काही गाणी त्यांची विशिष्ट ओळख घेऊनच जन्माला येतात. ती लिहिण्यामागे, रचना करण्यामागे एखाद्या कहाणीचा पट असतो. ही कहाणी साधीसुधी नव्हे; तर समाजमन ढवळून काढणारी, नव्या व्याख्या देणारी आणि संगीत हे झोपलेल्या समाजाला जागं करण्याचं, प्रभावीपणे संदेश देण्याचं माध्यम आहे याची जाणीव देणारी. आजचं गाणं हे याच धर्तीवरचं आहे.
शमीम पठाण ही अहमदाबादची तरुणी. तिचं लहान वयातच लग्न झाल. लगेच पदरात मूल आलं. इतर पिचलेल्या बायकांप्रमाणे नवऱ्याच्या माराने तीही गांजलेली आणि तरीही तसाच संसार रेटणारी. नवऱ्याच्या हिंसाचार सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर शमीम आपल्या मुलाला घेऊन घरातून बाहेर पडली, पण जाणार कुठे? माहेरी कुणी घरात घ्यायला तयार नाही, वर तिलाच तिच्या घर सोडण्याच्या निर्णयाबद्दल दूषणं दिली गेली. मात्र, शमीम खचली नाही. नवऱ्याकडे परत जायचं नाही, या निर्धाराने उभी राहिली. मुलाला शिकवून मोठं करायचं या आकांक्षेपोटी बुक-बायडिंग करणे, पतंग बनविणे, भाज्या विकणे अशी मिळेल ती कामे करत ती उदरनिर्वाह करू लागली. जगायचं असेल आणि पोराला शिकवायचं असेल तर धड काही तरी काम-धंदा करायला हवा या एकाच विचाराने ती पछाडली गेली होती. यातूनच तिने ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजाने आखून दिलेल्या चौकटी मोडून सगळे पुरुषकेंद्री बंधने झुगारून देत, प्रत्येक पायरीवर आव्हाने पेलून तिने त्यात यशस्वीपणे जम बसवला. जे भल्याभल्या सुशिक्षित, मोठ्या घरांमधल्या स्त्रियांनाही जमत नाही, ते शमीमने साध्य करून एक वेगळा आदर्श समोर ठेवला. तिची ही प्रेरक कहाणी मांडण्यासाठी ‘मन के मंजिरे’ ह्या गाण्याची आणि पूर्ण अल्बमचीच निर्मिती झाली. तिच्यासारख्या हजारो, लाखों शोषित महिलानी पुढे येऊन तिच्या कहाणीतून प्रेरणा घेऊन आपलं अवकाश निर्माण करावं या हेतूने Breakthrough” या मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेने महिलांच्या हक्कासाठी एक अभियानच सुरू केलं. मुळात, “Breakthrough”ची स्थापनाच या गाण्यामुळे झाली असं म्हणलं तर, वावगं ठरू नये.
इंडिपॉप कल्चरमध्ये सामाजिक संदेश देण्यासाठी अशा प्रकारचा म्युझिक व्हिडिओ येणं, अल्बम होणं आणि लाखों महिला या अभियानाशी जोडल्या जाणं हा प्रकार नवीनच नाही तर, प्रथमच घडत होता. या अल्बमचं नाव Mann keManjeeré: An Album of Women's Dreams (मन के मंजिरे – स्त्रियांच्या स्वप्नांचा अल्बम) असं समर्पक ठेवण्यात आलं. प्रसून जोशी या गुणी गीतकाराने या गाण्याचे शब्दही तसेच प्रखर लिहिले आहेत –
मन के मंजीरे आज खनकने लगे
भूले थे चलना, कदम थिरकने लगे
अंग अंग बाजे मृदुंग सा, सुर मेरे जागे
सांस सांस में बांस बांस में,
धुन कोई साजे
गाये रे, दिल ये गाने लगा है,
मुझको आने लगा है
खुद पे ही ऐतबार
मनातली सगळी खदखद, अन्यायाविरुद्धची चीड, अवहेलना झेलून कातर तरीही दगड झालेलं मन घेऊन एखादी स्त्री जेव्हा लढा देऊन तावून-सुलाखून बाहेर पडते तेव्हा आत्मभानाचा “मंजिरा” आतमध्ये निनादायला लागतो. सगळी गृहीतकं ओलांडून स्वतःच स्वतःला आव्हान देण्याची ठिणगी पेटते. त्याची ज्योत होऊन तेवत राहिली की, स्त्री जगाशी दोन हात करून अस्तित्त्व सिद्ध करतेच. आभाळाला गवसणी घालण्याची आपली क्षमता तिला नव्याने जाणवू लागते आणि डोळे क्षितिजापार भिडू लागतात. झुलणाऱ्या झाडांशी खेळत वारा आणि त्याबरोबर उगवणारी पहाट आपल्याला कवेत घेऊन “आता रात्र संपली आहे” याची तसदी देत असतात.
