मंदाकिनी आकाशगंगेत महाप्रचंड कृष्णविवरचा शोध
ऑस्टिन, टेक्सास इथे असणाऱ्या वेधशाळेच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी आपल्या आकाशगंगेच्या म्हणजेच मंदाकिनीच्या (Milky-Way) एका बटू आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असणारे कृष्णविवर शोधले आहे. या आकाशगंगेचे नाव 'लियो वन' असे आहे. कृष्णविवर जवळपास, आपल्या मंदाकिनी आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या कृष्णविवराच्या आकाराचेच आहे. या संशोधनामुळे आपल्या विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. आपल्या विश्वाच्या उत्पत्तीच्या काळातील महत्वाचा घटक असणाऱ्या आकाशगंगांच्या विषयीच्या आपल्या ज्ञानात या कृष्णविवराच्या संशोधनामुळे नक्कीच भर पडणार आहे.
ऑस्टिन येथील वैज्ञानिकांनी लियो वन याच आकाशगंगेची संशोधनासाठी निवड करण्याचे मुख्य कारण म्हणजे या आकाशगंगेत आपल्या आकाशगंगेच्या भोवती प्रदक्षिणा करण्याऱ्या इतर आकाशगंगांच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात कृष्ण पदार्थ (डार्क मॅटर) अस्तित्त्वात आहे. वैज्ञानिकांनी या आकाशगंगेतील बाहेरच्या बाजूपासून ते केंद्रापर्यंत या कृष्णपदार्थाचे घनत्व मोजले. या मोजमापासाठी त्यांनी , लियो वन या आकाशगंगेमधील ताऱ्यांवर असणारे गुरुत्वीय बल मोजले आणि त्याद्वारे वैज्ञानिकांनी या आकाशगंगेत पसरलेल्या कृष्णपदार्थाचे मूल्यमापन केले. जर तारे वेगाने प्रदक्षिणा करीत असतील तर त्यांनी त्यांच्या कक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कृष्णपदार्थ असल्याचे दाखवून दिले. या उलट जे तारे कमी वेगाने फिरत होते त्यांच्या कक्षांमध्ये कमी प्रमाणात कृष्ण पदार्थ एकवटलेला होता असे वैज्ञानिकांच्या निदर्शनास आले. वैज्ञानिकांना हे पाहायचे होते की, आकाशगंगेच्या बाहेरील बाजूने आकाशगंगेच्या केंद्राकडे जात असतना या कृष्णपदार्थाचे घनत्व वाढते आहे की, कमी होते आहे. तसेच, या आधी जुन्या दूरदर्शकांच्या माध्यमातून मिळवण्यात आलेला डेटा आणि या माहितीच्या आधारे त्याचे बनवण्यात आलेले संगणकीय मॉडेल यांची तुलनादेखील वैज्ञानिकांनी केली. त्यांच्या निरीक्षणांसाठी त्यांनी व्हायरस डब्लू नावाचे , मॅकडोनाल्ड वेधशाळेचे यंत्र वापरले.
वैज्ञानिक सध्या यावर अधिकाधिक संधोधानासाठी निरीक्षणे नोंदवत आहेत. लवकरच मुबलक माहिती मिळाल्यानंतर या माहितीची तपासणी करण्यात येऊन आपल्यासमोर कदाचित आकाशगंगेच्या बाबतीतले एखादे नवे समीकरण उभे राहील !!!