“आई शप्पथ! काय सुंदर फोटो आहे हा!”
“एन्जॉय बडी!”
“व्वा! किती जळतेय मी तुझ्यावर! डाएटमुळे काही मनासारखं खाता येत नाहीये!"
“हे! आपण भेटल्यावर मला हीच ट्रीट हवीये.”
“तुझ्यासारखं मजेत जगता यायला हवं.”
केदारची शनिवारची सकाळ नुकतीच उजाडली होती. शुक्रवारी रात्री त्याने ‘वीकएंड बिगिन्स’ या कॅप्शनसकट पिझ्झाचा फोटो काढून फेसबुकवर पोस्ट केला होता. त्याच्या अगदी लेटेस्ट आयफोनवरून, त्या विशिष्ट ॲन्गेलने काढलेला फोटो खरोखरच सुंदर होता. फोटो पोस्ट करून रात्री त्यानं पिझ्झा खाता-खाता त्याच्या आवडीचा सिनेमा लावला. खाऊन झाल्यावरसुद्धा बराच वेळ तो सिनेमा बघत होता. एकीकडे फोटोवर येणाऱ्या कॉमेंट्स, लाईक्स बघत होता. काहींना रिप्लाय देत होता. तेवढ्यात त्याच्या शाळेच्या व्हाट्ॲप ग्रुपवर धिंगाणा सुरू झाला. त्याच्या शाळेचे दोन ग्रूप्स होते. एक मुला-मुलींचा एकत्र आणि एक खास, फक्त मुलांचा. त्यातल्या मुलांच्या ग्रूपवर धिंगाणा सुरू झाला की, त्या मजेत दोन-तीन तास तरी सहज निघून जायचे. त्या वेळेस ग्रूपमधले ऑफलाइन असणारे मित्र नंतर ऑनलाइन यायचे आणि सगळे मेसेज वाचून रिप्लाय करत बसायचे. मग त्यांच्याशी बोलायला अजून काही जण मेसेज करायचे आणि ही अशी मेसेजची साखळी चांगले ६-७ तास चालायची. केदारला हे मेसेज वाचता-वाचता, बोलता बोलता कधी झोप लागली ते समजलंच नाही. त्या नादात त्याला त्याच्या फेसबुक पोस्टचा विसरच पडला.
आता शनिवारी सकाळी आठ वाजता जाग येता-येताच त्याला कालच्या या फोटोची आठवण झाली आणि कुशीवर वळून त्यानं लगेच फोन घेऊन फेसबुक उघडलं. डोळ्यांवर झोपेचा अंश शिल्लक होता. एकच डोळा कसाबसा उघडून त्यानं थोडे नोटिफिकेशन्स बघितले. मित्र-मैत्रिणी त्याच्या पोस्टवर तुटून पडले होते. काहींनी मेसेंजरवरसुद्धा मेसेज केले होते. कॉफी पिताना ते चवीचवीनं वाचू म्हणून त्यानं फेसबुक बंद करून व्हाट्सॲप उघडलं. त्याला झोप लागल्यावरसुद्धा ग्रूपमध्ये मस्त धिंगाणा चालू होता. दात घासून, कॉफी करताकरता त्यानं ते सगळे मेसेज वाचून काढले. तोवर टोस्टरमध्ये चार ब्रेड स्लाइस टाकले होते, ते वर आले. मग तो आरामात सोफ्यावर बसला, पाय समोरच्या टेबलवर ठेवले, बाजूला एक्सटेंशन घेऊन फोन चार्जिंगला लावला, सोबत म्हणून उगीच टीव्ही चालू केला आणि आरामात एकेक कॉमेंटला रिप्लाय द्यायचं त्याचं आवडीचं काम सुरू केलं.
केदार.... तिशीच्या आतला एक रूबाबदार मुलगा. कामाच्या निमित्तानं तो घरापासून दूर होता. शाळेतले, कॉलेजमधले मित्र सगळे इथंतिथं पांगले होते. ऑफिसमध्ये कुणी खास म्हणावं असं मैत्र अजून मिळालं नव्हतं, पण फेसबुकवर मात्र त्यानं काही ओळखीचे काही अनोळखी असं बरंच मित्रमंडळ जमवलं होतं. या मित्रांच्यात त्याला इतकं बरं वाटायचं की इतर लोकांशी ओळख,भेटीगाठी त्याला नकोच वाटायच्या. फेसबुकवरच्या अनेक मित्रांना तो प्रत्यक्ष भेटला ही नव्हता आणि त्याला भेटायची इच्छासुद्धा नव्हती. आपले फोटो, विचार हे इथे लिहायचे एवढं त्याला माहीत होतं. त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया त्याला हुरूप द्यायच्या. घरापासून दूर असणाऱ्या कित्येक कंटाळवाण्या संध्याकाळी त्याला या मित्र-मैत्रिणींचा आधार वाटला होता. स्वतः पोस्ट करणं, वेगवेगळ्या विषयांवर मतं मांडणं, स्वतःच्या आयुष्याबद्दल भरभरून लिहिणं हे सगळं तर त्याचं चालू होतंच, पण त्याच्या जोडीला इतर लोकांनी लिहिलेलं वाचणं, त्यावर विचार करणं हे देखील तो आवडीनं करायचा.
