“आहा! किती दिवसांनी दाण्याची चटणी आणि गरम पोळी खाल्ली गं आई! एक तू आहेस, नाहीतर त्या! दाण्याची काय, कसल्याच चटण्या नसतात घरी कधीच!” आईची लाडकी मिनू लाडानं म्हणाली.
“अगं, मग अजून एक पोळी करते तुला थांब...” आई पटकन उठायला लागली.“ अं हं.. पोट भरेल माझं.. कमी जेवले तर उगीच टोमणे मारतील. ऑफिसमधून येताना काय खाऊन आलीयेस विचारतील.. मग त्यांचा लाडका मुलगा मध्ये बोलेल की, आली असेल पाणीपुरी खाऊन.. मग काही विचारू नकोस.. त्या आणि त्यांची गुणी मुलगी डाएटबद्दल चर्चा करत बसतील जेवण संपेपर्यंत..”
“काय गं? काय करते काय ती सध्या? झाली न इंजिनीअर? मग नोकरी वगैरे नाही का मिळाली अजून?” “छे! नुसत्या बाता. कुठे कुठे अर्ज करतीये म्हणे मास्टर्सला.. मी काही विचारायला जात नाही, जास्त रस दाखवला तर आमच्याकडेच फीसाठी पैसे मागायची.”
“हो बाई.. तू जपूनच राहा बरं का आणि जावईबापूंना पण सारखं बजावत राहा. म्हणावं आता आपल्याला आपलं प्लानिंग करायला हवं, आपले सेव्हिंग बघायला हवेत विनाकारण खर्च टाळायला हवेत! नाहीतर भावाचं ह्र्दय लगेच विरघळेल बहिणीसाठी..”
“हो, ते मी सतत बोलतच असते गं आई.. त्यासाठी माझी शॉपिंग, पण कमी केलीये मी.. नाहीतर उलटेल तो लगेच माझ्यावर! बरं ते सोड, मी तुला त्या पर्सचे फोटो पाठवले होते बघ.. केलीस का कोणती सिलेक्ट? उद्या ओर्डेर देऊन टाकते ऑफिसमधून..”
डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारणाऱ्या आई-लेकीच्या बोलण्यातला विरोधाभास ऐकून सोफ्यावर बसलेल्या आजीला खुदकन हसू आलं, आवरलंच नाही. दोघींचं लक्ष तिथे गेलं तशी आजी जरा सावरून बसली, समोरचा टीव्ही बंद केला आणि बाजूला ठेवलेलं कसल्याशा स्तोत्राचं पुस्तक उघडून पुटपुटत बसली. मिनूनं आईला खुणेनंच ‘काय झालं?’ असं विचारलं त्यावर तिच्यापुढची ताटली उचलत ती जरा जोरातच सिंकमध्ये टाकत ‘काही नाही’ अशी हातानं खूण करत आईनं तिला आतल्या खोलीत यायला सांगितलं.
आजीला बाहेर अंदाज आलाच. परवाच मायलेकीचं याच विषयावर असंच बोलणं झालं होतं. आज पुन्हा तेच. सासरी काही किरकोळ अडचणी असणाऱ्या नातीला सुनेनं समजावून सांगावं, हवं तर तिचं ऐकून घ्यावं, पण आपली मतं सांगू नयेत, असं वाटत होतं. तसं तिनं सुनेला सुचवल्यावर ती एकदम भडकलीच होती. अडचणी सगळ्यांच्याच असतात, त्यातून मार्ग प्रत्येकाला काढावा लागतोच हे आजीचं म्हणणं होतं, पण मिनूच्या आईनं मात्र अर्थाचा अनर्थ करून वर सासूलाच सुनावलं होतं, काय तर म्हणे माझं केलं तेच त माझ्या लेकीचं पण करायचं आहे का? मी आयुष्यभर गप्प बसून सहन केलं पण तिला नाही करू देणार. आजीनं यावर फक्त एक दीर्घ श्वास सोडला होता.
“हल्ली जरा भ्रमिष्टच झाल्यात! इतके वर्ष सूचना करत होत्याच.. पण आता अगदी प्रत्येक गोष्टीत लक्ष घालतात.”
“पण आता हसली का ती अशी?”
“काही नाही गं, तुझ्या आत्याकडे म्हणजे त्यांच्या लेकीकडे गेल्या नाहीयेत ना चार महिने झाले, ती ही इकडे आली नाहीय म्हणून जेलसी!”
“काही काय आई? आजी काय लहान मुलगी आहे का?”
