वातावरणात जाणवण्याइतपत अस्वस्थता होती. दोघीही अगदी गोंधळून गेल्या होत्या. बारा वर्षांनी ही अशी भेट होतेय म्हटल्यावर दुसरं काय होणार होतं?
सुरेखाला तर काही सुधरतच नव्हतं. अचानक संध्याकाळी बेल वाजते काय आणि दारात अंजली आपल्या चार वर्षाच्या मुलीला घेऊन काय दिसते. काय बोलावं, कुणाकडे बघावं हेसुद्धा तिला समजत नव्हतं. इतक्या वर्षांनी काही न सांगता सवरता आल्यावर संभाषणाला नेमकी सुरुवात कशी करायची हेच तिला समजत नव्हते. अंजली देखील काहीच बोलायला तयार नाही, मुलीचा हात धरून, नजर खाली घालून नुसती दारात उभी. त्या अवघडलेपणातल्या साठ, सत्तर सेकंदात नाही नाही ते विचार सुरेखाच्या मनात येऊन गेले, पण असं दारात किती वेळ ताटकळत ठेवणार? म्हणून पटकन मूड बदलून, उसनं अवसान आणत तिनं दोघींना घरात बोलावलं.
अंजलीला वाटलं होतं तितकं सोपं हे नक्कीच नव्हतं. बेलवर बोट ठेवताना जो आत्मविश्वास होता तो दार उघडल्याचा आवाज झाल्याक्षणी गेला. काय करायचं ते समजलं नाही म्हणून पूर्वाला एका हाताला धरून खाली मान घालून उभी राहिली.
घरात गेल्यावर सुरेखानं दोघींना बसायला सांगितलं. एरवी बडबड बडबड करणाऱ्या पूर्वालासुद्धा वातावरणातला तणाव जाणवला असावा, कारण काही प्रश्न न विचारता तीसुद्धा आईला चिकटून बसून राहिली होती.
“मी पाणी आणते... बसा तुम्ही निवांत.”
‘आपण असं अचानक येऊन धडकायला नको होतं… निदान फोन करून पूर्वसूचना तरी द्यायला हवी होती. सुरेखा पाणी आणायला आत गेल्यावर अंजली मनातल्या मनात विचार करत होती. अगदी सहजपणे तिची नजर खोलीभर फिरली. मागच्या बारा वर्षात थोडेफार बदल झाले होते, पण मूळ सेटअप अगदी तसाच होता. मन भूतकाळात जायला एक क्षणसुद्धा पुष्कळ होतो. त्या सोफ्यावर बसून मारलेल्या गप्पा, तिथे बघितलेले सिनेमे, डायनिंग टेबलवरचं हास्य, विनोद आणि त्याच टेबलभोवती झालेली भांडणं, आदळाआपटी.. रडारडसुद्धा. घर सोडताना तिनं त्याच टेबलवर तिच्याकडच्या किल्ल्यांच्या जुडा ठेवला होता. त्यानंतर तिचं सुरेखाला फोन करणं, खुशाली विचारणं आणि सुरेखाचं फेटाळून लावणं हेसुद्धा ओघानं आठवलंच.. खरं तर घर सोडून जाताना झालेल्या दुःखापेक्षा ते दुख: कितीतरी पट जास्त होतं. आपल्या घर सोडण्याचा संबंध सुरेखाशी नसताना देखील एक गोड नातं अकारण संपुष्टात आलं होतं, त्याचं तिला जितकं वाईट १२ वर्षांपूर्वी वाटलं होतं तितकंच आजही वाटत होतं.
“घ्या.. पाणी…” सुरेखा पाणी घेऊन आली आणि अंजलीची विचारांची तंद्री भंगली.
अंजलीनं ग्लास हातात घेत उगीच तोंड लावल्यासारखं केलं. पूर्वाला मात्र चांगलीच तहान लागली होती. सोफ्यावर बसून ग्लासमधलं अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घटाघट पिऊन ती तो ग्लास समोरच्या छोट्या टेबलवर ठेवायला उठली.
“अगं पूर्वा.. थांब… खाली डाग पडेल..” अंजलीच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडायला आणि पूर्वानं ग्लास टेबलवर टेकवायच्या आधी सुरेखानं गडबडीत त्याखाली टी कोस्टर सरकवायला एकच वेळ आली.
यामुळे वातावरण क्षणात हलकं झालं. त्या घरात तेरा वर्षांनी दोघींच्या एकत्र खळखळून हसण्याच्या आवाज घुमला. हसता हसता कधी दोघींची नजरानजर झाली ते समजलंसुद्धा नाही. दोघींनी एकमेकींकडे मन भरेपर्यंत बघून घेतलं.
