चित्रपट बनवताना - १

युवा विवेक    11-Jun-2021   
Total Views |

film_1  H x W:  
समाजाच्या अंतर्मनात वेगळं स्थान निर्माण केलेली चित्रपटसृष्टी नेहमीच परिवर्तनाचं एक प्रभावी माध्यम म्हणून समोर आली आहे. आजकाल अतिप्रचलीत असा 'ट्रेण्ड' हा शब्द पसरवण्यात चित्रपटाची मुख्य भूमिका आहे. घटना कितीही जुनी असली, कोणत्याही काळातली असली, कोणत्याही युगातली असली, तरी चित्रपटाच्या माध्यमातून ती नव्याने आपण मांडू शकतो, पाहू शकतो. आपल्याला हवा असलेला बदल, आपल्याला हवी असलेली पात्र, ठिकाण, घटना, बदलून आपण, कल्पकतेच्या आधारावर ते बनवून कोट्यवधी लोकांपर्यंत ते अगदी सहज पोहोचवू शकतो. प्रत्येकाच्या मनातलं चित्र जवळजवळ हुबेहूब मांडून ते दाखवण्यात पटाईत असलेली ही चित्रपटसृष्टी म्हणून कदाचित कधीही बाजूला पडलेली नाही. सुरवातीपासूनच ती वैभवात राहिली राहिली, प्रगती करत राहिली. आजपर्यंत कोट्यवधी लोकांना उद्योग- व्यवसाय मिळवून देऊन तिने अद्याप कधीही मागे वळून पाहिले नाही.
१९१३ पासून सतत होत असलेले प्रयोग, नवीन तंत्रज्ञानाची भर, वाढता प्रेक्षकवर्ग, प्रेक्षकांची बदलती चव आणि मागणी, रोज या क्षेत्रात येणारी नवीन पिढी अशा अनेक कारणांमुळे चित्रपट आज एक भला मोठा व्यवसाय झाल्याचं दिसतं. कधी काळी हजारांत-लाखांत असलेला एक पट आता कोट्यवधींचा झाला आहे. देशात-परदेशांत पसरलेली याची व्याप्ती आता आणखी मोठी झाली आहे. त्यात तंत्रज्ञानाने जग हाताच्या बोटावर आणून ठेवल्याने जगभरातील प्रेक्षक तुमच्या आवाक्यात आले आहेत. भाषा, प्रांत, सीमा, चलन, अंतर ही बंधने ओलांडण्यास एके काळी अशक्य वाटणाऱ्या बाबी, आज लीलया पार झाल्यात. आपण क्षणात सातासमुद्रापार जातो, हे या क्षेत्राला लाभलेलं सगळ्यात मोठं वरदान म्हणता येईल.
भारतीय प्रेक्षकांच्या बाबतीत दोन गोष्टी एकसारख्या आहेत. तो चित्रपट पहाताना स्वतःला त्यातील एका पात्रात स्वतःला शोधतो. दुसरं म्हणजे, आपल्याच बाजूच्या एखाद्या घटनेवर किंवा अनुभवाचा नट्टा-पट्टा करून चित्रपट तयार होतो. मूळ प्रसंगात आपल्याला हवा तसा बदल करता येतो. त्याला एक कथेत बांधून ठेवता येतं. पात्रांची, तंत्रज्ञाची एखाद-दुसरी बैठक बसते आणि हे बीज जमिनीत रोवलं जातं. जर प्रयोग करणारे अनुभवी असतील, तर अगदी सहजगत्या हे जहाज पार होतं. पण जर ते नवीन असतील, तर कदाचित अनुभवाची कमतरता त्यांना त्रासदायक ठरू शकते. हा त्रास आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अशा दोन्ही स्तरावर प्रचंड नुकसानकारक ठरू शकतो.
फक्त मराठी चित्रपटसृष्टी बद्दल बोलायचं झालं, तर वर्षाकाठी साधारण २५० चित्रपट पटावर येतात. फक्त चित्रपट बनवायचा, या इच्छेखातर खूप हौशी कलाकार इरेला पेटून कामाला लागतात. पण शेवटपर्यंत हे शिवधनुष्य पेलण्यात अर्ध्याहून अधिक खांदे थकतात. अपूर्ण अभ्यास, अशिक्षित तंत्रज्ञ, अनियोजित कारभार, बेशिस्तपणा या सगळ्यात हे जहाज भरकटत जातं आणि बरेच लोक हा नाद अर्ध्यावर टाकून जातात. मात्र, ही वेळ येईपर्यंत बराचसा खर्च झालेला असतो. मानसिकता ढासळलेली असते आणि या नाकर्तेपणाचं खापर शेवटी कोट्यवधी लोकांच्या पोटाचा प्रश्न भागवण्याऱ्या चित्रपटसृष्टीच्या माथ्यावर फुटतं. तीही बिचारी गंगेसारखी ही सगळी पापं पोटात घेऊन आता शंभर वर्षांची झाली आहे. लोकांना कितीही कटू अनुभव आले, तरी तिच्या गतीत काहीही फरक पडलेला नाही. या सृष्टीबद्दल लोकांना इतकं अतोनात आकर्षण आहे की, एखादा अनुभव कटू असला, तरी आपल्याबाबतीत असं काही घडू शकत नाहीच, या आत्मविश्वासाच्या बळावर त्यापेक्षा दुप्पट संख्या दाराशी उभी ठाकलेला आहे. हे कौतुकास्पद आहेच, पण त्याने धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे. गेली ३०-३५ वर्ष नव्याने चित्रपट उद्योगात येणाऱ्या लोकांची संख्या वाखाणण्याजोगी आहे. पूर्ण देशातील हा आकडा बघायचं झालंच, प्रत्येक भाषेत चित्रपट उद्योगावर, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून रहाणारी मंडळी, आपलं एखादं छोटं शहर वसवू शकतात.
चित्रपट क्षेत्रात येताना आधी आपण नेमके या क्षेत्रात का येत आहोत, याचं नेमकं उत्तर शोधलं पाहिजे. त्यासाठी या क्षेत्राची पूर्ण माहिती घेऊनच आपण आत शिरलं पाहिजे. आपल्याला हौस असली तरी, यात कुणाचा तरी पैसा गुंतला आहे. गुंतवणूकदार याचा पुरता मोबदला मिळावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असणार आहे. अर्थात, संपूर्ण अर्थकारण जरी प्रेक्षकांवर अवलंबून असलं तरी, प्रेक्षकांनी आपला चित्रपट पहावा असाच कंटेंट आपण त्यांना दिला पाहिजे. साधारण कोटीच्या घरात जाणारा हा खर्च कसा वसूल होईल याकडे आपला कल हवा. हे गणित जर चुकलं तर, गुंतवलेला सगळा पैसा आणि कष्ट क्षणात वाया जाण्याचा धोका असतो. क्षणात म्हणजे इथे अक्षरशः क्षणातच. आणि याला पर्याय जरी असले, तरी तेसुद्धा बऱ्यापैकी खर्चिक असतात.
साधारणतः चित्रपटाचे मेकिंग हे तीन भागात आपल्याला बघायला मिळतं.
१. Pre-Production
२. Production
३. Post Production.
पुढे आपण या तिन्ही भागांत येणाऱ्या सगळ्याच तांत्रिक बाबींवर चर्चा करणार आहोत. कथेपासून चित्रपट Release होईपर्यंत असणाऱ्या बऱ्याच गोष्टी यात असतील. चित्रपटाच्या Title Credits पासून ते End Credits पर्यंत जे काही घडतं, ते सोप्या भाषेत मांडण्याचा हा प्रयत्न..!
अनुराग
9511841631
........

अनुराग वैद्य

युवाविवेकच्या वेबसाईट साठी लिहिणार आहेत.