दोन दिवसांपूर्वी कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीने तब्बल ५०,००० कोटी रुपयांच्या तीन आण्विक पाणबुड्या बनवण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याबद्दल सूतोवाच केलं आहे. यातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या तिन्ही पाणबुड्यांच्या निर्मितीत ९५% गोष्टी या 'मेड इन इंडिया' असणार आहेत. आत्मनिर्भर भारत बनण्याकडे टाकलेलं एक मोठं पाऊल म्हणून या गोष्टीकडे बघण्यात येतं आहे. मुळातच अतिशय किचकट असणारं तंत्रज्ञान आत्मसात करून अश्या पद्धतीच्या पाणबुड्यांची निर्मिती करणं हे प्रचंड मोठं शिवधनुष्य पेलणं आहे. पारंपारीक पाणबुड्या आणि आण्विक पाणबुड्या या मधील फरक काय असतो? आण्विक पाणबुडी कशी काम करते? तसेच या पाणबुड्यांमुळे भारताच्या सागरी शस्त्रसज्जतेत काय बदल होणार ते समजून घेणं महत्वाचं आहे.
भारताकडे सध्या दोन आण्विक पाणबुड्या कार्यरत आहेत. यातील एक म्हणजे आय.एन.एस. चक्र जी आपण रशिया कडून भाड्याने घेतली आहे तर दुसरी म्हणजे अरिहंत क्लास मधील आय.एन.एस.अरिहंत. याच वर्षी आय.एन.एस.अरिघात भारताच्या सेवेसाठी नौदलात समाविष्ट होणं अपेक्षित आहे. यानंतर आय.एन.एस.चक्र ३ भारताने रशिया कडून भाड्यावर घेतली असून २०२५ पर्यंत ती भारताच्या नौदलात समाविष्ट होणं अपेक्षित आहे. यांनतर एस. ५ क्लास मधील ३ आण्विक पाणबुड्यांनवर भारत काम करतो आहे. १३,५०० टन पाणी विस्थापित करणाऱ्या आणि बॅलेस्टिक मिसाईल डागता येऊ शकणाऱ्या या पाणबुड्या असणार आहेत. यातील बॅलेस्टिक मिसाईल हे एम.आय.आर.व्ही. तंत्रज्ञानाने विकसित असणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेता येतो.
या शिवाय भारताने प्रॉजेक्ट ७५ अंतर्गत ५०,००० कोटी रुपयांच्या ३ आण्विक पाणबुड्या बनवण्याकडे पाऊल टाकलं आहे. आण्विक पाणबुड्या आणि पारंपारीक पाणबुड्या यामध्ये खूप सारी तफावत आहे. नक्की कोणत्या पद्धतीची पाणबुडीची गरज भारताला आहे यावर अनेकदा चर्चा झालेली आहे. प्रत्येक पाणबुडीची वैशिष्ठ आणि वेगवेगळे फायदे आहेत. भारताला दोन्ही पद्धतीच्या पाणबुड्यांची गरज आपल्या सागरी सिमा तसेच हिंद महासागरावर चीनच वाढणारं वर्चस्व यासाठी गरजेचं आहे. पारंपरिक पाणबुड्या या सागरी किनारपट्टी च्या सुरक्षिततेसाठी महत्वाच्या आहेत तर खोल समुद्रात संरक्षणासाठी आण्विक पाणबुड्या महत्वाच्या आहेत.
