दुसरा दिवस फुलपाखरासारखा अलगद गेला. दिवसभर रात्रीच्या संभाषणाची आठवण मोहिनीला येत होती. आजसुद्धा बोलणं होईल का हा प्रश्न मधूनच तिच्या मनात डोकावत होता. काल रात्री झालेलं बोलणं तिला आवडलं होतं. हे असं काही मेसेजेसनं हुरळून जायचं कॉलेजचं अल्लड वय निघून गेलंय याची मधूनच जाणीव व्हायची. सकाळपासून सरांच्या समोरच बसल्यामुळे तिला इच्छा असूनही फोन बघता येत नव्हता. शेवटी लंच ब्रेकच्या काही वेळ आधी सगळे मॅनेजमेंट मीटिंगला गेले आणि मोहिनीनं फोन बाहेर काढला. “गुड मॉर्निंग, ग्रुपमध्ये तुला घेऊ का सांगितलं नाहीस काल.” इतर कुठलेही मेसेज न बघता तला अक्षयचाच मेसेज दिसला. “गुड मॉर्निंग, कर ना.. आवडेल मला.”“जाम झोप येतेय.”“मग कशाला रे जागरणं करायची?”“न केलेल्या काही गोष्टी कराव्यात..”“म्हणजे शाळेचा नवीन ग्रुप काढण्याबद्दल बोलतोयस का?”“हो.. मग आणि काय?”मोहिनीला गालातल्या गालात हसू येत होतं. असे किती तरी मेसेज झाले असतील. शेवटी रात्री बोलू म्हणून तिनं फोन ठेवून दिला आणि शांत व्हायला वाॅशरूममध्ये गेली. या सगळ्या भावना तिला नवीन नव्हत्या. या सगळ्यातून ती गेली होती आणि म्हणूनच याची तिला भीती वाटत होती. सुरुवातीचे हे दिवस संपतात आणि नंतर वेगळी भावनिक आंदोलनं होतात हे तिला माहीत होतं. एका मुलामुळे हुरळून जाण्याचे ते दिवस नव्हते तरी तिच्या नकळत ते घडत होतं.
दिवस दिवसांसारखे जात होते. कधी हळू, कधी वेगानं. दोघांमधला संभाषणाचा दुवा पुढे जात होता. एरवी लोकांपासून दूर राहणारी, आपले चार मित्र-मैत्रिणी सोडून इतरांमध्ये न रमणारी मोहिनी स्वतःच पुरती गोंधळून गेली होती. एखादा दिवस अक्षयचा मेसेज आला नाही तर, ती अस्वस्थ व्हायची. अर्थात अशी वेळ जास्त यायचीच नाही. सुरुवातीचे दिवसभराचं बोलणं ओसरलं असलं तरी, संध्याकाळचा वेळ त्यासाठी राखीव असायचा. स्वतःपुरता मर्यादित असणाऱ्या संध्याकाळच्या वेळेत मोहिनीला अक्षयचा आभासी का होईना सहवास हवा असायचा. प्रत्यक्ष भेटीचं काहीच बोलणं झालं नसलं तरी, दोघांच्या संवादाची गाडी बरीच पुढे गेली होती. इतकी पुढे की, मोहिनीनं तशी पुसटशी कल्पना तिच्या घरीसुद्धा दिली होती. अर्थात यामध्ये तिनं नाव, गाव हे उल्लेख टाळले होते. शाळेचं रियुनियन हे दोघांच्या बोलण्यामागचं मूळ कारण कधीच मागे पडलं होतं, पण त्याजागी जुनी दुखणी-खुपणी आली होती, स्वतःपुरत्याच मर्यादित असणाऱ्या भावना होत्या. कधी अधिकार होता तर, कधी रुसवे-फुगवे. कसलीच कबुली देता भावनांची जाणीव जपली जात होती. रात्रीच्या बोलण्यात या सगळ्या भावनांना जरा जास्तच उधाण यायचं. “मोहिनी, आज खरं सांग..अजून लग्न का नाही केलंस?” अशाच एका रात्री बोलता-बोलता अक्षयनं विचारलं. “तसा मुलगा नाही मिळाला म्हणून..”“शोधायचा प्रयत्न केलास?”“नाही.”“मग?”“कॉलेज संपल्यावर मी आणि अनुज.. माझ्याच कॉलेजमध्ये होता.. आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो.. पण नाही जमलं. त्यानंतर घरून खूप प्रयत्न चालू आहेत. मला खास प्रयत्न करावेसे वाटत नाहीत.”“अनुजशी टचमध्ये आहेस”“नाही, त्याचं लग्न झाल्यापासून नाही. माहीत नाही सध्या कुठे आहे. आमचे काही कॉमन फ्रेंड्स आहेत, पण ते आमच्याशी बोलताना तेवढी काळजी घेतात..”“त्रास झाला खूप?”“ब्रेकअप नंतर होतो तेवढा झालाच. अनुजला फार त्रास झाला नाही त्याचा जास्त त्रास झाला. त्यानंतरच मी अशी झाले..”“अशी? म्हणजे कशी?”“माणूसघाणी.”“हाहा, कोण म्हणतं तू माणूसघाणी आहेस?”“तोंडावर नाही म्हणत कुणीच, पण मागे म्हणतात. सोड ना, कुठे नको ते विषय? नाही वाटलं कुणाशी लग्न करावंसं म्हणून नाही केलं! बस!”“मग मला इंटरेस्ट का पाठवलास?”