“काय गं अंजू, माझ्या स्वच्छतेच्या सवयीचा इतका सासुरवास होता का गं तुला? इतक्या वर्षांनीसुद्धा घाबरलीस ते?” सुरेखानं हसत हसतच विचारलं.
उत्तरादाखल अंजली अजून थोडी हसली.
“आई, ही माझी लेक.. पूर्वा..” पूर्वाश्रमीच्या सासू-सुनेच्या हास्याची लाट ओसरल्यावर अंजलीनं बोलायला सुरुवात केली.
“पूर्वाच्या बाबांचं काम होतं इथे. मलासुद्धा सुट्टी हवी होती आणि पूर्वाला घेऊन फिरायलासुद्धा जायचं होतं म्हणून त्याच्याबरोबर आम्ही दोघीसुद्धा आलो. तुम्हाला विचारून आले असते तर नकार यायची भीती होती.. तुम्ही इथे एकट्याच राहता असं मध्यंतरी कुणीतरी म्हटलं होतं.. म्हणून म्हटलं बघू या तरी जाऊन..”
सुरेखानं पूर्वाला जवळ बोलावलं. नीरजशी डिव्होर्स झाल्यानंतर अंजलीनं चार-पाच वर्षात दुसरं लग्न केलं होतं हे सुरेखाला ठाऊक होतं. त्यामुळे आपल्या सुनेच्या दुसऱ्या लग्नातून झालेल्या मुलीला जवळ घेण्याचा तो प्रसंग अगदी सिनेमा नाटकात शोभला असता.
तसं बघायला गेलं तर नीरज आणि अंजलीचं लग्न झाल्यावर या सासू-सुनेचं नातं छान बहरलं होतं… बाहेरच्या माणसाला या दोघींचं एकमेकींशी वागणं खोटं वाटावं इतपत! पण हे अगदी नैसर्गिकपणे झालं होतं. दोघींचे खटके उडलेच नाहीत असं नाही; पण बोलून, सवरून क्वचित राग व्यक्त करूनसुद्धा दोघी एक व्हायच्या; पण हेच नवरा-बायकोत मात्र झालं नाही. सुरेखाशी अंजली जितक्या समजूतदारपणे वागायची तितक्याच किंवा त्याहून जरा जास्तच हेकेखोरपणे नीरजशी वागायची. नीरजसुद्धा काही साध्या स्वभावाचा नव्हता. एक घाव दोन तुकडे करण्याची त्याला सवय होती. दोघांचे सतत खटके उडायचे. सुरेखाला लाख वाटायचं की मध्ये बोलावं, दोघांना समजवावं, एकत्र नाहीतर एकेकट्याला समजावून बघावं; पण दोघांच्या भांडणात तिसऱ्यानं बोलू नये हा शिरस्ता तिनं शेवटच्या दिवसापर्यंत काटेकोरपणे पाळला. दोघांमध्ये सतत असणाऱ्या ताणतणावाचा परिणाम त्यांच्या एकूण आयुष्यावरच व्हायला लागला. रोजची भांडणं, चिडचिड तिघांना नकोशी झाली. एकेकाळी हसतं असणाऱ्या त्या घराचं वातावरण पार बिघडून गेलं. अंजली आणि नीरज एकमेकांना टाळायला लागले. झोपण्या-उठण्याच्या, जेवणाच्या, येण्या-जाण्याच्या सगळ्याच वेळा बदलून टाकल्या दोघांनी. नीरजचा चिडचिडेपणा वाढत गेला. घरातल्या या वादळांचा पडसाद बाहेर उमटू लागले. ऑफिसचे सहकारी, मित्रमंडळ हळूहळू दुरावू लागलं. अंजली मात्र त्याच्यापेक्षा जास्त विचारानं वागत होती. तिला स्वतःबरोबर नीरजचीसुद्धा अशाप्रकारे वाताहत करायची नव्हती. तिनं अगदी वेळेतच विभक्त होण्याची मागणी केली.
सगळ्या कायदेशीर प्रकरणात जो मानसिक त्रास होतो तो तिघांना ही झाला; पण काळाच्या औषधानं यथावकाश सगळं मार्गी लावलं. अंजलीनं ऑफिसकडून बदली मागून घेतली. ती दुसऱ्या राज्यात स्थायिक झाली. सुरुवातीला तिचा मधूनच सुरेखाला फोन होत असे. नवरा-बायकोचं नातं संपलं; पण त्या लग्नामुळे जोडलेली इतर नाती संपवावी असं तिला वाटत नव्हतं; पण सुरेखाकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. एकदा तर तिनं अंजलीला स्पष्टच सांगितलं की त्यांचं संपर्कात असणं नीरजला पसंत नाही. झालं! मग काय करणार?
