कलाकार
भारतात चित्रपटाची निर्मितीची मराठी माणसाने सुरू केली आणि बघता-बघता तो एक मोठा उद्योग झाला. प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल असलेला हा व्यवसाय आता देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला आहे. भारतातील जवळपास सगळ्याच भाषांमध्ये चित्रपट तयार होत आहेत. वेळोवेळी बदलत गेलेलं तंत्र अवगत केल्याने हा प्रवास सोयीस्कर झाला. तंत्र छायाचित्रीकरणाचं असो, वेशभूषा, रंगभूषा, कला क्षेत्रातील असो, वितरण आणि जाहिरातीत असो, मेकिंगमध्ये असो, गीत-संगीतात असो! ज्यांनी बदल पत्करले, ते तरले. ज्यांना बदल स्वीकारता नाही आले, ते मागे पडले. यात अनेकही दिग्गज आहेत.
एक कलाकार जेव्हा पहिल्यांदा कॅमेरासमोर जातो, त्याचं नशीब तेव्हाच ठरतं. कटू असलं तरी ते सत्य आहे. पहिल्या सीनमधला त्याचा पहिला टेक त्याचं चित्रपटसृष्टीतलं भवितव्य ठरवत असतो. ज्या गोष्टीमुळे तो चित्रपटात आलाय, ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी त्याला फक्त काही मिनिटं मिळतात. त्यात तो किती जीव ओततो आहे आणि त्याचा परिणाम काय होतोय हे त्याला ताबडतोब कळतं. त्यामुळे अभिनेता म्हणून चित्रसृष्टीत पाऊल टाकताना खूप सांभाळून टाकावं लागतं.
१. अभिनेता हा व्हर्सेटाइल असला पाहिजे. एकाच इमेजमध्ये अडकून रहाणं तितकं फायदेशीर ठरत नाही. उद्या ही इमेज जर आउटडेटेड झाली, तर प्रेक्षक त्या अभिनेत्याला सपशेल नाकारू शकतात.
२. काम घेताना आपले पात्र नेमकं काय आहे हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी आपला आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक कुवतीला सूट होईल, शक्यतो असेच रोल आपल्याला मिळतात, पण असे रोल मिळाले नाहीत, तर मिळेल तो रोल करणं हे कधीकधी अतिधाडसाचं काम ठरतं.
३. आपलं पात्र आपण नीट समजून घेतलं पाहिजे. पात्राचा इतिहास, कथेत त्याचा सहभाग, कथेच्या बांधणीत त्याचा सहभाग, या बाबी नीट कळल्या पाहिजेत. यासाठी आपली बुद्धी चौकस हवी. निरीक्षणशक्ती प्रचंड हवी. रोल साधारण जरी असला, तरी तो अभ्यास करून केला पाहिजे. हावभाव, भाषा, वेशभूषा, रंगभूषा याबद्दल आपला अभ्यास पूर्ण असला की तो रोल आपण करू शकतो की नाही हे पडताळून पहाणं गरजेचं आहे.
४. सादरीकरण करताना आपण एक पात्र सादर करतो आहोत. ते पात्र काही काळासाठी आपली ओळख होत असते. डोक्यात इतर कुठलाही विचार न करता फक्त त्या पात्रावर आणि आपल्या ओळींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आपलं लक्ष विचलित झालं तर, आपल्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम दिसू शकतो.
५. कुठलाही दिग्दर्शक स्क्रीन टेस्ट न घेता तुम्हाला फायनल करत नसतो. एखादं पात्र तुमच्यासाठी आहे की नाही याचे काही महत्वाचे क्रायटेरिया आहेत.
a. तुम्ही कसे दिसता ( Looks ) - तुमच्या चेहऱ्याची ठेवण, शरीरयष्टी, बांधा, रंग, हावभाव, उंची.
b. आवाज - संवादासाठी तुमच्या आवाजातील भाव ही खूप गरजेचा आहे. काही गोष्टी डबिंगमध्ये नीट करता येतात. पण तुमचा मूळ आवाज त्या रोलशी मिळताजुळता व्हायला हवा.
c. देहबोली - एखाद्या पात्रासाठी आवश्यक असलेली देहबोली तुम्हाला जमत असेल तर, तो रोल तुमचा..! नसेल तर, उगाच असे रोल करण्याचं धाडस अंगाशी येऊ शकतं.
एक चित्रपटाची तयारी सुरू होती. त्यात प्रमुख नायकाची भूमिका करणारे महाशय अत्यंत धिप्पाड आणि शरीराने चांगलेच जड होते. याउलट खलनायकाची भूमिका करणारा कलाकार शरीराने कमकुवत आणि उंचीने बऱ्यापैकी ठेंगणा होता. त्याला दिले गेलेले संवाददेखील त्याच्या शरीरयष्टीला न शोभणारे होते. बघताना प्रेक्षकांना विश्वास पटला पाहिजे अश्या प्रकारची कास्टिंग अपेक्षित आहे. कास्टिंग जर चुकली, तर त्याचे परिणाम अत्यंत भयानक होऊ शकतात. दिग्दर्शक किंवा कलाकारांना या चुका महागात पडू शकतात.
अभिनयाशी नातं जोडणं म्हणजे किमान नवरसांचा अभ्यास तरी हवा. मी उपस्थित असलेल्या ऑडिशन्सला आलेल्या काही हौशी कलाकारांना "अभिनयातील नवरस" माहीत नव्हते. हे नवरस वाटतात तितके सोपे ही नाही आणि अवघडही नाहीत.
१. हास्य रस
२. करुण रस
३. शृंगार रस
४. वीर रस
५. अद्भुत रस
६. रौद्र रस
७. शांत रस
८. भयानक रस
९. बीभत्स रस.
आपल्याला मिळालेले पात्र, संपूर्ण चित्रकथेत या सगळ्याच रसानुभवातून जातच असं नाही. पण जो Scene आपण करतो आहोत त्यातील हावभाव आणि संवाद नेमक्या कोणत्या रसाच्या जवळ आहेत, याचा पूर्ण अभ्यास झाला पाहिजे.
या नवरसांशी मिळते जुळते काही अनुभव आपण पाहुयात.
१. हास्य रस - 'हेराफेरी' या चित्रपटात परेश रावल यांनी केलेली "बाबुराव गणपतराव आपटे" यांची भूमिका आजही कित्येकांना आठवते. जुन्या गोलमाल चित्रपटात उत्पल दत्त यांची भूमिकादेखील हास्यरसाचे एक उत्तम उदाहरण आहे. संपूर्ण चित्रपटात एकाच रसाशी निगडित अभिनय आणि अनुभव टिकवून ठेवणं खूप कठीण आहे. नाट्यमंचावरून आलेल्या या दोन्ही कलाकारांनी हा अनुभव अत्यंत समर्थपणे पेलला आणि प्रेक्षकांना तो आवडला देखील.
२. करुण रस - "सदमा" हा स्व. श्रीदेवी यांचा एक मास्टर पीस चित्रपट होता. यात अर्ध्याहून अधिक त्यांचे विशेष हे करुण रसात राहिले आहे. वरवर जरी हे हास्य रसात असले तरी शेवट त्यातील करुण रस खूप भाव खाऊन जातो. अशीच भूमिका राणी मुखर्जी यांनी 'Black ' चित्रपटात केली. दोन्ही चित्रपट अभिनेत्रींच्या अभिनयामुळे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
पुढे इतर अभिनयरसांची उदाहरणं आपण पाहू या ..