आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य नावाचा प्रचंड, विशाल तारा आहे. जसजसे आपण सूर्यापासून लांब जाऊ लागतो, तसतसे आपल्याला अनुक्रमे - बुध, शुक्र, पृथ्वी, त्यानंतर मंगळ, मग लघुग्रहांचा पट्टा, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून हे आपल्या सूर्यमालेतील घटक ग्रह लागतात. त्यानंतर येतो प्लूटो नावाचा ग्रह, ज्याला आपण आपल्या सूर्यमालेतून बाहेर काढले आहे. सूर्यापासून प्लूटो इतक्या लांब अंतरावर आहे की, सूर्यापासून प्लुटोपर्यंत जाण्यास आताच्या सर्वाधिक वेगाच्या रॉकेटने साधारण १५ वर्षे लागतात. मात्र, आपल्या मनात असा प्रश्न येऊ शकेल की, प्लूटोच्या नंतर आपल्या सूर्यमालेत नक्की काय असेल? तर त्याचे उत्तर आहे ऊर्टचा मेघ!
साधारण १९५० मध्ये, जान ऊर्टने या मेघाविषयी पहिल्यांदा सांगितले. त्याने असे सांगितले की, प्लूटोनंतर अतिशय लहान आकाराचे आणि मध्यम आकाराचे असे अनेक लहान-मोठे खडक तरंगत आहेत. यांचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे २००० अॅस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच पृथ्वी आणि सूर्याच्या अंतराच्या सुमारे २००० पट इतके आहे. या ऊर्ट मेघाचे प्रामुख्याने दोन विभाग केले जातात. एक म्हणजे सूर्यमालेतील आतील भाग आणि दुसरा म्हणजे सूर्यमालेच्या सीमेजवळील भाग.या दुसऱ्या भागाच्या शेवटालाच आपल्या सूर्यमालेचा शेवटचा बिंदू मानले गेलेले आहे. हा भाग सूर्यमालेपासून किंबहुना सूर्यापासून प्रचंड दूर असल्याने येथे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम फारच विरळ असा आहे.त्यामुळे एखाद्या बाहेरील बलामुळेसुद्धा या भागातील धूळआणि हिम यांनी बनलेले असे लहान मोठे खडक त्यांच्या स्थिर जागेवरून दुसरीकडे आकर्षिले जातात. या खडकांच्या विस्थापनाला मुख्यत्त्वेकरून आपली आकाशगंगा तसेच इतर सूर्यमालेतील ग्रह-गोल सुद्धा कारणीभूत शकतात.
नासा या अमेरिकेच्या अंतराळसंस्थेने १९७० च्या सुमाराला अवकाशात थोड्या महिन्यांच्या फरकाने दोन अंतराळयाने पाठवलेली होती. या यानांचे मुख्य उद्दिष्टच हे होते की, पृथ्वीपासून सुरुवात करून आणि पृथ्वीपासून लांब जाताना वाटेत जे ग्रह किंवा इतर अवकाशीय वस्तू लागतील, त्या वस्तूंचा अभ्यास करणे आणि त्यानंतर आपले इंधन संपेपर्यंत अनंतकाळाचा असा प्रवास करत सूर्यमालेच्या शेवटपर्यंत पोहोचणे ! या दोनही यानांनी ही मोहीम फत्ते करून दाखवली. आज सुमारे ४० वर्षे होऊनदेखील ही याने पृथ्वीवरील आपल्या बेस स्टेशनच्या संपर्कात आहेत गंमत फक्त इतकीच आहे की, हा संपर्क होण्यास काही तासांचा अवधी लागतो.
या ऊर्ट मेघाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या दिशेने येणारे जवळपास सर्वच धूमकेतू हे याच ऊर्टच्या मेघातून येत असतात. यातील आपल्या परिचयाचा असणारा धूमकेतू म्हणजे “हॅले” चा प्रसिद्ध धूमकेतू. ऊर्टच्या मेघापासून निघून सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्यापर्यंत या धूमकेतूंना येण्यास काही वर्षे किंवा काही शतकेसुद्धा लागू शकतात. याच कारणांमुळे धूमकेतू अवकाशात अगदी क्वचित पाहावयास मिळतात. तर असा हा विविध लहान-मोठे धूलिकण आणि बर्फ यांपासून बनलेल्या खडकांचा ऊर्ट मेघ आपल्या उदरात आणखी कोणती रहस्ये दडवून बसलेला आहे, हे आपणास यानात बसून तिथे गेल्याशिवाय कळणार नाही!
- अक्षय भिडे