“छे! लहान मुली निरागस असतात. तुला माहितीये मिनू... परवा बोलत होत्या माझ्याशी त्या.. खटकतं बरं का त्यांना तुझं इथं येणं...” बोलताबोलता आई बेडवर मांडी घालूनच बसली आणि मिनूलासुद्धा शेजारी बसायची खूण केली.
परवाचं सगळं बोलणं थोडं वाढवूनच मिनूला सांगितलं. हे वाढवून सांगण्यामागे खरंतर आईचा काही आखीव-रेखीव डाव नव्हता, पण आपल्या मुलीच्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टी तिनं आजवर आपल्याला सांगितल्या तशा इथून पुढंही सांगाव्यात अशी तिची अपेक्षा होती. तिनं स्वतःसाठी काहीतरी एक ठोस भूमिका नेहमी घ्यावी, लाडात वाढवलेल्या मुलीला अजीबत पडतं घ्यायला लागू नये, तिनं कुठल्याच बाबतीत तडजोड करू नये, लहानपणी जसा तिचा प्रत्येक शब्द या घरात झेलला गेला तसा तो तिथंही झेलला जावा अशा काहीशा आईच्या अपेक्षा होत्या. यामुळे अनेकदा ती उलटसुलट सल्ले द्यायची.
बोलता-बोलता मिनूची निघायची वेळ झाली. चप्पल घालताना आजीनं तिच्या हातात दाण्याच्या चटणीचा डबा टेकवला, “तुला आवडते तर घेऊन जा की तुझ्या घरी..”
मिनू आता चिडलीच, “काही नको, मला खावीशी वाटेल तेव्हा मी येऊन खाईन माझ्या घरी.” ती जरा उर्मटपणेच बोलली. आईच्या चेहऱ्यावर उगीच विषयी भाव आले. आजीनं मात्र परत एक मोठा सुस्कारा सोडला.
मिनू-आईचं भेटणं-बोलणं सुरूच राहीलं. जिथं फक्त ऐकू घेऊन काम होणार होतं तिथं आईच्या सल्ल्यांनी नुकसानच व्हायचं. मिनुच्या बाबतीत जवळजवळ सगळे निर्णय तिची आईच घेत होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिनूच्या बाबांना या सगळ्याची फारशी कल्पनाच नव्हती. बारीकसारीक ठिणग्या उडतच होत्या पण शेवटी आईच्या अतिलुडबुडीमुळे त्या बिचाऱ्या तरुण जोडप्यात एकदा मोठा भडकाच उडला आणि मिनू तावातावानं माहेरी निघून आली.
आपल्या मुलीची ठोस भूमिका बघून आई सुखावलीच. थोडे दिवस जातील मग जावई तिचं म्हणणं ऐकून घेतील, तिच्या मनासारखं वागतील, तिची बाजू घरी मांडतील हा फाजील आत्मविश्वास तिला होता. खरंतर वेळ अजूनही गेलेली नव्हती पण आईच्या सांगण्यावरून मिनू दोन पाऊलं पुढे येण्याऐवजी जास्तच कठोर होत होती. अशाने सगळ्यांच्या डोळ्यांदेखत वेळ हातातून निघून गेली.
अति हट्टीपणामुळे, खूप ताणून धरल्यामुळे शेवटी तुटलं. मुलीचा विस्कटलेला संसार बघून आता आईला त्रास होत होता, पण आता ती मिनूला कोणताच सल्ला देण्याच्या परिस्थितीत नव्हती. आजी शांतपणे बघत होती. मिनूही आजकाल कधीतरी तिच्याजवळ बसून बोलायची.
“आमच्यावेळेला नाही बाई व्हायची अशी टोकाची भांडणं...” एके दिवशी सून आजूबाजूला नाही हे बघून आजीनं मिनू जवळ हळूच विषय काढला.
“तुमच्यावेळी सगळं सहन करायची सवयच होती बायकांना... म्हणूनच पुरुष सोकावलेत.”
आजी-नात काहीतरी बोलताहेत हे बघून आई हळूच कानोसा घ्यायला लागली.
“नाही गं राणी, तुमच्यासारखं आमचं माहेरी जाणं इतकं सहज-सोपं नव्हतं.. तोच फरक होता.” आजी जपाची माळ गुंडाळून ठेवताना हळूच बोलली.
इतक्यात आतून भांड्यांचा जोरदार आवाज आला. मिनूला या वेळी तो खणखणीत ऐकू आला... पण कदाचित आता वेळ निघून गेली होती.
- मुग्धा मणेरीकर