आज आपल्या माउसने जगाला नाचवणारा देश अशी भारताची ओळख निर्माण झाली आहे. पण काही दशकांआधी भारताची ओळख साप आणि गारूड्यांचा देश अशी होती. अश्याच एका गारूड्याच्या घरात गुलाबोचा जन्म झाला. गरिबीच्या खाईत आणि जातीपातीच्या समाजव्यवस्थेत मुलगी म्हणून जन्माला येणं एक पाप मानलं जात होतं. त्यात गुलाबो सातवं अपत्य. सातवी मुलगी म्हणून गुलाबोला गावातल्या समाजाने जिवंतपणी जमिनीत गाडून टाकलं. स्त्री म्हणजे साक्षात दुर्गा, पण दुर्गेला मुलगा हवा या अट्टाहासापायी जिवंतपणी मरणाच्या यातना अवघ्या पहिल्या दिवशी भोगाव्या लागल्या. पण गुलाबो जन्मापासून काहीतरी वेगळं नशीब घेऊन जन्माला आली होती. साक्षात दुर्गेचा वरदहस्त तिच्या डोक्यावर होता. तब्बल सात तासांनी एक दिवसाच्या गुलाबोला तिच्या काकीने जमिनीतून उकरून बाहेर काढलं, तोवर गुलाबो जिवंत होती. ज्या कालबेलिया समाजाने मुलगी म्हणून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याच समाजाची ख्याती तिने जगातील तब्बल १६५ देशात पसरवली आहे. आज युनोस्कोने कालबेलिया या जातीच्या पारंपारिक नृत्य आणि गाण्यांना जागतिक वारश्याचा दर्जा दिला आहे त्यामागे गुलाबोचा वाटा सिंहाचा आहे.
लहानपणीच मृत्यूला स्पर्श करून आलेल्या गुलाबोचं बालपण सापांच्या सोबत सुरू झालं. तिचे वडील गारुड्याचे खेळ जागोजागी रस्त्यावर करत फिरत असत आणि त्याच कमाईवर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. लहानपणीच पुंगीच्या तालावर सापांच्या त्या लयबद्ध हालचाली गुलाबोने आत्मसात केल्या. ती सुद्धा सापांप्रमाणे आपल्या शरीराच्या अश्या काही हालचाली लयबद्ध पद्धतीने करायला लागली ज्याचा आजवर कोणी विचार केला नव्हता. लहानपणीच आत्मसात केलेल्या हालचाली जागतिक पटलावर तिची ओळख बनतील याचा विचार ना तिने कधी केला ना तिच्या घरच्यांनी. वयाच्या ७ व्या वर्षी गुलाबोने सापांसोबत आपल्या नृत्याची कला दाखवायला सुरवात केली. वयाच्या १० व्या वर्षी पुष्करच्या जत्रेत पुंगीच्या तालावर आणि सापांच्या डोलण्यावर तश्याच हालचाली करणारी ही मुलगी लोकांच्या नजरेत भरली. पहिल्यांदा गुलाबोला आपण मुलगी असल्याचा अभिमान वाटला कारण जे काही ती करत होती त्याला लोक टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते. आजवर मुलगी म्हणून नेहमीच कमी लेखल्या गेलेल्या गुलाबोच्या बालमनाला तो प्रतिसाद एक वेगळं समाधान देत होता.
गुलाबोचं सर्पनृत्य तिकडे आलेल्या राजस्थानच्या पर्यटन विभागाच्या तृप्ती पांडे आणि हिंमत सिंग ह्यांच्या नजरेत भरलं. गुलाबोच्या नृत्याचा तो आविष्कार जगावेगळा होता. त्यांनी तिला जयपूर इकडे आमंत्रित केलं. जयपूर सारख्या शहरात आल्यावर तिने आपल्यातल्या नृत्याच्या अंगभूत गुणांना एक वेगळी जोड दिली. नृत्यासोबत आपला पेहराव म्हणजेच घागरा चोळी तसेच त्यावर असणारे छोटे आरसे या विशिष्ट आकर्षित करणाऱ्या पेहरावाला तिने आपलंसं केलं. आपल्या नृत्याला एका साच्यात न बसवता तिने शरीराच्या लयबद्ध हालचालीने पारंपारिक नृत्याला एका वेगळ्या उंचीवर नेलं. तिच्या या मेहनतीमुळे तिला १९८५ साली भारत सरकारतर्फे अमेरिकेत वॉशिंग्टन डी. सी. इकडे जाण्याची संधी मिळाली. पण पुन्हा एकदा समाज तिच्या विरूद्ध उभा राहिला. एका मुलीने असं नाचायला साता समुद्रापार जाणं समाजाला मान्य नव्हतं पण गुलाबोने कोणाचं ऐकलं नाही. अमेरिकेला जाण्याच्या आधी एक दिवस तिच्या वडिलांचं निधन झालं. पण गुलाबो डगमगली नाही. आपल्या वडिलांचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं.