बादल तक झूले मेरे पहुँचने लगे,
आँखों के आगे गगन सिमटने लगे,
डाल डाल पे, ताल ताल पे , छु के हवाएं
खेत खेत ने, रेत रेत ने, फैलादी बाहें
आये है, सिन्दूरी सुबाह आई,
घुलती जाए सियाहीरातों की
आयुष्याची नवीन पहाट अनेक दरवाजे खुले करत जाते, एकटीची लढाई असली तरी त्या लढ्याला नवीन अंगण देते, माणसांचे नवनवीन रंग आणि त्यातून साकारलेली दुनियेची रांगोळी बघायला नवीन दृष्टी मिळते. कूस पालटलेल्या आयुष्यातल्या ऋतूंची नवलाई खुणावत असताना, डोळे उघडून जगाकडे बघताना एक स्व-जागृतीचा क्षण सपडतो आणि त्या वेळी लख्ख जाणीव होते की, आता आपण एकटे नाही, उलट आपण स्वतःशीच मैत्री केली आहे, आपणच आपला सहचर आहोत, मित्र आहोत, मग आता कसली भीती ?
खोले जो दरवाज़े तो देखा हर शाई थी नयी
उजली उजली सी थी मेरी तन्हाई रे
बदली बदली सी बदली मेरे अंगना में थी छाई
वीरानी रानी बन के मेरे पास आई
अपनी नज़र से मैंने देखि दुनिया की रंगोली
मुझको बुलाने आई मौसम को टोली
खोली आँखों की खोली मैंने पायी अपनी बोली
मुझमे ही रहती थी मेरी हमजोली रे ..
सुन लो.. अब ना अकेली हूँ मैं,
अपनी सहेली हूँ मैं,
साथी हूँ अपनी मैं
हे गाणं आणि हा पूर्ण व्हिडिओ शुजित सरकार आणि गॅरी या द्वयिनी राजस्थानमध्ये शूट केला आहे. राजस्थान हे ठिकाण निवडण्याचं कारण इथल्या स्त्रिया देशभरातल्या इतर स्त्रियांच्या मानाने तुलनेत अत्याचाराला अधिक बळी पडतात, असं आकडे सांगतात. त्याच भूमीमध्ये अन्यायाविरुद्ध उभ्या थकलेल्या स्त्रीची कहाणी चित्रित होणं, हेच योग्य नाही का ?
या अल्बममध्ये एकूण पाच गाणी आहेत आणि “मन के मंजिरे” हा टायटल ट्रॅक आहे. शुभा मुद्गल या गुणी गायिकेचा भारदस्त, खडा आणि जोरकस आवाज या गाण्याला लाभला आहे तर मिता वसिष्ट ही तितकीच गुणी अभिनेत्री शमीमच्या भूमिकेत आपल्याला दिसते. शमीमची कहाणी व्हिडिओच्या वेगवेगळ्या कट्समधून आपल्या समोर येते. राजस्थानच्या शुष्क मरुभूमीसारखंच स्त्रियांचं रणरणीत आयुष्य, डोळ्यांमध्ये बुरसटलेल्या विचारांची, रूढीची धूळ गेलेली आणि अशात तीच धूळ प्रस्थापितांना चारत एक स्त्री ट्रक ड्रायव्हर म्हणून आयुष्य नव्याने सुरू करते. परंतु, तिच्या पंखांना ज्या माणसांनी बळ दिलं त्यांनाही ती आपल्या प्रवासात बरोबर घेऊन जाते आहे, मुलासमोर मोकळं आकाश उभं करते आहे, हे फार आश्वासक चित्रं पाहायला मिळतं. एकूणच, हे गाणं पाहिल्यानंतर कित्येक स्त्रियांच्या अन्यायाला, दुःखाला वाचा तर फुटलीच पण एक खरीखुरी, सकारात्मक कहाणी पुढे आल्याने त्यावर फुंकरही बसली, हे जाणवतं. १९९९ साली रिलीज झालेल्या या विडियोला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. ‘द हिंदू’ या प्रसिद्ध वृत्तपत्राने याची दखल घेत “Mann keManjeeré has made a breakthrough by claiming public space for women's aspirations” या शब्दांत या व्हिडिओचा गौरव केला. २००१ सालचा ‘बेस्ट इंडिपॉप म्युझिक विडियो’ स्क्रीन पुरस्कार, २००३ सालचा ‘बेस्ट सिनेमॅटोग्राफी’ हा यू जज इट फिल्म फेस्टिवल पुरस्कार आणि ‘बेस्ट म्युझिक विडियो’ हा २००५ सालचा लिंक टी व्ही पुरस्कार असे विविध पुरस्कार या व्हिडिओने पटकावले.
स्त्रीला जी आंतरिक शक्ति लाभली आहे, त्यामुळे एरवी फुलासारखी मऊ, मुलायम असणारी ती वेळप्रसंगी वज्राहून कठोर होऊ शकते हा संदेश घेऊन आलेले एकीकडे शमीमसारख्या स्त्रियांची व्यथा पाहून दुखवत नेणारे तर, दुसरीकडे तिच्या डोळ्यातलं निर्धार, बेधडकपणा, तिची चमक पाहून आतमध्ये सुखावत नेणारे शब्द, संगीत आणि चित्रीकरण असा त्रिवेणी मिलाफ असल्यामुळे हे गाणं आजही कधीही लागलं तरी तत्क्षणी मनातला मंजिरा वाजायला लागतो; हे खरं !
- नेहा लिमये
Link- https://www.youtube.com/watch?v=LsFha77l3RY