व्यावसायिकदृष्ट्या एखादा चित्रपट यशस्वी ठरण्यामागे खूप मोठे कष्ट असतात. चित्रपट तयार करताना वापरले जाणारे तंत्रज्ञान, कथेचा भक्कम पाया, पात्र, गीत-संगीत, चित्रीकरण स्थळं, संवाद, आणि नेमक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे, ही सगळी सांगड फक्कड जमली, की चित्रपट हमखास यशस्वी होतो, पण त्याची तयारी प्रारंभीच करून ठेवावी लागते. आपण बनवतो आहोत, ते एक प्रॉ़डक्ट आहे. त्याचं मार्केट म्हणजे प्रेक्षक आहेत. ज्यांचा एक सामूहिक मूड आहे. एखादा नवीन प्रयोग बाजारात आणताना तो कुठे आणि कसा विकायचा आहे, याची तयारीसुद्धा तो तयार करताना सुरू झाली पाहिजे. आत्मविश्वास आणि वास्तव हे एकाच मेंदूची परस्परविरोधी टोकं आहेत. इथे ही दोन्ही टोकं समोरासमोर असली पाहिजे.
१. प्री-प्रॉडक्शन
२. व्यावसायिकदृष्ट्या चित्रपटाची मांडणी करताना प्री-प्रॉडक्शनमध्ये खूप संवेदनशील बाबी गणल्या जातात. चित्रपट एखाद्या मोठ्या बॅनरचा असेल तर, तिथे कदाचित सगळी यंत्रणा आणि दिग्गज ठरलेले असू शकतात. पण, याउलट चित्रपटाच नवीन बॅनर असेल तर, ही पूर्वतयारी खूप काळजीपूर्वक करावी लागते. प्रत्येक क्षेत्रात, विषयाचं सखोल ज्ञान आणि गांभीर्य असलेली माणसं निर्माण करावी लागतात. जेणेकरून प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत ते सोबत असतील. कुठेही गळती लागणार नाही.
३. प्री-प्रॉडक्शनचा प्रवास -
१. कथा -
चित्रपटाची कथा ही GENRE CENTRIC असते. आपण नेमका कोणता विषय निवडणार आहोत हे खूप महत्वाचं आहे. Genre म्हणजे चित्रपटाची शैली. चित्रपट असो वा लघुपट, त्याची शैली खूप महत्त्वाची आहे. भय, प्रेमकथा, जीवनपट, Action थ्रिलर, Crime थ्रिलर, कॉमेडी, Fantasy, बालपट, ऐतिहासिक, Sci-Fi हे आजकाल हमखास वापरले जाणारे Basic Genre आहेत. Genre निवडताना, तो सध्याच्या व्यासपीठावर कितपत तग धरू शकेल, याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करताना, यापूर्वी त्याच Genre चे किमान पाच चित्रपट , त्यांची व्यावसायिक गणितं, त्यांची मांडणी त्यातील पात्र या सगळ्याचा विचार केला पाहिजे. त्याच त्या Genre चे चित्रपट सारखेच प्रेक्षकांना दिसू लागले, तर तो मोठा धोका ठरू शकतो. याला अपवाद म्हणजे तुमच्या कथेचा वेगळेपणा.
रामसे बंधूंचे भयपट कमी खर्चाचे असूनदेखील एके काळी खूप गाजले. पण कथेत, पात्रात, पटकेथेत, संवादात आणि अगदी चित्रीकरणस्थळातदेखील असलेला सारखेपणा आणि बहुतांशी कमकुवत तंत्रज्ञान, गीत-संगीतास न मिळालेला वाव या त्रुटींमुळे त्यांचे चित्रपट एके काळी प्रेक्षकांनी पूर्ण नाकारले. याचा तोटा फक्त रामसेबंधूंनाच नाही, तर भयपट बनवणाऱ्या इतर लोकांनाही झालाच. त्यात भरीसभर म्हणजे, चालतीच्या नायक-नायिकांनी भयपटांकडे आधीच पाठ फिरवली होती. अशातच रामगोपाल वर्मा यांनी 'रात' हा नव्या धाटणीचा भयपट पडद्यावर आणला. 'रात' ची कथा, त्याचं चित्रीकरण, संगीत आणि हुकमी कलाकारांची उपस्थिती यामुळे 'रात' प्रचंड यशस्वी झाला. प्रत्येक Genre मध्ये अशी उदाहरणं आपल्याकडे आहेतच!
