत्मसात केले. आपल्या आईची कलाकारी त्यांनी आपल्या घराच्या भिंतीवर चित्रित करायला सुरवात केली. बिहार मधल्या या भागात 'कोहबर घर' नावाची एक प्रथा आहे. नवविवाहित दाम्पत्याने या खोलीत (घरात) तीन रात्री एकत्र घालवायच्या असतात. या घराच्या भिंतीवर आणि जमिनीवर मधुबनी चित्रकला प्रेम, जुन्या कथेतील प्रसंग, फूल, प्राणी या सगळ्यांतून चित्रित केलेली असते. या चित्रांच्या सान्निध्यात ३ रात्री घालवल्यानंतर चौथ्या दिवशी लग्न हे परिपूर्ण समजले जाते. अश्या खोलीत मधुबनी चित्र रंगवण्यासाठी त्यांच्या आईला बोलावलं जात असे. एकही पैसा न घेता त्यांच्या आईने ही चित्रकला एक परंपरा आणि सांस्कृतिक ठेवा म्हणून जपली. आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी दत्ता यांनी यातील बारीक कलाकुसर आत्मसात केली. चित्रकलेचा हा वारसा आपण पैश्यासाठी नाही, तर आपला सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी जपत आहोत असं त्यांचं मत होतं.
गोदावरी दत्ता यांनी मधुबनी चित्र काढताना कधीच ब्रशचा वापर केला नाही. हात, अंगठा, बांबूचे टोक, पेन, आगपेटीच्या काड्या ह्याचा वापर करत त्यांनी मधुबनी चित्रकलेला एका वेगळ्या उंचीवर नेलं. All India Handicrafts Board ने त्याकाळी भारताच्या ग्रामीण भागात जपलेल्या या चित्रकलेला देश आणि जगासमोर आणलं. गोदावरी दत्ता यांनी त्याचा उपयोग करून मधुबनी चित्रकलेला जागतिक पातळीवर प्रसिद्ध केलं. एकेकाळी भारताच्या एका भागात जपलेल्या चित्रकलेला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. गोदावरी दत्ता यांनी अनेक प्रदर्शनांमधून जर्मनी, जपान सारख्या देशांमध्ये या चित्रकलेला एक मानाचं स्थान मिळवून दिलं. मिथिला म्युझिअम टाकोमची, जपान इकडे उभारलं गेलं, ज्यात जवळपास ८५० पेक्षा जास्त मधुबनी चित्र, २५०० वर्ष जुन्या भारतीय चित्रकलेचा वारसा म्हणून आज बघता येतात. या कामासाठी जवळपास ७ वर्ष लागली. यात गोदावरी दत्ता यांचं योगदान अमूल्य आहे. जपानमधील ओसाका, टोकियो, कोबे यासारख्या अनेक शहरात मधुबनी चित्रकला, भारताच्या अभिजात संस्कृती आणि परंपरेचं दर्शन लोकांना घडवण्यासाठी उपलब्ध आहे.
मधुबनी चित्रकलेत पारंपारिक रंगांचा वापर करताना गोदावरी दत्ता यांनी त्यातील प्रत्येक रेष न् रेष शिकण्यासाठी तासन् तास घालवले आहेत. आपली कला आणि वारसा पुढल्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थी, शिक्षक यांना ही कला शिकवण्याची सुरूवात केली. गेल्या ३५ वर्षात त्यांच्या हाताखालून तब्बल ५०,००० पेक्षा जास्त लोकांनी मधुबनी चित्रकला आत्मसात केली आहे. एकेकाळी लुप्त होणाऱ्या भारताच्या चित्रकलेला आज जागतिक वारसा बनवण्यासाठी गोदावरी दत्ता वयाच्या ९३व्या वर्षी सुद्धा प्रयत्न करत आहेत. आपल्या समाजातील मुलींनाही चित्रकला शिकवण्यासोबत त्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठींबा देत आहेत. गोदावरी दत्ता यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने १९८० साली राष्ट्रीय पुरस्कार तर २०१९ साली पद्मश्री सन्मानाने त्यांचा गौरव केला आहे. भारताच्या भूतपूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना 'शिल्प गुरु' हा आदरयुक्त सन्मान दिला आहे.
गरीबी, बाल विवाह, आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये असूनही २५०० वर्षाचा इतिहास असणाऱ्या चित्रकलेला आणि भारताच्या सांस्कृतिक वारश्याला त्यांनी आज जागतिक पातळीवर मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. आज पारंपरिक रंगांची जागा ऍक्रेलिक रंगानी आणि बांबूच्या देठांची जागा ब्रशने घेतली असली तरी मधुबनी चित्रकलेचा तो आत्मा आजही त्यांनी जिवंत ठेवला आहे. मधुबनी चित्रकलेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गोदावरी दत्ता यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा.