नुकताच (१५ मे) जागतिक खगोलदिन होऊन गेला. त्या निमित्ताने प्रस्तुत लेखात आपण खगोलशास्त्राविषयी अधिक माहिती घेऊ या. मानवाला सुरुवातीपासूनच आकाशाचे वेड आहे. त्याला आकाशाविषयी उत्सुकता आहे. हे मानवाच्या इतिहासाहतही दिसते. एखाद्या अंधाऱ्या रात्री, आकाश निरभ्र असताना आकाशाकडे लक्ष जाऊन, आपल्यापेक्षा हे विश्व किती प्रचंड आहे असा विचार मनात न येणारा माणूस विरळाच. जागतिक खगोल दिवस ही अशी पर्वणी आहे की, ज्या दिनाचे निमित्त साधून अवकाश विज्ञानातील वैज्ञानिक, जाणकार मंडळी खगोलशास्त्राविषयीची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. या दिवसाच्या निमित्ताने इतरही खगोलशास्त्रामधील उत्साही लोक आपले ज्ञान वृद्धिंगत करतात. आणखी एक गंमत म्हणजे हा दिवस वर्षातून दोन वेळा साजरा करतात. एकदा उन्हाळी तारकासमूह पाहून तर, एकदा हिवाळी तारकासमुह पाहून.
या दिवसाची सुरुवात १९७३ पासून डग बर्जर ह्यांनी केली. सुरुवातीच्या काळात विविध गावांमध्ये दूरदर्शक लावून तेथून सामान्य जनतेपर्यंत अवकाश विज्ञानाची गोडी पोहोचवावी हा उद्देश होता. नंतर या उपक्रमांचे स्वरूप जागतिक स्वरूपाचे होऊन सर्व जगात हा दिवस विविध प्रकारे साजरा केला जाऊ लागला.
खगोल दिवस हा अनेक प्रकारे साजरा केला जाऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून थोडा वेळ बाजूला ठेवून रात्रीच्या आकाशाकडे आपली नजर वळवायची आणि त्या आकाशातील, मानवाला अज्ञात अशा गूढ रहस्यांचा चिंतनाच्या माध्यमातून मागोवा घ्यायचा. दुसरा मार्ग म्हणजे जवळच्या एखाद्या तारांगणाला भेट देऊन तेथून अवकाशाविषयी अधिक माहिती करून घेणे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवसाच्या निमित्ताने अवकाशशास्त्र समजून सांगणारे एखादे पुस्तक हाती घेऊन अवकाशाविषयी माहिती घेणे हे होय. तसेच, आपल्या रोजच्या जीवनात अनुभवता येणारे असे अवकाशातील बदल, जसे की चंद्राच्या कला, सूर्य-चंद्रग्रहणे, विविध तारकासमूह, नक्षत्रे, राशी ह्यांची माहिती जमा करणे, त्यांची चित्रे रेखाटणे, इत्यादी उपक्रमसुद्धा या निमित्ताने राबवले जाऊ शकतात.
जागतिक खगोल दिवस साजरा करण्याच्या पद्धती अवकाशाप्रमाणेच अमर्याद आहेत. या क्षेत्रात रोज होणारे संशोधन, प्रकाशित होणारी माहिती हीसुद्धा अमर्याद आहे. खगोल या क्षेत्राला फक्त मानवाच्या कल्पनाशक्तीचीच काय ती एक मर्यादा आहे. मला खात्री आहे की, आपणही जागतिक खगोल दिवसाच्या निमित्ताने खगोलशास्त्रामधील आपले ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न कराल. सर्वांना जागतिक खगोलदिनाच्या शुभेच्छा...!
- अक्षय भिडे