रोज संध्याकाळी ऑफिसमधून निघतानाच मोहिनीच्या मनात रात्रीच्या जेवणाचे विचार गर्दी करायला लागायचे. संध्याकाळी सहा-साडेसहाला घरी पोहोचल्यावर झोपेपर्यंतचा म्हणजे रात्री साडेदहा-अकरापर्यंतचा वेळ खास तिचा असायचा. सकाळी ऑफिसला जायची घाई, उठल्यावर चहा आणि ब्रेड बटर किंवा टोस्ट खाऊन पटकन अंघोळ करायची आणि दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन ऑफीस गाठायचं. तिच्या ऑफिसमध्ये ती खूप खूश होती. तिचं काम तिला आवडत होतं. घरापासून दूर राहत असली तरी, या शहरावर तिचं प्रेम जडलं होतं. त्यामुळे तिच्या या अतिशय व्यग्र दिनक्रमाबद्दल तिची तक्रार नव्हती. मात्र, तिचा हक्काचा संध्याकाळचा वेळ तिला अगदी मनापासून हवा असायचा. कधी शांतपणे बसून एखादं पुस्तक वाचायचं, कधी फोनवर मित्र-मैत्रिणींशी गप्पा, कधी एखादा सिनेमा तर, कधी काहीच न करता घराच्या कुशीत निवांत बसून राहायचं. भाड्याने घेतलेलं ते छोटसं घर तिला अशा संध्याकाळच्या वेळी खूप उबदार वाटायचं. फार लोकांमध्ये मिसळायला न लावता, तिची स्वतःची स्पेस जपणारं ते शहर आणि ती स्पेस सुंदर बनवणारं हे घर… धिस इज लाइफ! असं तिला रोज रात्री झोपताना वाटायचं.
संध्याकाळी शक्यतो ती स्वतः स्वयंपाक करायची. वर्षभरातच तिनं बरीच भांडीसुद्धा जमवली होती. मात्र, कधी कंटाळा आला, तर ती जेवण बाहेरूनसुद्धा घेऊन यायची. कधी अगदी साग्रसंगीत पंजाबी, कधी चायनीज आणि कधी खाऊगल्लीत जाऊन एक दाबेली, एक शेवपुरी, एखादी पेस्ट्री असं थोडं-थोडंसुद्धा घेऊन जायची. मनात आलं तर, एकटीच छान आवरून बाहेर थ्री कोर्स डिनर करून यायची. स्वतःच स्वतःला कंपनी देत ती कधीतरी शनिवारी रात्री थोडी व्होडका आणि ऑरेंज ज्यूससुद्धा घ्यायची.
मोहिनी तिच्या या स्वातंत्र्याच्या प्रेमात होती. जगाला मात्र स्वतःत रममाण असणारी मोहिनी समजायची नाही. एकटीच सिनेमाला जाणारी, गर्दी टाळणारी, खरेदीलाही एकटीच जाणारी, रोज संध्याकाळी एकटीच वेळ घालवणारी अशी ही पंचविशीतील मुलगी लोकांना विचित्र वाटायची. मात्र, इतर सगळ्यांप्रमाणे याबद्दलसुद्धा लोकांच्या मताला आदर द्यायला तिला वेळ नव्हता. कुणी काही कुचकं बोललंच तर, योग्य ते उत्तर देऊन त्यांना फाट्यावर मारायचीदेखील तिला हौस नव्हती. मुळात कोण काय म्हणतंय याचा स्वतःवर काहीच परिणाम होऊ न देणारी मोहिनी मानसिक स्थैर्याच्या एका वेगळ्याच पातळीवर गेली होती. तिचं हे मानसिक स्थैर्य ढासळायचं ते केवळ एकाच गोष्टीमुळे, तिच्या मागे तिच्या आई-बाबांनी
लावलेला ‘लग्न कर’चा धोशा. मोहिनीला लग्नाचं वावडं होतं असं नाही, ती फार महत्त्वाकांक्षी होती की, लग्नामुळे तिची प्रगती खुंटण्याची तिला भीती होती तर तसं ही नाही, लग्नसंस्थेविषयी तिच्या फार टोकाच्या किंवा तिच्या आई-बाबांना न पटण्यासारख्या कल्पना होत्या तर तसं ही नाही. लग्न-संसार-मुलं हे तिचं एकमेवाद्वितीय स्वप्न नसलं तरी, तिच्या मनात ती कधीतरी रंगवत असणाऱ्या भविष्यकाळाच्या कॅनव्हासवर या नात्यांना जागा होतीच. मात्र, लग्नाचं नसलं तरी, तिला एकूण माणसांचंच वावडं होतं. तिला मनापासून आवडेल असा, तिचं हे स्वातंत्र जपेल असा मुलगा तिला मिळाला तर, तिचा लग्नाला विरोध नव्हता. मात्र, त्यासाठी असं मुलं बघणं, दहा मुलांमधून पाच मुलं शॉर्टलिस्ट करणं, त्यांना भेटणं, मग त्यातून निष्कर्ष काढून निर्णय घेणं हे तिला स्वतःपुरतं मान्य नव्हतं. परत या सगळ्या सीस्टिमच्या सरसकट विरोधात ती नव्हतीच, पण आपल्या स्वतःच्या बाबतीत तिला असं होऊ द्यायचं नव्हतं. अशा अनेक बाजूंनी, विचारांच्या बाबतीत जवळ-जवळ संतपदाला पोहोचलेल्या मोहिनीला राग यायचा तो केवळ आई-बाबांच्या सततच्या पाठपुरवणीचा.
