पुढलं लक्ष्य - मित्र तारा (अल्फा सेंटौरी) - भाग १

युवा विवेक    15-May-2021   
Total Views |

star_1  H x W:  
शाळेत विज्ञान शिकताना मित्र तार्याचे नाव जवळपास प्रत्येकाच्या कानावर पडलं असेल. आपल्याला सूर्यानंतरचा दुसरा कोणता तारा जवळचा असेल तर तो म्हणजे मित्र तारा किंवा अल्फा सेंटौरी. पण मज्जा अशी आहे की ज्याला आपण मित्र तारा (अल्फा सेंटौरी) असं म्हणतो खरं तर तो तीन ताऱ्यांचा समूह आहे. अल्फा सेंटौरी ही एक ट्रिपल स्टार सिस्टीम आहे. सूर्यापासून जवळपास ४.३७ प्रकाशवर्ष (एक प्रकाशवर्ष म्हणजे साधारण ३ लाख किलोमीटर/ सेकंद या वेगाने एका वर्षात कापलेले अंतर) अंतरावर ही सिस्टीम आहे. यातले सर्वच तारे समान अंतरावर नाहीत. त्यामुळे सूर्याजवळचा सगळ्यात जवळचा तारा हा या तीन ताऱ्यांपैकी एक म्हणजेच प्रॉक्सिमा सेंटौरी आहे. जो साधारण ४.२४ प्रकाशवर्ष लांब आहे. नक्की मित्र तारे कसे आहेत? आणि आपलं पुढलं लक्ष्य ते का असणार आहेत? तसेच इतक्या दूरवर मानवनिर्मित यान येत्या काळात कसं पोहचणार आहे ते जाणून घेणं खूप रंजक आहे.
वर लिहिल्याप्रमाणे मित्र तारे ही ट्रिपल सिस्टीम आहे. याचा अर्थ ह्या सिस्टीम मधे तीन तारे आपसात बांधलेले आहेत. यातील पहिल्या ताऱ्याला अल्फा सेंटौरी ए, दुसऱ्याला अल्फा सेंटौरी बी तर तिसऱ्याला अल्फा सेंटौरी सी किंवा प्रॉक्सिमा सेंटौरी असं म्हंटल जाते. अल्फा सेंटौरी सिस्टीम चा शोध जोहान बेयर ने १६०३ साली लावला. तर प्रॉक्सिमा सेंटौरी हा त्यातला तिसरा तारा रॉबर्ट इंन्स याने १९१५ साली शोधला. त्या दोन ताऱ्यांपेक्षा नवीन शोधलेला तारा जवळ असल्याने त्याने त्याला 'प्रॉक्सिमा' असं नामकरण केलं. प्रॉक्सिमा या शब्दाचा लॅटिन अर्थ जवळ असा होतो. प्रॉक्सिमा सेंटौरी आपल्या दोन भावंडांपेक्षा तब्बल १ ट्रिलियन किलोमीटर (६२० बिलियन माइल्स ) सूर्याच्या जवळ आहे. अल्फा सेंटौरी ए आणि बी हे बायनरी तारे आहेत. हे दोन तारे समान मध्यातून एकमेकांभोवती ८० (७९.९१) वर्षात एकमेकांभोवती फिरतात. ही कक्षा वर्तुळाकार नाही. जेव्हा ते जवळ येतात तेव्हा साधारण सूर्य आणि शनी ग्रहाइतकं त्यामध्ये अंतर असते तर जेव्हा एकमेकांपासून लांब जातात तेव्हा हे अंतर सूर्य आणि प्लूटो इतकं असते. अल्फा सेंटौरी ए आणि बी पासून प्रॉक्सिमा सेंटौरी जवळपास १३,००० पट एस्ट्रोनिमिकल अंतरावर आहे. ( १ एस्ट्रोनिमिकल युनिट म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यातील सरासरी अंतर ) पृथ्वीवरून बघताना मात्र हे अल्फा सेंटौरी ए आणि बी दोन्ही तारे एक आहे असं उघड्या डोळ्यांना दिसते. हे दोन्ही तारे रात्रीच्या अंधारात ३ ऱ्या क्रमांकाचे तेजस्वी तारे आहेत. (सिरीयस आणि कॅनोपस ताऱ्याची तेजस्वीता या ताऱ्यांपेक्षा जास्ती आहे.)
अल्फा सेंटौरी ए :- हा तारा सूर्यापेक्षा १.१ पट वस्तुमानात मोठा आहे. त्याचवेळी त्याची तेजस्विता सूर्यापेक्षा १.६ पट प्रखर आहे. ह्या ताऱ्याच्या पृष्ठभागाचे तपमान साधारण ५५०० डिग्री सेंटीग्रेड आहे. सूर्यापेक्षा हे कमी असलं तरी सूर्यापेक्षा २५% त्याचा पृष्ठभाग जास्ती असल्याने त्याची तेजस्विता सूर्यापेक्षा प्रखर आहे.
अल्फा सेंटौरी बी :- हा तारा सूर्यापेक्षा वस्तुमानात लहान आहे. सूर्यापेक्षा याच वस्तुमान ०.९०७ पट आहे. तर तेजस्विता फक्त ०. ४४५ पट आहे. सूर्याच्या तेजस्वितेच्या अर्ध्याहून कमी. या ताऱ्याच्या पृष्ठभागाचे तपमान साधारण ५००० डिग्री सेल्सिअस च्या आसपास आहे.
प्रॉक्सिमा सेंटौरी किंवा अल्फा सेंटौरी सी :- हा एक रेड ड्वार्फ तारा आहे. रेड ड्वार्फ पद्धतीचे तारे आपल्या आकाशगंगेत विपुल संख्येने आढळतात. यांना थंड तारे असंही म्हणतात. यांच्या पृष्ठभागाचे तपमान साधारण १५०० ते १८०० डिग्री सेल्सिअस इतकं असते. जे की इतर ताऱ्यांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. कमी तापमानामुळे यांची तेजस्विता कमी असते. प्रॉक्सिमा सेंटौरी तेजस्वितेत सूर्यापेक्षा २०,००० पट कमी आहे. प्रॉक्सिमा सेंटौरी आपल्याला सगळ्यात जवळचा तारा असला तरी त्याच तेज अतिशय कमी असल्याने नुसत्या डोळ्यांना आकाशात तो दिसून येत नाही.
जे आपल्याला सांगितलं गेलं होत की मित्र तारा जवळचा आहे तर ह्या मित्र तार्याचे तीन भावंडं मिळून एक कुटुंब आहे. ह्या कुटुंबात अजूनही काही माहित असलेल्या तर काही माहित नसलेल्या सदस्यांचा समावेश आहे. ते सदस्य कोण? त्यांच आपल्यासाठी काय महत्व? ते आपण त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी काय करत आहोत हे पुढल्या भागात.
क्रमशः
- विनीत वर्तक