यज्ञ - भाग १०

युवा विवेक    09-Dec-2021   
Total Views |

यज्ञ - भाग १०

  
sacrifice_1  H

अनुजा आणि राहुलला भेटून जवळपास दोन महिने झाले होते. सुरुवातीला त्याच्याशी बोलणारी अनुजा हळूहळू त्याची चांगली मैत्रीण झाली होती. 'आपल्याला आवडणाऱ्या लोकांना आपण का आवडत नाही? दुसऱ्याच कोणाला तरी आपल्यात इंटरेस्ट असतो. आता या महेशला का आवडले नाही मी? ती प्रिया, तिचे लग्न झाले असून, ती आवडली. मुलांना अचिव्हमेंट्स आवडतात. कदाचित म्हणून कोणी स्वतःहून इंटरेस्ट दाखवला की भाव खातात.' तिला हसू आले. प्रेमाचा त्रिकोण होता आणि ती मध्यभागी होती. राहुल तिच्यासाठी थांबायला तयार होता, किंबहुना तो अजूनही तिला समजून घेत होता. या सगळ्याबद्दल आज ती प्रियाशी बोलणार होती.

 

प्रिया स्टाफरूममध्ये आली आणि खुर्चीवर बसली. अनुजाच्या मनात आले, 'तसं पाहता, माझी हिच्याशी स्पर्धा असायला हवी. मला हिच्याबद्दल थोडी, तरी जलसी हवी, पण असं काही वाटत नाहीये. आधी थोडा राग यायचा तोही येत नाही. प्रिया माझी खूप चांगली मैत्रीण आहे म्हणून की, माझं महेशवर तितकं प्रेम नाहीये म्हणून?' या विचाराने ती दचकली. 'खरंच असं असेल तर? मग मला तो का आवडला? मी इतकी स्वप्ने का रंगवली?'

 

" नू, तू कधीपासून इतका विचार करायला लागलीस?" प्रियाच्या आवाजाने अनुजा भानावर आली.

"काही नाही. असंच. तुझ्याशी बोलायचे होते, वेळ आहे?"

"तुझ्यासाठी केव्हाही फ्री आहे मी. बोल ना."

"तुला तो राहुल माहीत आहे का? महेशचा मित्र."

"हो."

"त्याला मी आवडते. म्हणजे असं काही सिरीयस नाहीय, पण आमची मैत्री चांगली आहे. मला समजत नाहीय, काय करू?"

"का? चांगला मुलगा आहे तो. समंजस आहे, मी भेटली आहे त्याला. तुला तर सिंगल असण्याचा कंटाळा आला होता ना? आता चांगली संधी आहे ना."

"हो पण.."

"काय? सांग बिनधास्त."

"मला महेश आवडतो.. म्हणजे आवडायचा." आज तिने हिंमत करून सांगून टाकले आणि प्रियाला धक्का बसला. गेले काही महिने तिच्या डोळ्यांसमोरून गेले. अनुजाच्या वागण्याचा अर्थ आता लागत होता. तिच्या स्वतःच्या प्रॉब्लेम्समध्ये ती इतकी गुंतली होती की, तिला याचा विचार करायला वेळच मिळाला नाही. तिला आता गिल्टी वाटत होते.

"अगं, मला आधी का नाही सांगितलेस? मी बोलले असते त्याच्याशी."

"बरं झालं, सांगितले नाही तेच. त्याला तू आवडतेस मी नाही." अनुजाने अजून एक बॉम्ब टाकला.

", काही तरी काय. असं नाहीय..."

"अगं, असू दे. त्यात तुझी चूक नाही आणि मलाही काही प्रॉब्लेम नाही."

"मी.."

"इट्स ओके प्रिया. मला समजतं. एक सांगू, आता मला जाणवलं मलाही तो तितकासा आवडत नाही. किंवा माझं तेवढं प्रेम नाही त्याच्यावर. आणि त्याचं तर लक्षही नसायचं माझ्याकडे." अनुजा किंचित हसली. प्रियाला बोलणे सुचत नव्हते. ती केवळ ऐकत होती.

"एक सांगू प्रिया, तू पण त्याच्याशी बोलणे कमी कर. तुमच्या नात्याला भविष्य नाही, असं मी म्हणणार नाही, पण मला वाटतं की, तुम्ही कंपॅटिबल नाही. तू खूप वेगळी आहेस आणि नीलचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्याला आता तुझ्या आधाराची गरज आहे. या वेळी तू त्याला सोडून जाऊ नकोस. तुझं आणि महेशचं नातं इतकंच आहे. तो जर तुला मित्र म्हणून मानसिक आधार देत असेल तर तितकंच बोलेल, तुझ्याकडून नात्याची अपेक्षा करणार नाही. मला त्याने भाव दिला नाही म्हणून मी सांगत नाहीय तर, मी तुला ओळखते म्हणून सांगते आहे."

"अनुजा, सॉरी. मी तुला खूप एकटं सोडलं ना? तू कधी इतका विचार करायला शिकलीस?"

"अनुभव सर्व काही शिकवतो आणि मी एकटी नाहीय. तू असतेस आसपास याचा आधार वाटतो कायमच!"

"पण तरी ... मी माझ्याच जगात होते, खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवल्या सगळ्या गोष्टी!"

"तुला काही मदत हवी असेल तर, मला सांगत जा ना. इतरांना कशाला सांगतेस?"

"म्हणजे महेशला का?"

"हो. मी आहे ना."

"सॉरी. तो पण चांगला आहे."

"हो. आहे पण मी त्याहून जवळची आहे ना तुला? बरं जाऊ दे ते. या राहुलचं काय करू?"