अमेरिकेची ही वारी आपलं आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकू शकते हे गुलाबोला पक्कं ठाऊक होतं. त्यामुळे अश्या कठीण परिस्थितीत पण तिने अमेरिका गाठली. तब्बल दोन महीने तिने अमेरिकेत आपल्या नृत्याचा आविष्कार दाखवला. तिच्या नृत्याची मोहिनी अमेरिकेवर इतकी चढली की असं नृत्य आपल्या नागरिकांना शिकवण्यासाठी अमेरिकेने गुलाबोला आपल्या देशाचं नागरिकत्व देऊ केलं. ज्या भारतीयांनी तिला मुलगी म्हणून हिणवलं, तिला जिवंत गाडलं तरी आपल्या देशाशी असलेली नाळ तोडण्यास तिने तितक्याच नम्रतेने नकार दिला. पुन्हा एकदा गुलाबो अमेरिकेतून भारतात परतली. भारतात परत आल्यावर ज्याप्रमाणे दुसऱ्या देशाने कौतुक केल्यावर भारतीयांना आपल्या हिऱ्याची पारख होते त्याप्रमाणे भारतीय मिडियाने गुलाबो सपेराला डोक्यावर घेतलं. गुलाबो सपेरा आता एक ब्रँड म्हणुन अस्तित्वात आला. ज्या समाजाने तिला गाडलं त्याच समाजाची आता ती अध्यक्ष बनली.
गुलाबोने आपल्याच समाजातील इतर स्त्रियांचं आयुष्य सुखकर बनवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणजे ''गुलाबो सपेरा संगीत संस्थान'' या संस्थेची निर्मिती केली. आपल्या सर्पनृत्याचे कार्यक्रम तिने जगभर सादर केले. जवळपास १६५ देशांना गुलाबो सपेराच्या सर्प नृत्याची मोहिनी पडली आहे. युनोस्कोसारख्या जागतिक संघटनेला तिच्या अभिजात कलेची दखल घ्यायला लागली, ह्यात सगळं आलं. ही कला आपल्या पुढल्या पिढीत आणि आपल्या समाजात चालू ठेवण्यासाठी गुलाबो सपेराचे आजही प्रयत्न सुरु आहेत. आज गुलाबो सपेरा एक सेलिब्रेटी नृत्यांगना म्हणुन जगात प्रसिद्ध आहे. भारतातील पारंपारीक नृत्याला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी भारत सरकारने २०१६ साली पद्मश्री सन्मानाने तिचा गौरव केला आहे.
गरीबी, कष्ट, अवहेलना, कुचंबणा ह्यातून जागतिक मंचावर एक सेलिब्रेटी होण्यापर्यंतचा गुलाबो सपेराचा प्रवास थक्क करणारा तर आहेच पण दुर्गाशक्तीचं एक वेगळं रूप दाखवणारा आहे. तिच्या या प्रवासावर दोन फ्रेंच लेखकांनी "Gulabo Sapera, danseuse gitane du Rajasthan (Gulabo sapera, the gypsy dancer from Rajasthan)" नावाचं पुस्तकही लिहीलं आहे. आजही भारतात अनेक ठिकाणी मुलगी होणं म्हणजे पाप समजलं जातं. मुलगी आईच्या पोटात असताना भ्रूणहत्येसारखी कृत्यं आजही केली जातात. आजही पैसे भरून लिंग ओळख करून देणाऱ्या लॅब भारतात मागच्या दाराने सुरू आहेत. आजही भारतात स्त्रीला तिचा सन्मान दिला जात नाही. आज दुर्गेचा उत्सव साजरा होत असताना दुर्गाशक्तीच्या स्त्री रूपाचा आदर आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवा. मृत्यूच्या दाढेतून परत येऊन आपला मानसन्मान मिळवताना भारताचा तिरंगा अटकेपार रोवणाऱ्या पद्मश्री गुलाबो सपेरा यांना माझा कुर्निसात आणि त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
- विनीत वर्तक