मोहिनीच्या डोक्यातून हा विषय पूर्णपणे गेला होता! ज्या गोष्टीमुळे अक्षय कदम हे नाव तिच्या आयुष्यात आलं ती गोष्टच तिच्या लक्षात नव्हती. अक्षयनं सुरुवातीला काहीच विषय न काढल्यामुळे त्याच्या नकळत हे सगळं झालं असेल किंवा त्याच्या लक्षातच आलं नसेल अशी तिनं स्वतःची समजूत करून घेतली होती. त्यामुळे या अचानक आलेल्या मेसेजमुळे ती पुरती गोंधळून गेली. संवादाच्या आणि भावनांच्या अनेक पायऱ्या सर केल्या असल्या तरी, अशा ऐन वेळी उडालेला गोंधळ कसा सावरायचा हे तिला समजलं नाही. अक्षय समोर असता तर काय झालं असतं या विचारानं सुद्धा तिला भीती वाटली. हे मेसेजिंग किती सोयीचं आहे!“ए चल, तू मला इंटरेस्ट पाठवलास!”“म्हणजे तुला माहीत आहे तर!”“खरं सांगू? तुझा इंटरेस्ट बघूनच तुला फेसबुकवर शोधून काढलंस.. मला नव्हतास आठवत तू..”“मला माहितीय…”“मग योगायोग का म्हटला होतास या सगळ्याला?”“तसा तो योगायोगच होता..’“म्हणजे?”“गेलं वर्षभर ब्रिटनमध्ये होतो, तेव्हा घरून लग्नासाठी प्रेशर वाढत गेलं. या साइटवरून मुलगी बघायची, ऑनलाईन भेट ठरवायची, बोलायचं.. जाणून घ्यायचं.. ब्लाब्ला.. मग योग्य वाटलं तर लग्न करायचं..”“मग बघितल्या होत्यास मुली?”“म्हणूनच तर अकाऊंट उघडलं न तिथे… वेडू..”संवादाची नेमकी दिशा मोहिनीच्या लक्षात येत नव्हती. अक्षयनं लवकर बोलावं म्हणून तिनं नुसत्याच फुरंगटून बसलेल्या चेहऱ्याची चिन्हे पाठवली.“हो, बघितल्या एक-दोन…”“मग, का नाही केलंस लग्न?”“बोललो मी त्या मुलींशी.. पण नाही जमलं.. झेपला नाही हा प्रकार. घरच्यांनी हात वर केले, प्रेमात पड लग्न कर नाही तर एखादी मुलगी निवड आणि लग्न कर असा त्यांचा सूर होता. तेवढ्यात तुझं प्रोफाइल दिसलं..”“मी लक्षात होते तुझ्या?”“अगदी व्यवस्थित नाही, पण आठवत होतीस. अनोळखी मुलीशी बोलण्यापेक्षा ओळखीच्या मुलीशी बोलूया म्हणून तुला इंटरेस्ट पाठवला. तू तिथे होतीस म्हणजे तुलाही लग्न करायचं असणारच.. मग म्हटलं दोघांना करायचंच आहे तर एकमेकांशी करून बघू आणि दुसऱ्या दिवशीच फेसबुक सजेशनमध्ये तू दिसलीस. तुझ्या बोलण्याचा सूर वेगळाच लागला आणि हो, तू जरी त्याला योगायोग म्हटलीस तरी तो योगायोग नव्हता हे कळलं बरं का मला…”“हो… मी तेव्हा मुद्दामच तसं सांगितलं… पण मग तू का नाही बोललास सुरुवातीलाच?”“बोलणार होतो, पण आपल्या सुरुवातीच्याच बोलण्यानं मला वेगळंच वाटायला लागलं. कदाचित तेव्हाच सांगून टाकलं असतं तर, हे सगळं इतकं नैसर्गिकपणे घडलं नसतं.. हो ना?”मोहिनी फोन बाजूला ठेवून विचारात पडली. खरंच, आपल्या आयुष्यात, आपल्या स्पेसमध्ये असा अलगद शिरकाव करणं एरवी शक्य नव्हतं. ठरवून करायच्या लग्नामध्ये या भावनासुद्धा अनुभवल्या नसत्या. तशी मनस्थितीच कुठे होती आपली? “ओळखीची मुलगी असल्यावर प्रेम होतं का आपोआप तेही भेटीशिवाय?”“नाही, पण प्रेमात पडणं कदाचित सोपं जाईल.. तुझं माहीत नाही.. मला तरी सोपं गेलं.. आणि अगं ब्रिटनमध्ये असतो तर, भेटलो नसतोच न. तेव्हा तर इतकं बोलणंसुद्धा झालं नसतं. तूही आई-बाबांच्या आग्रहाला बळी पडून काही मुलं बघून शेवटी एक निवडला असतास. मग निवडायचा आहेच कुणी तरी तर, त्यात नैसर्गिकपणा येऊ दे की.”लग्नाच्या बाबतीत इतका सारासार विचार आपल्याला जमला नसता हे मोहिनीला माहीत होतं. यामुळे ती भारावून गेली होती. खरंच किती साधं सोपं होतं हे. यावर काय बोलावं हे समजत नव्हतं. तिला समजत होतं ते फक्त एकच. आता तिच्या या संध्याकाळच्या हक्काच्या वेळेत एक हक्काचा भागीदार आला होता आणि त्याच्याबरोबर तिचा हा खास वेळ घालवताना तिला इतके दिवस फक्त आनंद मिळाला होता. इतर कुठल्या प्रश्नोत्तरांपेक्षा मोठा असणारा आनंद!
समाप्त.
- मुग्धा मणेरीकर