गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या बोईंग कंपनीच्या एफ १५ इ एक्स लढाऊ विमानाला अमेरिकेने भारताला विकण्यासाठी मंजुरी दिली. या बातमीमुळे भारत आणि अमेरिका जवळ येणार आणि भारत ती विमान खरेदी करणार ह्या चर्चांना उधाण आलं आहे. मुळात भारताला अश्या विमानांची गरज आहे का? असली तर अमेरिकेने विकण्याची तयारी दाखवलेली विमान ती पूर्ण करू शकतात का? त्याच सोबत अमेरिका तंत्रज्ञान हस्तांतरण करणार का? असे सर्व प्रश्न समोर आहेत. भारत आणि भारतीय वायू दल त्यांना योग्य ती लढाऊ विमान विकत घेईल पण नक्की कोणत्या निकषावर ती घेतली जातील ह्यासाठी भारताची गरज आणि भारतासमोरील पर्याय यांचा विचार सामान्य माणसाला कळायला हवा. ते समजून घेण्यासाठी आधी थोडी प्राश्वभूमी समजून घेणं महत्वाच आहे.
भारताला वायू दलाला सध्या भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लढाऊ विमानांची प्रकर्षाने गरज आहे. गेल्या काही वर्षात लाल फितीत अडकलेल्या लढाऊ विमान खरेदी संदर्भातील अनेक करारांमुळे तसेच तेजस विमानाच्या निर्मितीत झालेल्या उशिरामुळे भारतीय वायू दलाची भिस्त ही जुन्या कालबाह्य झालेल्या विमानांवर आहे. यातील अनेक विमान ही येत्या काही वर्षात निवृत्त होणार आहेत. भारताला असणाऱ्या प्रामुख्याने दोन महत्वाच्या शत्रूंपासून (चीन- पाकिस्तान) रक्षण करण्यासाठी भारतीय वायू दलाला ४२ स्क्वाड्रन ची गरज आहे. ही संख्या आता ३० च्या आसपास कमी झाली आहे. एका स्क्वाड्रन मध्ये साधारण १८ लढाऊ विमान असतात. ह्याचा अर्थ भारतीय वायू सेनेला २५० च्या आसपास लढाऊ विमानांची गरज आहे. त्यातील ३६ राफेल, ८३ तेजस मार्क १ ए, १२ सुखोई ३० एम के आय आणि २१ मिग२९ भारतीय वायू सेनेने मागवली आहेत. उरलेली गरज भागवण्यासाठी भारतीय वायू सेनेने टेंडर मागवली आहेत.
उरलेल्या जवळपास ११४ लढाऊ विमानाचा १५ बिलियन अमेरिकन डॉलर चा हा करार असणार आहे. तर ह्या करारासाठी अनेक बडे देश उत्सुक आहेत. अमेरिका, रशिया, फ्रांस, स्वीडन, युरोपियन युनियन सारख्या देशांनी आपली मातब्बर लढाऊ विमान ह्या निमित्ताने स्पर्धेत उतरवली आहेत. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की भारताची गरज आणि तंत्रज्ञान ह्या सोबत मोजावी लागणारी किंमत ह्या सगळ्याच्या निकषावर भारतीय वायू दल ही खरेदी करणार आहे. लढाऊ विमानांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचे ढोबळमानाने तीन प्रकार पडतात. १) लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट २) मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट ३) हेवी कॉम्बॅट एअरक्राफ्ट ह्या प्रत्येक प्रकारातील लढाऊ विमान एखाद्या देशाकडे असणं गरजेचं असते. म्हणूनच भारताकडे वेगवेगळ्या राष्ट्रांची तसेच स्वदेशी लढाऊ विमानांची फौज आहे.
लढाऊ विमानांचे प्रकार हे त्यांच्या थ्रस्ट / वेट या प्रमाणावर अवलंबून असतात. जितकं हे प्रमाण जास्ती तितकं ते लढाऊ विमान हलकं समजलं जाते. उदाहरण द्यायचं झालं तर स्वदेशी तेजस थ्रस्ट / वेट हे प्रमाण १.०७ इतकं आहे. त्याच वेळी राफेल चं ०.९८८ तर सुखोई एम के आय च १ आहे. त्यामुळे तेजस ला लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट असं म्हंटल जाते. त्याच थ्रस्ट / वेट हे प्रमाण जास्ती असल्याने ते अतिशय हलकं आहे. हलकं असल्यामुळे हवेतून अतिशय चपळाईने उड्डाण भरू शकते. (highly maneuverable). यांचा मुख्य उपयोग लढाईत दुसऱ्या फळीतील लढाऊ विमान म्हणून होतो. शत्रूच्या एखाद्या विमानाने भारताच्या हद्दीत प्रवेश केला तर त्याला निष्प्रभ करण्यासाठी तेजस आपलं मुख्य अस्त्र असणार आहे. आता बघू सध्या भारतीय वायू दलात दाखल होणारी राफेल लढाऊ विमान. राफेल हे मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. राफेल विमान घेताना ज्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं आहे ते म्हणजे रडार वर त्याची माहिती मिळण्याची शक्यता. राफेल च्या स्पेक्ट्रा सिस्टीममुळे ते जवळपास रडार वर अदृश्य असते. आता लक्षात आलं असेल की राफेल ची जबाबदारी ही शत्रूच्या गोटात वार करणे ही आहे.