दसऱ्याला नाव घालू, दिवाळीत पाडव्याला घालू, गुढीपाडव्याला घालू असं वर्षभर करत करत शेवटी या वर्षी अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त गाठून तिच्या आई-बाबांनी तिचं नाव वधू-वर सूचक केंद्रात नोंदवलं. त्यामुळे दर आठवड्याला मुलं शॉर्टलिस्ट करणं आणि त्यांना भेट, फोन कर किंवा मुलांचे आलेले फोन उचल म्हणून आई-बाबा आलटून पालटून तिच्या मागे लागत.
अगदी काही वेळापूर्वीच आईनं तिला मेसेज करून काही मुलांचे मेसेज आल्याचं कळवलं होतं. मोहिनीचा उद्या सकाळपर्यंत तो मेसेज उघडूनच बघायचा नाही असा प्लॅन होता पण नोटिफीकेशनमध्ये दिसणाऱ्या तिसऱ्या नावानं तिचं लक्ष वेधून घेतलं.
अक्षय कदम… कुठेतरी हे नाव ऐकल्याचं तिला आठवत होतं. ऑफिसमधून घरी पोहोचेपर्यंत तिच्या डोक्यातून हा विचार गेला नाही. नाव नोंदवल्यापासून एकदाही तिनं लॉग इन केलं नव्हतं, पण हे नाव तिला स्वस्थ बसू देईना. घरी आल्या आल्या आईनं तीन महिन्यांपूर्वी पाठवलेला पासवर्ड शोधून ती आधी त्या वधू-वर सूचक मंडळाच्या साइटवर लॉगइन झाली आणि आलेल्या इंटरेस्टमधून अक्षय कदम नाव शोधून काढलं. येस! ‘हा तर आपल्या वर्गात होता चौथीपर्यंत..’
मोहिनीची ट्यूब-लाइट पेटली. हायस्कूल चांगली नाही म्हणून चौथीनंतर बऱ्याच आई-बाबांनी मुलांच्या शाळा बदलल्या होत्या. वर्गातली एक-दोन मुलं लक्षात राहतात, पण ज्यांच्याशी कधी काही बोलणं नव्हतं, ज्यांची नावं शिक्षिका हजेरी घेताना कानावर पडायची अशा नावांपैकी अक्षय कदम हे नाव होतं. आधी मोहिनीने तो आता काय करतो, कुठे राहतो, काय शिकला हे सगळं बघितलं मग त्याच्या फोटोवरून नजर फिरवली. पण त्या साइटवर ती नवखीच होती. त्यामुळे थोड्या वेळातच कंटाळून तिनं त्याला फेसबुकवर शोधलं. हे कसं हातातलं होतं. बापरे, ४५ म्युचुअल फ्रेंड्स! सगळे शाळेतले. ‘म्हणजे हा
विस्मरणाचा त्रास फक्त आपल्यालाच आहे का?’ अविश्वासानं मोहिनी स्वतःशीच विचार करत होती. प्रोफाइलमध्ये माहिती बऱ्यापैकी लॉक होती, फोटोज मात्र भरपूर होते! तो लहानपणी कसा दिसायचा हे तिला पुसटसंसुद्धा आठवत नव्हतं, पण आता
मात्र छान दिसत होता. ‘रिक्वेस्ट पाठवू की नको, पाठवू की नको’ असा विचार करता करता मोहिनी दोन-तीन वेळा प्रोफाइलवर जाऊन आली. वधू-वर सूचक मंडळाच्या साइटवरचं काय असेल ते असेल, पण शाळेतल्या जुन्या ओळखीचा म्हणून तरी रिक्वेस्ट पाठवायला हरकत नसावी, असं तिला एकदा वाटलं, पण त्यालासुद्धा हे काहीच आठवत नसलं तर, मग परत तिथला इंटरेस्ट पाहून इथे रिक्वेस्ट पाठवली असा त्याचा गैरसमज व्हायचा म्हणून ती तिथून बाहेर पडली. दोन-तीन
दिवस गेले असतील. कामाच्या गडबडीत या सगळ्याचा विसर पडला. “मुलं बघितली का?” हा आईचा नेहमीच प्रश्नसुद्धा आला नव्हता. सर्च हिस्ट्री बघून आईला हायसं वाटलं होतं. वर-वर लक्षात नसलं तरी डोक्यात कुठेतरी अक्षयचं नाव रेंगाळत होतं. हे त्यादिवशी दुपारी त्याची आलेली फ्रेंड रिक्वेस्ट बघून तिला जाणवलं. लगेच स्वीकारावी का नाही यावर तिचं बरंच विचारमंथन झालं. शेवटी टी ब्रेकला तिनं ती स्वीकारली तर साहेबांचा दुसऱ्या क्षणाला मेसेज, “हाय, ओळखलंस का?” ‘बापरे आता काय करावं? याला तर सगळं लक्षात आहे. मग तरीही त्यानं इंटरेस्ट पाठवला? का म्हणूनच पाठवला.’ गोंधळून
गेली असली, तरी मोहिनी थोडी सुखावली होती. कुणालातरी आपण आवडू शकतो ही भावना माणसांचं वावडं असलं तरी सुखावणारी होतीच.