आण्विक पाणबुडीत सगळ्यात महत्वाचं असती ती गोष्ट म्हणजे अणुभट्टी. भारत ज्या पाणबुड्या बनवणार आहे त्यातील अणुभट्टी पण भारतात बनणार आहे. या पाणबुड्यांमध्ये लाईट वॉटर अणुभट्टी बसवली जाणार आहे. अश्या पद्धतीच्या अणुभट्टी मधे कुलंट आणि न्यूट्रॉन मॉडरेटर म्हणून साध्या पाण्याचा वापर केला जातो. अणूंच्या फिशन प्रक्रियेत फास्ट न्यूट्रॉन तयार होतात. या न्यूट्रॉन ना रोखण्यासाठी तसेच अणूंच्या विखंडन प्रक्रियेवर ताबा मिळवण्यासाठी साधं वापरलं जाते. अणूंच्या विखंडन प्रक्रियेतून निर्माण होणारी ऊर्जा ही एकतर इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी वापरली जाते अथवा या ऊर्जेचा वापर वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो. त्यातून स्टीम टर्बाईन चालवून त्यातून इलेक्ट्रिक ऊर्जा निर्माण केली जाते. एकदा की ऊर्जा निर्मिती सुरु झाली की ती अविरत सुरु रहाते. त्यामुळे आण्विक पाणबुडी किती काळ पाण्याखाली राहू शकते अथवा किती अंतर दूर जाऊ शकते याला मर्यादा नाही. जोवर आत काम करणाऱ्या लोकांजवळ पुरेसा अन्नसाठा आहे तोवर पाणबुडी खोल महासागरात साधारण ३०० मीटर ते ४०० मीटर खोलीवर लपून राहू शकते. आत्तापर्यंत आण्विक पाणबुडीने सलग पाण्याखाली राहण्याचा जागतिक विक्रम हा तब्बल १११ दिवसांचा आहे. त्यामुळे एखाद्या आण्विक पाणबुडीने जवळपास ३ महिन्यांहून अधिक काळ पाण्याखालून संपूर्ण जग पालथ घातलं तरी कोणाला त्याचा मागमूस लागणार नाही. यामुळेच आण्विक पाणबुडी या खोल महासागरात वचक ठेवण्यासाठी गरजेच्या आहेत.
आण्विक पाणबुडी बनवणं तितकं सोप्प नाही म्हणून मोजक्याच देशांकडे हे तंत्रज्ञान आहे. पारंपारीक पाणबुडीच्या तुलनेत आण्विक पाणबुडी बनवण्याचा आणि त्या व्यवस्थित सुरु ठेवण्याचा खर्च खूप जास्ती असतो. पण त्याच वेळी आण्विक पाणबुड्यांची संहारक शक्ती ही इतर पाणबुड्यांच्या तुलनेत जास्ती असते. भारताने ज्या ३ आण्विक पाणबुड्यांवर काम करण्याचं सुतोवाच केलं आहे त्यावर निर्भय, ब्राह्मोस, ब्राह्मोस २ आणि वरुणास्त्र सारखी क्षेपणास्त्र बसवण्यात येणार आहेत. ब्राह्मोस किंवा ब्राह्मोस २ हे कुठून डागलं गेलं याचा अंदाज येईपर्यंत या क्षेपणास्त्रांनी आपलं काम फत्ते केलेलं असेल आणि त्याचवेळेस पाण्याच्या खाली दूर कुठेतरी ही पाणबुडी अदृश्य झालेली असेल. त्यामुळे येत्या काळात हिंद महासागरात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या आण्विक पाणबुड्यांचा वापर होणार आहे.
या ३ पाणबुड्या कार्यरत झाल्यावर अजून ३ बनवण्यास सुरवात होणार आहे. या संपूर्ण प्रोजेक्ट ७५ ची किंमत १.२५ लाख कोटी रुपये आहे. या आण्विक पाणबुड्याना लागणारी अणुभट्टी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या साह्याने कल्पकम इकडे तर याची बांधणी हझिरा इकडे तर सर्व सामुग्रीची जुळवाजुळव आणि त्याची परीक्षा विशाखापट्टणम इकडे केली जाणार आहे. वर उल्लेख केला त्या प्रमाणे यातील ९५% काम हे भारतात भारतीयांकडून केलं जाणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात खूप लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच या सर्व आण्विक पाणबुड्या २०३० पर्यंत नौदलाच्या सेवेत दाखल होतील असा अंदाज आहे. तिसऱ्या विमानवाहू जहाजापेक्षा भारतीय नौदलाने या ३+३ पाणबुड्यांसाठी मागणी केली आहे. या आण्विक पाणबुड्या आल्यानंतर १० पेक्षा जास्ती आण्विक पाणबुड्या हिंद महासागरावर लक्ष ठेवून असणार आहेत. आत्मनिर्भर भारताच्या या आण्विक पाणबुड्या नक्कीच शत्रूच्या गोटात खळबळ माजवणार आहेत.
जय हिंद!!!