अंजलीनं काही वर्षांनी पुन्हा प्रेमात पडून लग्न केलं. आयुष्यात उशिरानं भेटलेल्या जोडीदारामुळे नात्यात परिपक्वता आली. जुन्या आठवणी कधीच पुसल्या गेल्या होत्या; पण या नात्यामुळे त्यांची सलसुद्धा अगदी मिटून गेली. संसार, काम यात सर्वाथानं गुंतून गेली असतानाच एकेदिवशी अचानक तिला नीरजची आतेबहीण भेटली. तिनं हसून ओळख दाखवली म्हणून अंजलीसुद्धा तिच्याशी थांबून बोलली. स्वतःबद्दल सांगितलं, तिथल्या सगळ्यांशी चौकशी केली तेव्हा तिच्या बोलण्यातून समजलं की सुरेखा हल्ली एकटीच राहते. नीरजनंसुद्धा दुसरं लग्न केलं होतं, पण त्याचं आणि सुरेखाचे म्हणे बरेच खटके उडले होते. दोघं अगदी संपर्कातसुद्धा नव्हती. सुरेखा खूप एकटी पडली होती.
अंजलीच्या मनातून हा विचार काही जात नव्हता. त्या रात्री तिनं फेसबुकवर नीरजला शोधलं, त्याचा ठावठिकाणा बघितला. त्याच्या आयुष्यात तरी तो सुखात दिसत होता; पण त्याच्या सगळ्या फोटोंमध्ये त्याचं जुनं घर, सुरेखा कुठेच नव्हते.
सुरेखा खरोखरच एकटी पडली असणार हा विचार काही तिला स्वस्थ बसू देत नव्हता. नवऱ्याशी मोकळेपणानं बोलून तिनं मुद्दाम सुरेखाला भेटायला जायचा निर्णय घेतला. त्याच्याच सांगण्यावरून त्या भोवती निमित्ताची एक गोष्ट तयार केली आणि त्याचमुळे या सिनेमा-नाटकात शोभेल अशा क्षणाच्या तिघीही साक्षीदार झाल्या.
पूर्वानंसुद्धा आजीच्या मांडीत बसू छान लाड केले.
“आजी… तुमच्या बागेतल्या झोपाळ्यावर जाऊ?” आईच्या आणि आजीच्या गप्पा सुरू झाल्यावर पूर्वानं कंटाळून विचारलं. आजी हाक ऐकून सुरेखा सुखावली. नीरजलासुद्धा दोन मुलं आहेत हे तिला माहीत होतं; पण नीरजनं त्यांचा साधा फोटोसुद्धा पाठवला नव्हता. हळवं होऊ पाहणारं मन तिनं सावरलं. अंजलीला हे सारं सांगत बसायचं नव्हतं. अंजलीनंसुद्धा नीरजचा विषय आजिबात काढला नाही यामुळे सुरेखाला बरं वाटलं.
चहा, खाऊ, गप्पा सगळं सावकाश आटोपलं. जुन्या आठवणींना उजाळा न देता पुन्हा भेटू, संपर्कात राहू असं ठरलं. पूर्वाला जवळ घेऊन झालं, बदलेले फोन नंबर एकमेकींना देऊन झाले.
दोघींना बाहेरपर्यंत सोडून आल्यावर भरल्या मनानं सुरेखा घरात परत आली. निघायच्या अगदी आधी अंजलीनं डायनिंग टेबलवर एक पाकीट ठेवलं होतं. घरात आल्या आल्या सुरेखानं ते उघडून पाहिलं.
“आई काही नाती एक्स्क्लूसिव्ह असतात. एक नातं आयुष्यात आलं की त्यामुळे इतर अनेक नाती येतात पण ती स्वतंत्र असतात… इन्क्लूसिव्ह नाही.. आई.. तुम्हाला समजतंय ना मला काय म्हणायचंय ते?”
तेव्हा खरंच अंजलीच्या म्हणण्याचा अर्थ सुरेखाला समजत नव्हता; पण आत्ता त्या पाकिटात अंजलीनं ठेवलेला स्वतःचा पत्ता बघून मात्र तिला त्या बारा वर्षांपूर्वीच्या वाक्याच्या अर्थ लागला होता.
- मुग्धा मणेरीकर