"मी त्याला फार ओळखत नाही गं, पण एक सांगू शकते की, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या मुलाला होकार दे. तू ज्याच्यावर प्रेम करते त्याला तुझी कदर नसेल तर सोड त्याचा विचार."

"मी महेशचा विचार कधीच सोडला आहे. राहुलसाठी विचार करायला थोडा वेळ घ्यावा का?"

"हो. हा आयुष्याचा प्रश्न आहे. मी आणि नीलने बराच विचार करून लग्न केले होते. तरी आता निभावताना टेन्शन येतं, पण तो समजून घेतो. स्वतःला आणि मलाही." प्रिया काहीशी स्वतःशी आणि थोडं अनुजाशी बोलत होती. आज खूप दिवसांनी अनुजाला तिची बेस्ट फ्रेंड, नेहमीची प्रिया दिसली. अनुजाला बरं वाटलं!

***********

महेशला प्रियाचा खूप राग आला होता. त्याने तिच्याशी बोलणे कमी केले, पण त्याला तिची आठवणही यायची. स्टाफरूममध्ये कधी तरी नजरानजर झाली तरी, तो कासावीस व्हायचा. प्रिया आजकाल त्याच्या समोर येणं टाळत होती. त्यामुळेही त्याला राग यायचा. आजही असंच रागारागात तो घरी आला. आजकाल त्याने घराच्या मालकांशीही बोलणे कमी केले होते. आजही काकूंना पाहून पाहिल्यासारखे करून तो रूममध्ये जाऊन बसला. दहाच मिनिटांनी राहून त्याला भेटायला आला.

"सर, येऊ का आत?"

"ये."

"कसा दिसतोय मी? शर्ट बरा आहे ना?"

"चांगलाय, पण इतकं तयार होऊन कुठे जातोय? मिटिंग आहे?"

"नाही रे. डेट आहे, तुझ्याच मैत्रिणीसोबत. अनुसोबत."

"अनु? मी पण अनु म्हणत नाही तिला."

"तू तर वहिनी म्हणशील ना."

"काय सांगतोस? तुमचं ठरलं?"

"नाही रे. अजून तरी नाही. पण ठरेल असं वाटतंय."

"तुला कशी आवडली ती? बालिश आहे."

"मी आहे ना समजूतदार, मॅच्युअर्ड! मग झालं तर."

"अभिनंदन!"

"इतकं निराश स्वरात अभिनंदन? काय झालं? प्रियाशी भांडलास परत?"

"ती बोलत नाहीये, भांडू कसा?"

"का?"

"माही नाही. यासाठी इतकी मैत्री केली का मी? आता गरज संपली तर, बोलत नाहीये. स्वार्थी असतात मुली."

"तिला कशाची गरज होती?"

"आधाराची. मी किती सपोर्ट दिला कोणतीही अपेक्षा ठेवता. कदर नाही तिला." तो आता चिडला होता.

"तिने मागितली होती मदत? आणि तुला अपेक्षा नव्हती तर, वाईट कशाचं वाटतंय?"

"तू तिचीच बाजू घेणार हे माहित होतं. तुला माझं पटतच नाही."

"तुझी काळजी आहे म्हणून बोलतोय, याआधीही हेच बोललो होतो."

"मला समजत नाहीय की तिला मी आवडतच नव्हतो, तर ती इतकी का बोलली, मैत्री केली?"

"कारण ती तुझ्यासारखा विचार करत नाही. ती खरोखर निरपेक्ष भावनेने बोलली. तुझं तिच्यावर प्रेम आहे ही तिची चूक आहे?"

"मग माझी आहे?"

"तुझीही नाहीय पण असं चिडणं, वैतागणं ही तुझी चूक आहे."

"का? मला भावना नाहीत?"

"आहेत ना, पण याचा अर्थ तू तिचा राग करावा असं नाही. जाऊ दे. अजून लेक्चर देत नाही. इतकंच सांगेन की, यातून लवकर बाहेर पड. ती तुझ्या कॉलेजमध्येच आहे, निदान प्रोफेशनली वाग."

"बोलायला सोपं आहे, वागणे कठीण."

"प्रेम सोपं असतं, ब्रेकअप अवघड आणि एकतर्फी प्रेमाचं ब्रेकअप त्याहून अवघड! मला विचार ना. चल मी निघतो." राहुल हसला आणि निघून गेला.

**********

'कदम सरांनी आपल्या डोक्यात किडा सोडला, त्याच वेळी प्रियाच्या नात्यात अडचणी आल्या आणि माझं ब्रेकअप झालं. तीच माझं जग वाटायला लागली. इतका कसा मूर्खासारखं वागलो मी? मी तर नेहमी लोकांना चांगले सल्ले देतो. त्याच्या नेमकं उलट वागलो की काय? कोण बरोबर? आणि राहुलने अनुजाला कधी पटवलं? मला काहीच कसं माहित नाही?" बराच वेळ असा विचार केल्यावर महेश शांत झाला. या प्रश्नांची उत्तरे मिळायला वेळ लागणार होता. आज खूप दिवसांनी त्याने स्वतःहून आईला फोन केला.

"आई, कशी आहेस?"

"काय झालं रे तुला?"

"मी ठीक आहे. असं का विचारलं?"

"तुझा स्वतःहून फोन आला ना आज." महेशच्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्यानंतर तो आईचे बोलणे ऐकत, मनातल्या मनात तिला सॉरी म्हणत राहिला. फोन ठेवल्यावर त्याला बऱ्याच दिवसांनी शांत वाटले, एखादे जुने गाणे ऐकल्यावर वाटते तसे.

क्रमशः