शुक्रवार आला की हल्ली रीटायर्ड मिलिंद गोडबोल्यांना धडकीच भरत असे. गुरुवारी रात्री जेवणं आटोपली की झोपायला जातानाच उद्याच्या विचारानं पोटात मोठा गोळा येत असे. सुनंदा, म्हणजे त्यांच्या सौभाग्यवतींना सुद्धा काहीसं असंच होत असे. त्यामुळे गुरुवारी दुपारपासूनच दोघं एका विचित्र तणावाखाली घरात वावरत. त्याला कारण सुद्धा तसंच होतं. गेले दोन महिने रेश्मा आणि विहंग, म्हणजे मिलिंद-सुनंदा यांचा मुलगा आणि सून न चुकता, नित्य नेमाने.. अगदी सातत्यानंच म्हणा नं.. दर शुक्रवारी भांडत होते. बरं भांडणाची कारणं सुद्धा काही फार गंभीर म्हणावी अशी नसतात, त्यामुळेच तर सगळा गोंधळ झाला होता. तोडगा काढायला नेमका प्राॅब्लेम तर माहीत हवा नाही का?
“मी काय म्हणतो.. आता उद्या आपण दोघं मिळून या मुलांच्या प्राॅब्लेमचा काय तो तोडगा काढून टाकू या.. एकदाचा विषयच मिटवून टाकू या… काय?”
बोलायचं का नाही यावर बराच वेळ रवंथ करून झाल्यावर मि. गोडबोले शेवटी झोपायला जाताना मनाचा निग्रह करून एकदाचे बोललेच,
“अहो, कशाला नाही ते त्यांच ते बघून घेतील.. शिवाय विहंगचं लग्न ठरलं तेव्हाच आपण ठरवलं होतं ना उगाच मुलांच्या मध्येमध्ये करायचं नाही म्हणून? त्यांच्या भांडणात आपली ढवळाढवळ नको.. एक करता दोन व्हायचं आणि अजून तिसराच विषय मिळायचा त्यांना भांडायला..”
मिसेस गोडबोल्यांनी बोलायला सुरुवात केली होती. आपलं कुणी ऐकतंय का नाही याचं काही भान न बाळगता बोलणं सुरू ठेवायचं ही त्यांची सवयच होती. बोलण्याच्या ओघात विनाकारण चार-सहा गोष्टी इकडच्या तिकडच्या बोलल्या जायच्याच त्यांच्याकडून. मुलाच्या लग्नानंतर यामुळे सुनेशी वादावादी नको म्हणून मि. गोडबोल्यांनीच काही झालं तरी मुलांच्या मध्ये पडायचं नाही असं सांगतांना अगदी हेच शब्द वापरले होते. आता त्यांचेच शब्द परत फिरून त्यांच्याकडे आल्यावर ते क्षणभर गोंधळले पण नाही यात आपण लक्ष घातलंच पाहिजे या मतावर ते ठाम होते. तसे एरवी काही ते इतका विचार करण्याऱ्यातले नव्हते. म्हणूनच इतके महिने त्यांनी ही भांडणं गंभीरपणे घेतलीच नाहीत.
मुलगा आणि सून दोघंही वेगवेगळ्या कंपनीत नोकरीला आहेत. सून सकाळी ८ ला बाहेर पडते ती संध्याकाळी ७ ला घरी परत येते. मुलाची जाण्याची वेळ जरा उशिराची म्हणजे ११ ची असली तरी त्याचा दोघांना फारसा उपयोग व्हायचा नाही कारण त्याची घरी परत यायची वेळ म्हणजे रात्रीचे ९! कित्येकदा तर ही सकाळी निघायच्या वेळेला तो झोपलेला असतो आणि त्याची घरी परत यायची वेळ होत आली की हिची बॅटरी डाऊन होत आलेली असते. पण ही मुलं आठवडाभर एकमेकांवर आजिबात चिडचिड करत नाहीत. एकमेकांना वेळ देता आला नाही, एका घरात राहूनही व्यवस्थित भेट होऊ शकत नाही या गोष्टी त्यांनी स्वीकारल्याच होत्या. पाच दिवस जीव ओतून काम करायचं, आपापलं स्वतंत्र आयुष्य जगायचं आणि शुक्रवार रात्र ते रविवार संध्याकाळ दोघांनी मिळून मस्त मज्जा करायची. एकमेकांना वेळ द्यायचा, बाहेर फिरायला, जेवायला जायचं, खरेदी करायची किंवा काही न करता घरात आराम करायचा.
