दुर्गाशक्ती भाग ४

युवा विवेक    17-May-2021   
Total Views |
 
part four_1  H
दोन अपूर्णांक मिळून एक पूर्णांक होतो हे कितीही खरं असलं तरी आज आपल्याला पूर्ण करणाऱ्या त्या अपूर्णांकांची निवड करण्याचे निकष बदललेले आहेत. स्वभावाआधी बँक बॅलन्स आणि माणसाआधी फ्लॅट महत्वाचा झाला आहे. पगार किती, कंपनी कोणती हे बघून प्रेमात पडणारे अनेक जण आहेत. अर्थात हे निकष चुकीचे अथवा बरोबर हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण आपलं सर्व सुखसंपन्न; आरामाचं आयुष्य सोडून अश्या एखाद्या जंगलात जिकडे जगण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक गोष्टी उपलब्ध नाहीत, तो भाग आयुष्याच्या रंगीत स्वप्नांपासून कोसो दूर आहे, अश्या एखाद्या ठिकाणी आपल्या जोडीदारासोबत आपल्या जीवनातल्या नवीन वळणाची सुरूवात करावी हा निर्णय घेणं, आणि तो गेली ४८ वर्षांपेक्षा जास्त काळ निभावून नेणं हे एखाद्या तपश्चर्येएवढंच कठीण आहे. हे सगळं करत असताना सर्व आघाड्यांवर आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून समाजसेवेचं अविरत व्रत आजही निभावणाऱ्या दुर्गाशक्ती म्हणजेच डॉक्टर मंदाकिनी आमटे.
विश्व हिंदू परीषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेल्या एका सधन कुटुंबातून त्यांनी आपलं डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. भूलतज्ञ म्हणून आपलं पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांची ओळख सर्जन असलेल्या डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याशी झाली. शस्त्रक्रियेच्या वेळी एकत्र काम करत असताना दोघांचे ऋणानुबंध जुळले ते कायमसाठी. पण खरी अडचण पुढे होती. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आपल्या वडिलांचा म्हणजेच बाबा आमटे यांचं कार्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. आनंदवन म्हणजेच चिखलदरा सारखं एखादं थंड हवेचं ठिकाण असावं असा विचार करणाऱ्या डॉक्टर मंदाकिनी आमटेंसाठी हे सगळं अतिशय नवीन होतं. त्यातही बाबा आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाची जबाबदारी प्रकाश आमटे यांच्यावर टाकली होती. कुष्ठरोगाने पिडीत असलेल्या लोकांना समाजाने वाळीत टाकलेलं होतं, अश्या लोकांसोबत काम करणाऱ्यांना आपली मुलगी देणं हे त्यांच्या घरच्या लोकांना रूचलं नव्हतं. त्यातही अश्या लोकांच्या कल्याणासाठी, त्यांनतर पर्यायाने एका जंगलात आयुष्य काढण्याचा निर्णय स्वीकारून मंदाकिनी आमटे यांनी एका वेगळ्या पाऊलवाटेवर आपला प्रवास सुरु केला.
दार नसलेलं घर, इलेक्ट्रीसिटी; पाणी अशी कोणतीही व्यवस्था नसलेल्या ठिकाणी त्यांनी एका नवीन जीवनाची सुरूवात केली. माडीया-गोंड जमातीतील आदिवासी लोक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो लांब होते. भ्रामक समजुती आणि अंधश्रद्धा अश्या विळख्यात अडकलेल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं शिवधनुष्य पेलणं खूप कठीण काम होतं. एकतर हे लोक दुसऱ्या लोकांच्या जवळ जायला घाबरत असत याशिवाय त्यांची भाषा वेगळी होती. भाषा शिकून त्याचवेळी कोणत्याही सुविधांपासून वंचित असलेल्या ठिकाणी घर चालवणं हे त्याहून कठीण काम होतं. जेवायला लागणारी भाजी स्वतः पिकवण्यापासून ते नाल्यामधील पाणी हंड्यात भरून आणून त्याला चुलीवर उकळवून पिण्यायोग्य बनवेपर्यंत सगळंच कोणत्याही सुविधांशिवाय करायला लागायचं. साप, विंचू, जंगली श्वापदं, पाऊस, थंडी या सगळ्या काळात वीजेशिवाय चुलीवर संसार करताना त्याचवेळी एक डॉक्टर बनून समाजसेवेचं आपलं व्रत चालू ठेवणं हे कल्पनेपलीकडलं आहे. हे सगळं करूनसुद्धा पत्नी, आई या सगळ्या भूमिका सुद्धा त्याच निष्ठेनं निभावणं याची कल्पना पण आपण करू शकत नाही.
डॉक्टर प्रकाश आमटे यांनी, आपण आपल्या पत्नीला साधी एक साडी घेऊ न शकल्याची खंत केबीसीसारख्या कार्यक्रमात बोलून दाखवली होती, यावरून कोणीही विचार करू शकेल की, आपल्या जोडीदाराबरोबर त्याच्या सगळ्या निर्णयात ठामपणे उभं राहून समाज सेवेचं अविरत व्रत स्वीकारण्यासाठी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी किती त्याग केला असेल. १९९५ साली मोनॅको या देशाने डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची दखल घेताना त्यांच्यावर एक पोस्टल स्टॅम्प काढला. असा सन्मान मोनॅको या देशाकडून मिळवणारं आमटे कुटुंब हे जगातील दुसरं व्यक्तिमत्व होतं. २००८ साली त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर प्रकाश आमटे सोबत डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची दखल घेतली गेली. त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना मॅगसेसे कमिटीने म्हटलं होतं,
"In electing Prakash Amte and Mandakini Amte to receive the 2008 Ramon Magsaysay Award for Community Leadership, the board of trustees recognizes their enhancing the capacity of the Madia Gonds to adapt positively in today's India, through healing and teaching and other compassionate interventions."
आज हेमलकसा येथील 'लोकबिरादरी प्रकल्प' निष्काम कर्मयोग आणि समाजसेवेसाठी जागतिक पातळीवर नावाजलेला आहे. आज आमटे कुटुंबियांची तिसरी पिढी हा समाजसेवेचा वसा पुढे नेते आहे. पण एकेकाळी जेव्हा या भागात माणूस म्हणून जगणं अशक्य होतं, अश्या काळात त्यांनी आपल्या जीवनाच्या सोनेरी वळणाची सुरूवात या जंगलातून केली. आज समाजात इतकी उंची गाठल्यावर पण गर्वाचा लवलेश किंवा अभिमान त्यांच्या चालण्याबोलण्यात कुठेच दिसत नाही. एक सामान्य स्त्रीसुद्धा आपल्या कर्तृत्वाने असामान्य कामगिरी करू शकते, एकाचवेळी अविरत समाजसेवेचं व्रत करताना असंख्य अडचणींना सोडवत सगळ्याच पातळीवर एक आदर्श जीवन जगू शकते. संपूर्ण भारतापुढेच नाही, तर जगापुढे एक दुर्गाशक्तीचं असामान्य उदाहरण ठेवणाऱ्या डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.
- विनीत वर्तक