राफेल रडार वर अदृश्य राहून शत्रूच्या प्रदेशात असलेल्या तळांवर तसेच गरज पडल्यास हवेतल्या हवेत शत्रूच्या गोटात जाऊन त्यांच्या लढाऊ विमानांना नष्ट करण्यास सक्षम आहे. राफेल तब्बल ३००० किलोमीटर पेक्षा जास्ती अंतर एका उड्डाणात कापण्यास सक्षम आहे. ह्या काळात शत्रूच्या नजरेत न येण्यासाठी राफेल वर स्पेक्ट्रा प्रणाली आणि स्वतःच रक्षण करण्यासाठी मेटॉर, स्कॅल्प, आणि हॅमर सारखी क्षेपणास्त्र बसवली गेलेली आहेत. हे प्रत्येक क्षेपणास्त्र आपापल्या श्रेणीत सर्वोत्तम आहेत. ह्यासाठी आपण राफेल विकत घेण्यासाठी खूप जास्ती किंमत मोजली आहे. कारण शत्रूला नेस्तनाबूत करण्याची ताकद आणि तंत्रज्ञान राफेल मध्ये आहे. राफेल हे पहिल्या फळी आणि दुसऱ्या फळी मधील दुवा असणार आहे. राफेल जग्वार आणि मिग २७ ह्या जुन्या झालेल्या विमानांची जागा घेणार आहे. या नंतर येतात ती हेवी कॉम्बॅट एअरक्राफ्ट. त्यासाठी आपल्याकडे सुखोई एम के आय ३० उपलब्ध आहेत. हेवी कॉम्बॅट एअरक्राफ्ट शत्रूच्या एकदम खोलवर हल्ला करण्यास सक्षम असतात. सुखोई आपल्या सोबत ३८ टनापेक्षा जास्ती भार घेऊन उड्डाण भरू शकतात. ब्राह्मोस सारखं क्षेपणास्त्र घेऊन जाण्यास ती सक्षम आहेत. त्यामुळे ही विमान युद्धाच्या काळात पहिल्या फळीत असणार आहेत.
वर उल्लेख केलेल्या विमानांसोबत भारतीय वायू दलाकडे सद्यस्थितीला इतरही लढाऊ विमान आहेत जशी जग्वार, मिराज २०००, मिग २७, मिग २९, मिग २१ पण त्यांची संख्या कमी आहे. आपण त्यांना सपोर्टींग रोल मध्ये बघू. येत्या काळात भारताची मुख्य मदार ही वर उल्लेख केलेल्या लढाऊ विमानांवर असणार आहे. भारताकडे सुखोई जवळपास २५० च्या आसपास आहेत. तर लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट साठी आपण नुकतीच तेजस ची ऑर्डर दिलेली आहे. आता वाचल्यावर लक्षात येईल की आपल्याकडे सध्या कमी आहे ती मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट ह्या प्रकारामधील. त्यासाठी भारत जो नवीन ११४ विमानांचा करार करणार आहे तो ह्याच प्रकारातील लढाऊ विमानांसाठी आहे. आपल्याकडे नवीन फक्त ३६ राफेल असणार आहेत. ती ही पूर्णतः तयार राहण्यासाठी २-३ वर्षाचा कालावधी जाणार आहे. यासाठीच भारताला तातडीने त्या ११४ विमानांची गरज आहे. फ्रांस आणि भारत यांच्यात अजून ३६ राफेल विमानांची बोलणी सुरु आहेत पण जर भारताने १०० पेक्षा जास्ती विमानांची ऑर्डर राफेल ला दिली तर त्याच्या इंजिन तंत्रज्ञानासह संपूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच सर्व विमान मेक इन इंडिया मार्फत भारतात बनवण्याची ऑफर फ्रांसने भारताला दिलेली आहे अशी चर्चा आहे.
अमेरिका जे एफ १५ इ एक्स विमान भारताला देत आहे ते मुळातच हेवी कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. नक्कीच आजवरचा त्याचा रेकॉर्ड आणि त्यातील तंत्रज्ञान ह्यावर चर्चा आणि मतभेद होऊ शकतील. पण मुळातच भारताची गरज ती नाही. त्याचसोबत अमेरिका तंत्रज्ञान हस्तांतरण करेल का नाही? ह्या बद्दल काही ठोस समोर आलेलं नाही. एकदा चर्चेला बसल्यावर समोर काय गोष्टी टेबल वर मांडल्या जातात ह्यावर भारत कोणतं लढाऊ विमान खरेदी करेल हे नक्की होईल. भारत एकाच कंपनीला ११४ ची ऑर्डर न देता ५०-५० टक्के अश्या पद्धतीने आपली फ्रंटलाईन फोर्स तयार करू शकतो. अश्या जर तरच्या अनेक शक्यता आहेत. त्यावर आत्ता भाष्य करणं योग्य होणार नाही. एक मात्र नक्की की एफ १५ इ एक्स च्या येण्यानं स्पर्धेत चुरस वाढली आहे. जेव्हा स्पर्धा अटीतटीची असते तेव्हा खूप साऱ्या गोष्टी खरेदी करणाऱ्याच्या फायद्याच्या होतात. त्यामुळे एकूणच भारत कोणतं विमान खरेदी करतो हे बघणं रंजक असणार आहे.
- विनीत वर्तक