सुरुवातीला सुनंदा-मिलिंद दोघांना या सिस्टीमचं भलतंच कौतुक वाटलं होतं. आठवडाभर एकमेकांची धड भेट न झालेली पोरं शुक्रवार संध्याकाळची किती आतुरतेनं वाट बघायचे हे त्यांना दिसत होतं. शुक्रवारी जेवणं आटोपल्यावर दोघं रात्री उशिराच्या मूव्हीला किंवा कॉफी प्यायला जायचे. दुसऱ्या दिवशी उठायची घाई नसायची. आरामात उठून नाश्ता घरीच करून कुठे बाहेर जायचं, काय काय करायचं याचा सगळा बेत शुक्रवारी रात्रीच्या त्यांच्या या डेटमध्ये ते ठरवत होते. मिलिंद-सुनंदानं नातेवाईकांमध्ये सुद्धा या गोष्टीचं कौतुक केलं होतं, पण हळूहळू मात्र याचा अतिरेक होतोय असं मिलिंदच्या लक्षात आलं. शुक्रवारी रात्री विहंग घरी यायचा अवकाश की दोघांची चर्चा रंगायची उद्याच्या शनिवारबद्दल. रात्र थोडी सोंगं फार म्हणतात त्यातलीच गत झाली होती. सिनेमा, हॉटेल्स, आऊटिंग्स, रिसोर्ट्स… किती पर्याय असतात हल्ली आणि दोन दिवसात यापैकी नक्की किती निवडणार? कुठे कुठे जाणार?
हल्ली तर हे नेहमीचंच झालं होतं. शुक्रवार संध्याकाळ आली की वादावादी ठरलेली. विहंगनं एक ठरवलं तर रेश्माला दुसरं काहीतरी हवं असतं. बरं, काय करायचंय यावर जरी दोघांचं एकमत झालं तरी पुढे कुठे जायचं हा प्रश्न असायचाच. म्हणजे जरी शनिवारी एखादा सिनेमा बघून मग जेवायला जाऊ असं दोघांचं ठरलं तरी कुठला सिनेमा, कुठलं थेटर हे प्रश्न असायचेच. जेवणाचे तर असंख्य प्रकार आणि भरपूर हॉटेल्स! मग निवड करताना अक्षरशः नाकी नऊ यायचे. शुक्रवार आला की मुलांबरोबरच सुनंदा आणि मिलिंदला सुद्धा पूर्वी उत्साह वाटायचा पण हल्ली हल्ली, म्हणजे गेल्या दीड-दोन महिन्यात तर शुक्रवारी सकाळपासूनच घरात तणावपूर्ण वातावरण व्हायचं.
नवरा-बायकोमध्ये असे वाद होत असतात, असे वाद मिटले की मगच तर नात्यातला गोडवा वाढतो, कामाचा ताण असेल असं म्हणून मिलिंदनं या भांडणांकडे दुर्लक्ष केलं.
सुनेला घेऊन चार दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जा असा सल्ला सुद्धा देऊन बघितला पण तो त्याच्याच अंगाशी आला. दोघांनी मिळून कुठे जायचं याची यादी काढली, त्यातलं ठिकाण नक्की ठरेपर्यंत एक दिवस गेला मग तिथली हॉटेल्स शोधण्यात अजून एक दिवस गेला. त्यावरून इतक्या चर्चा, इतका गोंधळ की त्याचं ही रूपांतर शेवटी वादावादीतच झालं आणि मग ट्रीपचा मूडच उरला नाही. मग चिडचिड करत, एकमेकांना दोष देत पूर्ण आठवडा गेला आणि मग शुक्रवारच्या या महाभयंकर टेंशनला सामोरंच जायला नको म्हणून दोघांनी आपापले स्वतंत्र प्रोग्रॅम ठरवले.
मध्ये एकदा, कसलीशी सुट्टी आली होती म्हणून चौघांनी रात्री जेवायला जायचा बेत ठरवला. दुपारी चहाच्या वेळेपासून मोबाईलवर हॉटेल शोधणं सुरू झालं ते अगदी कारमध्ये बसेपर्यंत सुरूच होतं. शेवटी सोसायटीतून बाहेर पडताना कार उजवीकडे वळवायची का डावीकडे वळवायची हा दुसरा प्रश्न निर्माण झाल्यावर पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाईलाजानं का होईना शोधावंच लागलं. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर सुद्धा काही वेगळी गत नव्हती. मिलिंद-सुनंदाचं काय खायचं हे ५ मिनिटात ठरलं पण या दोघांचा गोंधळच. रेश्माच्या कोणत्यातरी ग्रुपवर अमुक एका पदार्थाची शिफारस झाली होती पण त्याच पदार्थाबद्दल विहंगच्या मित्राने निगेटिव्ह रिव्हू लिहिला होता. असं करता करता शेवटी पंधरा मिनिटांनी काय मागवायचं ते ठरलं पण जेवणाचा शेवट मात्र 'याच्यापेक्षा आधी ठरवलेल्या ठिकाणी गेलो असतो तर मज्जा आली असती….’ असाच झाला. सुनंदाला खरं तर जेवणानंतर कुल्फी किंवा मस्तानी खायची इच्छा झाली होती. पण पुढच्या सगळ्या गोंधळाचा अंदाज घेऊन ती बिचारी गप बसली.