भारतीय चित्रपटांना चांगल्या कथा जरी ढिगाने मिळाल्या असल्या, तरी त्या कथांना न्याय मात्र हवा तसा मिळाला नाही. एका ठराविक साचोटीत अडकून राहिलेल्या हिंदी सिनेमाला बाहेर येऊन नवनवीन प्रयोग करण्यास खूप वेळ लागला. ८०च्या दशकात झालेले काही नवीन प्रयोग कलात्मकदृष्ट्या खूप कौतुकास्पद ठरले खरे, पण व्यावसायिक चित्रपटांपुढे त्यांचा गल्ला थोडा कमजोर राहिला. 'गुंतवणुकीकडून वसुलीकडे' हा एकच ध्यास असलेल्या निर्मात्यांनीदेखील त्याच त्या कथांना नवीन ट्रीटमेंट देऊन आपला गल्ला भरला. नवीन कथाप्रयोग दिसायला जरी चांगले असले, तरी व्यावसायिकतेत त्यांचा प्रेक्षकवर्ग कमी होता. त्यामुळे त्यांना तांत्रिकदृष्ट्या न्याय मिळू शकला नाहीच. पण आज हे गणित काही अंशी बदललेलं आहे. प्रेक्षकांना पडद्यावर काही तरी नवीन बघण्याची तीव्र इच्छा आहे. निर्माते आज गुंतवणूकदारही या गणितात भागीदार होताना दिसताहेत. याचा पूर्ण फायदा नवीन कथाकारांनी घ्यायला हवा.
एखाद्या पात्राभवती किंवा घटनेभवती फिरणारं कथानक घट्ट बांधलेलं असावं. त्यात असलेली पात्र आणि जोडीव घटना, कथेच्या मूळ गाभ्याशी एकरूप असणं खूप गरजेचं आहे. पात्र किंवा सिक्वेन्स जर कथानकाच्या बाहेरचा असेल आणि तो नीट स्पष्ट नाही करता आला, तर पुढे तो कथेला भरकटत नेतो. चित्रपटाच्या कथेला "प्रश्न" आणि "उत्तरं" या साध्या सोप्या पद्धतीत गुंतवणं खूप महत्त्वाचं आहे. जर एखादी कथा अनिर्णित ठेवायची असेल तरी, प्रेक्षकांना खूप प्रश्न पडतील इतकी ती गोंधळलेली नसावी. कथेची गुंतागुंत सोडवताना पटकथेचा आधार घ्यावा लागला तर चालू शकतं. अचानक येणारे sequences देखील चालतील, पण मूळ कथेचा संदर्भ सुटत असेल, तर ते घातक होऊ शकतं.
२. पटकथा
कथेची मांडणी किंवा कथेचा प्रवास म्हणजे पटकथा. Screenplay हा त्याचा इंग्रजी अर्थ सगळं काही स्पष्ट करतो. कथेची बांधणी मर्यादित असते. तिला वाव देण्याचं काम पटकथा करते. प्रत्येक पात्राचा प्रवेश, कथेच्या मूळ गाभ्याची ओळख ही पटकथेतून होत असते. ती लिहिताना खूप काटेकोर नियम पाळावे लागतात. तुमची चार पानांची कथा पटकथेचा रूपात खूप अवाढव्य होत असते. चित्रपट तयार करताना प्रत्येक जण याच पटकथेचा आधार घेत असतो. सगळी पात्रं, चित्रकारणस्थळं, चित्रीकरणाच्या वेळा, रंगभूषा, वेशभूषा, कला हे सगळंच पटकथेचा तारेवर चालतं.
पटकथेला सुरवात करण्याआधी तिचा कच्चा ड्राफ्ट तयार करणं केव्हाही चांगलं! कथेच्या विस्तारानुसार प्रत्येक सीनआधी कागदावर उरतवून नंतर तो फुलवला तर, आपल्याला कळतं की कथेच्या अनुरूप आपण चाललो आहोत की नाही ! पटकथेच्या विस्ताराबद्दल आपण सविस्तर चर्चा करूच.
- अनुराग
९५११८४१६३१