चंद्र गंजतो आहे ! काय म्हणालात? हे पटल नाही, पण मंडळी हे खरे आहे ...
मागील वर्षाच्या सुरुवातीलाच शास्त्रज्ञांनी चंद्रावरील वरच्या अक्षांशाजवळील भागात, हरमाटाइट म्हणजेच लोहाचे असे ऑक्साईड, ज्यामध्ये लोहाला गंज लागला की त्याचा रंग लाल होतो, ते चंद्रावरील पृष्ठभागावर शोधून काढले आहे. मंडळी हे तेच ऑक्साइड आहे ज्यामुळे मंगळावरील पृष्ठभागदेखील लालबुंद दिसतो. परंतु, मंगळावर मात्र ह्या लोहाचे ऑक्साइड मिळण्याचे कारण साधे-सरळ आहे. मंगळावर ऑक्साइड आढळते कारण मंगळ ग्रहावर काही काळी वाहणारे पाणी.
चंद्राच्या बाबतीत मिळालेले गंजाचे अवशेष मात्र कोड्यात टाकणारे आहेत. याचे कारण असे की, चंद्रावर लोहाचे प्रमाण आहे. तसेच, चंद्रावर पाणीसुद्धा आधीच आढळून आलेले आहे. परंतु, चंद्रावर ऑक्साइड बनण्यासाठी लागणारा ऑक्सिजन कुठून आला असावा याबद्दल अधिक संशोधन केल्यासच या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.
वरील प्रश्नांचे एक अनोखे उत्तर वैज्ञानिकांना मिळाले आहे. हे उत्तर म्हणजे चंद्रावर ऑक्साइड तयार करण्यास लागणारा ऑक्सिजन हा दुसऱ्या कुठूनही न जाता चक्क तो पृथ्वीच्या वातावरणातून पोहोचलेला असावा! होय हे उत्तर चमत्कारिक असले, तरीसुद्धा हे कारण विज्ञानावर आधारित आहे. चंद्राचा पृथ्वीच्या बाजूला म्हणजेच आपल्याला दिसणारा भाग हा पृथ्वीमुळे सतत सूर्याच्या प्रकोपापासून स्वतःचे संरक्षण करतो. म्हणजेच सूर्यावरून येणारे सोलर वाइंड्स, ह्यामुळे चंद्राचा बराचसा भाग संरक्षित राहतो. परंतु, हे सोलर वाइंड्स पृथ्वीवरून जात असताना ते जाता-जाता, पृथ्वीवरील हवामानातील काही भारीत कण हेदेखील चंद्रापर्यंत वाहून नेतात, असे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. कदाचित ह्या कणांमध्ये ऑक्सिजनचेसुद्धा काही कण असू शकतात, असे शास्त्रज्ञांना वाटते आहे आणि असे कण जपानच्या “कागुआ अवकाश”यानाला आढळून आलेले आहे.
या गंजाबद्दल भविष्यात आणखी माहिती नक्की शास्त्रज्ञ शोधून काढतील. परंतु, सध्या तरी पृथ्वीचा हा उपग्रह मानवाला नव्यानव्या गोष्टींचा विचार करायला भाग पाडणार हे निश्चित. सध्या तरी चंद्राच्या या गंजलेल्या भागाचे निरीक्षण करून याचे नक्की कारण शोधून काढणे आणि भविष्यातील अवकाश मोहिमेच्या जोडीने चंद्रावर पुन्हा एकदा मानव गेल्यावर त्याला अजून काय काय प्रयोग करता येऊ शकतात याचे नियोजन करणे हेच शास्त्रज्ञांसामोरील मोठे उद्दिष्ट असणार आहे.
- अक्षय भिडे