“नंदा, प्रॉब्लेम काय आहे सांगू का? ही मुलं न प्रत्येक गोष्टीचं टेंशन घेतात.. अगदी एन्जॉयमेंटचं सुद्धा! अरे! मज्जा करायला जात आहात.. त्यात एवढा विचार कशाला? जरी सगळं १०० टक्के तुमच्या मनासारखं झालं नाही तरी चलता है ना!”
मुलांच्या मध्ये बोलायचं नाही असा पवित्रा मिसेस गोडबोल्यांनी घेऊन सुद्धा मिस्टर गोडबोले काही तो विषय सोडायला तयार नव्हते.
“अहो, त्यांना कामामुळे तशी सवयच झालीये. प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत बसायची.. आता उद्या बघू काय करतायेत ते… दोन तीन दिवसांपूर्वी रेश्मा म्हणत होती की तुमचं.. म्हणजे आपलं.. बरंय. तुमचं काय सगळं पटापट ठरतं.”
नवरा विषय वाढवत होताच त्यामुळे सुनंदा सुद्धा तिच्या आणि रेश्माच्या झालेल्या बोलण्याबद्दल सांगू लागली.
गप्पा मारता मारता सुनंदाचा आधी डोळा लागला आणि गप्पांच्या ओघात हातात काहीतरी लागलंय याचा पुरेपूर आनंद घेऊन झाल्यावर मिलिंदराव सुद्धा कुशी बदलून झोपी गेले.
----
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवारी सकाळी मिलिंद गोडबोले फुल फॉर्ममध्ये आले. मुलं अजून झोपलेली होती. सुनंदानं चहा समोर आणून ठेवला आणि ‘काय हो? नक्की आहे ना आपलं?’ या अर्थानं डोळे मोठे करून भिवया वर केल्या.
“हो, हो.. जा जा तू पटकन आत..” हातानं इशारा करत मिस्टर गोडबोले खुसफुसले.
आधी रेश्मा उठून आली. किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी चहा ओतून घेतला, सुनंदानं पोहे केले होते ते मिलिंदला दिले आणि त्याच्या समोरच्याच खुर्चीत येऊन बसली. पाठोपाठ विहंग उठला. त्यानंही स्वतःसाठी चहा घेतला, प्लेटमध्ये पोहे भरून घेतले आणि काही न बोलता टेबलवर येऊन बसला. नेहमीप्रमाणे त्यांना वीकएंडचं प्रेशर आलं होतं हे दिसतच होतं.
“चला, झाली सगळी तयारी जेवणाची.. फक्त भाजीला फोडणी द्यायची आहे आणि कोशिंबिरीत दही घालायचं आहे. पोळ्या सुद्धा करून ठेवल्यात…” म्हणत सुनंदा सुद्धा स्वतःसाठी आणि रेश्मासाठी पोहे घेऊन बाहेर आली.
“अगं, नंदा.. विसरलीस का? आज आपल्याला बाहेर जायचंय..काल रात्री बोललो न तुला?”
दोन्ही गोडबोले गालातल्या गालात हसत होते.
“अगंबाई, पण आज गिझर रिपेअरिंगवाला येणार आहे ना? कुणीतरी घरी हवं.. २ आठवडे वाट बघून त्याची वेळ मिळवली आहे मी.”
“आई, आम्ही थांबतो घरी” विहंग पटकन म्हटला.
“चला बरं झालं. आम्ही येऊ संध्याकाळी. काही करत बसू नकोस. आम्ही येताना पार्सल आणू.”
सुनंदा आनंदानं म्हटली. रेश्मानं मान डोलावली.
-------
जेवणाच्या वेळेपर्यंत आरामात टिव्ही बघून झाल्यावर रेश्मा किचनमध्ये कोशिंबिरीत दही घालायला उठली. तिच्या मागे पानं घेण्यासाठी हा सुद्धा उठला. सगळं तयारचं होतं, काही ठरवायचं नव्हतं की कसले पर्याय नव्हते. रात्रीचं भांडण कधी मिटलं ते समजलं सुद्धा नाही. दोघं गप्पा मारत छान जेवले. आपल्या बाल्कनीतून सनसेट दिसतो याची कितीतरी दिवसांनी दोघांना जाणीव झाली. विहंगनं मस्त कॉफी केली.
“यु नो विहंग, परवा आई म्हणत होत्या.. कधी कधी पर्याय शोधू नयेत.. निखळ आनंद मिळतो…”
सुनंदानं रात्री मिलिंदला सांगितलेल्या संवादाचा धागा रेश्मानं पुढे नेला.
बाहेर अंधारून आलं म्हणून घरात दिवे चालू करायला रेश्मा उठली.
गिझर रिपेअरिंगवाला येणार म्हणून दिवसभर घरात बसणाऱ्या त्याची आठवण सुद्धा उरली नव्हती.
मुग्धा सचिन मणेरीकर