नुकताच १४ मार्च रोजी “पाय डे” साजरा करण्यात आला. पाय म्हणजेच २२/७ किंवा ३.१४ या अंकाला “पाय” किंवा “π” या चिन्हाने संबोधले जाते. हा गणित या विषयातील कदाचित सर्वात महत्वाचा स्थिरांक आहे. गणिताव्यतिरिक्त इतर अनेक विषयांत या स्थिरांकाचे महत्व आहे, जसे की जीवशास्त्र, भौतिक, रसायानशास्त्र आणि अर्थात खगोलशास्त्रात सुद्धा! या स्थिरांकाला वैश्विक स्थिरांकसुद्धा म्हटले जाते. हा जवळपास सर्वच विषयातील एक मुलभूत स्थिरांक आहे. वर्तुळाच्या परीघ आणि व्यासाचे गुणोत्तर म्हणजे “पाय” हा स्थिरांक होय. ज्याची किंमत २२ भागिले ७ अथवा ३.१४ इतकी आहे.
पाय या स्थिरांकाला, “π” असे चिन्ह निश्चित करण्याचे काम ब्रिटीश गणितज्ञ विल्यम जोन्स याने केले आणि नंतर प्रख्यात स्विस गणितज्ञ युलर याने त्याला प्रसिद्धी दिली. पाय ही एक अपरिमेय संख्या असल्याने त्याच्या अपूर्णांकातील अंकांची पुनरावृत्ती होत नाही. त्यामुळे नेहमीच्या गणितांसाठी ३.१४ हीच पायची किंमत वापरली जाते. हा स्थिरांक फारच महत्वाचा असल्याने या स्थिरांकाचा एक दिवस असावा आणि तो जगभर साजरा केला जावा ही कल्पना घेऊन, पाय डे ची संकल्पना पुढे आली. ३ मार्च हाच दिवस यासाठी निश्चित करण्यात आला कारण या अपूर्णांकाची किंमत म्हणजेच या अपूर्णांकातील पहिले तीन अंक म्हणजे ३.१४ हे पहिले तर ३ म्हणजे तृतीय महिना म्हणजेच मार्च आणि १४ ही त्या महिन्यातील तारीख या तर्काने दर वर्षी १४ मार्च ला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी “पाय” नावाचाच पाश्चिमात्य पदार्थ खाऊन अथवा पाय या स्थिरांकातील अंकांची पठण स्पर्धा घेऊन हा दिवस साजरा करण्याची पद्धती पाश्चिमात्य देशात आहे.
इतर सर्व विज्ञान विषयक शाखांप्रमाणेच खगोलशास्त्र या शाखेमध्येसुद्धा या स्थिरांकाचे अनन्यसाधारण महत्व आहे. या स्थिरांकाचा उपयोग वर्तुळाकार खगोलीय वस्तूंच्या कक्षा तसेच त्यांच्या क्षेत्राफाळांचे गणन करण्यासाठी होत असल्याने अवकाश यानांच्या आराखड्याच्या दृष्टीने हा स्थिरांक फारच महत्वाचा ठरतो. नासाने सेरेस या लघुग्रहावर पाठवलेल्या यांच्या बाबतीतसुद्धा या स्थिरांकाचा वापर करण्यात आलेला होता. हे यान त्या लघुग्रहाभोवती वेगवेगळ्या उंचीवरून कोणत्या कक्षांमध्ये फिरेल याचे गणित मांडण्यासाठी पायचा उपयोग केलेला होता. आपण पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण या दोन्हीच्या गणितासाठी पाय चा उपयोग करू शकतो. तसेच गुरूच्या उपग्रहावरील विशाल जलाशयात रासायनिक प्रक्रिया तसेच जैवप्रक्रियांसाठी किती प्रमाणात हायड्रोजन उपलब्ध असेल याचे गणित मांडण्यासाठीसुद्धा याच स्थिरांकाचा वापर करण्यात आला. दोन ताऱ्यांमधील अंतर माहीत करून घेण्याससुद्धा या स्थिरांकाचा वापर केला जातो. यासाठी त्रिकोणमितीच्या अजून सखोल शाखेचीसुद्धा मदत घेतली जाते. तसेच अनेक खगोलीय गणिते करण्यासाठी जी प्रमेये शोधली जातात त्यासाठीसुद्धा याच स्थिरांकाचा सर्रास वापर केला जातो.
प्राचीन बॅबिलोनियन आणि इजिप्शियन संस्कृतींमध्येसुद्धा या स्थिरांकाच्या वापराचे उल्लेख त्यांच्या पपायरस या कागदावर लिखित स्वरूपात मिळतात. अर्याभट्टाच्या गणितांमध्येसुद्धा या स्थिरांकाचे उल्लेख आढळतात. गेल्या काही दशकांतील एक प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यानेसुद्धा त्याच्या जगप्रसिद्ध सापेक्षता या सिद्धांताच्या गणितांमध्ये या स्थिरांकाचा वापर केलेला आढळून येतो. आणखी एक गम्मत म्हणजे याच अल्बर्ट आईन्स्टाईन चा जन्म सुद्धा १४ मार्च याच दिवशी झालेला आहे. याचप्रमाणे अल्बर्ट आईन्स्टाईन नंतर आजच्या काळातील त्याच्या इतका जीनियस मानण्यात आलेला शास्त्रज्ञ म्हणजे स्टीफन हॉकिंग यांनीसुद्धा याच दिवशी जगाचा निरोप घेतला.
असा हा चमत्कारिक पाय “π” हा आकडा, आजही शास्त्रज्ञांना चकित करून सोडतो आहे. आज इतके तंत्रज्ञान पुढारलेले असूनही या अपरिमेय संख्येचा शेवट कधी होईल की नाही हे अजून तरी आजच्या विज्ञानाला सांगता आलेले नाही.
- अक्षय भिडे