सुरुवातीला त्याच्या या फेसबुकवरच्या वावरण्यात काही खटण्यासारखं नव्हतं, तसं ते आताही नव्हतं. कारण इथे त्यानं फक्त माणसं जोडायचंच काम केलं होतं. कुणाशी पटलं नाही तर, दुर्लक्ष इतकंच त्याला ठाऊक होतं. म्हणूनच त्याच्या पाच-सहा वर्षांच्या फेसबुक आयुष्यात त्यानं कुणाशीही शब्दाला शब्द वाढवून भांडण केलं नव्हतं. हे त्याचं त्याच्यापुरतं असलेलं एक ‘आयडिअल’ जग होतं. बाहेरच्या जगापेक्षा आणि खऱ्या आयुष्यापेक्षा कितीतरी सुंदर असं! या आयडीअल जगात आपले आयडीअल, आचरणात न आणता येण्यासारखे, फक्त ऐकयला, लिहायलाच छान वाटणारे विचार लिहायचे त्यावर छान चर्चा करायच्या, सुंदर फोटो टाकून आपल्या सुंदर आयुष्याची पोचपावती जगाला देणं हे त्याचं त्याच्या ऑफिसच्या वेळेनंतरच काम!
आणि शनिवार, रविवार? ते तर विचारायलाच नको! आज शनिवारचा दिवस उजाडलाच तोच मुळी फेसबुकच्या विचारानं. आतासुद्धा कॉमेंट वाचून, रिप्लाय करून, प्रत्येक रिप्लायच्या रिप्लायमध्ये स्वतंत्र संभाषण करून शेवटी लाईक मोजेपर्यंत चारेक तास सहज झाले होते. मध्येमध्ये बदल म्हणून व्हाट्सॲप ग्रूपवरचं अविरतपणे सुरू असलेला धिंगाणा होताच. सकाळची कॉफी, चार टोस्ट झाल्यावर त्याची परत एकदा कॉफी झाली होती, त्याबरोबर जोडीला बिस्किट्स घेतली होती. दुपारी जेवायचा कंटाळा आल्यानं जेवणाला सुट्टी घेतली होती. त्याऐवजी शेव, फरसाण खाऊन झालं होतं. कॉमेंट आणि लाईकचा जोर जरा कमी झाल्यावर समोर लावलेल्या टीव्हीकडे लक्ष गेलं होतं. मध्ये कंटाळा येऊन एक छोटीशी डुलकी झाली होती. उठल्यावर अजूनच आळस आल्यामुळे थोडक्यात अंघोळ आटपून झाली होती. एव्हाना पोस्ट शिळी झाली होती, पोटात कावळे ओरडण्याच्या बेतात होते आणि एकूणच कंटाळा आला होता. काय करावं म्हणून त्याचं लक्ष सहज घड्याळाकडे गेलं आणि त्याच्यात वेगळाच उत्साह संचारला. पटकन उठून त्याने काल रात्रीचा उरलेला पिझ्झा फ्रीजमधून बाहेर काढला. दिवसभर लावलेलेच असलेले पडदे उघडले. खिडकी पश्चिमेला असल्यानं समोर रंगांची उधळण झाली होती. त्यानं मगासचाच कॉफीचा मग खिडकीची ठेवला आणि त्याच्या बॅकग्राउंडवर असलेले रंग फोनमध्ये पकडले आणि पटकन पोस्ट लिहायला घेतली. अजून एक संध्याकाळ आणि एक अख्खा दिवस त्याला घालवायचा होता.. त्यासाठी ही प्राईम टाईमची वेळ चुकवून उपयोग नव्हता. म्हणूनच परत कॉफी करण्यात त्यानं वेळ वाया घालवला नाही.. नाहीतरी फोटो बघून कप रिकामा आहे का भरलेला हे कुणाला कळणार होतं. फोटो पोस्ट करता करताच त्याच्या डोक्यात उद्यासाठी एका नाजूक विषयावर पोस्टसुद्धा तयार होतीच. कप आणि मन... दोन्हीची तऱ्हा फेसबुकसाठी एकच असल्यानं त्याला ती बिनधास्त पोस्ट करता येणार होती..
फोटो पोस्ट झाला आणि केदारनं पिझ्झाचा बॉक्स मांडीवर ठेऊन, पाठीमाच्या आणि मानेखालच्या उशा सारख्या केल्या.
त्याची वीकएंडची निश्चिंती झाली होती!
- मुग्धा मणेरीकर