“हे, हाय… हो ओळखलं फोटो बघून……” मोहिनीचा रिप्लाय.
“हम्म..”
“परवाच पीपल यु मे नो मध्ये तुझं नाव दिसलं.. काय योगायोग आहे..” स्वतःची बाजू सुरक्षित करण्यासाठी तिनं आपलं काही तरी वाक्य फेकलं.
“अगं, प्रायमरी शाळेचं रियुनिअन करायचं ठरतंय.. कोण-कोण होते आठवताना तुझं नाव आलं.. व्हाट्सअॅप ग्रुप केलाय. तुला अॅड व्हायचंय का?”
‘अरे देवा, यासाठी यानं रिक्वेस्ट पाठवली? म्हणजे ते इंटरेस्टचं वगैरे काही नाही तर. कदाचित याचं अकाऊंटसुद्धा याची आईच बघत असेल.’ मघाशी सुखावलेलं मन नकळत हिरमुसलं.
“इन ऑफिस.. संध्याकाळी बोलू या?”
“ओके, नो वरीज. पुढच्या महिन्यात चाललंय भेटायचं. आरामात सांग.”
मोहिनीला वाटलं होतं की, घरी जाऊन निवांत बोलता येईल. तसंही बऱ्याच दिवसांत संध्याकाळी ती अशी काही मी करता, नुसता वेळ घालवत बसली नव्हती. पण त्याने तर आरामात कळव म्हणून सांगितलंय. त्यामुळे लगेच मेसेज नको करायला असा विचार करून मोबाइल न बघता ती संध्याकाळी स्वयंपाक करण्यात रमली. जेवायला बसल्यावर हातात मोबाइल घेतला तोच मेसेंजरचे नोटिफिकेशन.
“अजून ऑफिसमधेच आहेस? नक्की काय करतेस?”
“सहालाच फ्री होते. जस्ट मेसेज करणारच होते. तेवढ्यात तुझा आला.. परत योगायोग!” ती बोलली.
“अरे ठीक आहे.. ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ गेला असेल.”
“नाही, माझं ऑफिस घरापासून पाचव्या मिनिटाला आहे..”
“लकी गर्ल.. असं पाहिजे यार. मला सकाळी तासभर ऑफिसला पोहचायला आणि परत येताना दीड तास..”
“मी नोकरीसाठी इथे आले तेव्हा मला प्रवासाचा वेळ कमीत-कमी ठेवायचा होता.”
“ओह, बाय द वे.. कुठे असतेस आता तू? आणि काय करतेस?”
“हैदराबाद… फार्मास्युटिकलमध्ये आहे..”
“ग्रेट”
“तू?”
-----
प्रश्न, प्रतिप्रश्न, माहिती यामध्ये बराच वेळ गेला. जेवण होऊन मोहिनी यांत्रिकपणे हात धुवून कधी आली आणि बेडवर आडवी कधी पडली हे तिचं तिला पण समजलं नाही. इंजिनीअर होऊन पुण्यातच जॉब करणारा अक्षय महिन्या दोन - महिन्यातून बंगळूरला यायचा. इकडच्या-तिकडच्या बऱ्याच गप्पा झाल्या, पण दोन तीन दिवसांपूर्वी आलेल्या त्या इंटरेस्टचा विषय काही अक्षयनं काढलासुद्धा नाही आणि तो कसा काढावा हे मोहिनीला समजत नव्हतं. मेसेज लिहिता लिहिता तिला मध्येच झोप लागली आणि मग दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काल झालेलं अर्धवट बोलणं तिला त्रास देत राहिलं.
क्रमशः
- मुग्धा मणेरीकर