यज्ञ - भाग ९
आज कितीतरी दिवसांनी राहुल आणि महेश गच्चीवर गेले. महेश शहरात नवीन होता तेव्हा रोज संध्याकाळी गच्चीवर यायचा. इकडची-तिकडची बोलणी झाल्यावर महेशने प्रियाविषयी बोलायला सुरवात केली.
"प्रियाला मी सांगितले की, मला ती आवडते."
"काय? मग?"
"ती म्हणाली की, तू फक्त मित्र आहेस."
"हेच म्हणणार होती. आता झालं समाधान?"
"पण ती कदाचित खोटं बोलतेय. तिला माझा आधार वाटतो."
"ती खोटं बोलतेय की, खरं यापेक्षा तिचं लग्न झालंय हे खरं आहे. ते बदलणार नाहीय."
"पण ती खुश नाहीय."
"असू शकतं, पण ते कारण नाहीय तिला तू आवडण्याचं."
"का नसावं? मी तिला किती सपोर्ट करतो, मित्र म्हणून.."
"एक मिनिट, मित्र असशील तर, तसाच रहा. उगाच रिकाम्या अपेक्षा नको. आता तू तिला सांगितलंय ना, ठीक आहे. तिला ठरवू दे."
"माझ्या भावनांना काहीच किंमत नाही का?"
"मूर्खासारखं बोलू नको. मग तिच्या भावनांना नाहीय का किंमत??"
"मला आहे तिची किंमत. कदर आहे. तिच्या नवऱ्यापेक्षा जास्तच असेल."
"त्याने काही फरक पडत नाही. तिला तुझ्याबद्दल काय वाटतं ते महत्त्वाचं आहे आणि तू ते स्वीकारायला हवं."
"तू निगेटिव्ह का बोलतोय रे?"
"निगेटिव्ह नाही. खरं सांगतोय. आता तुला वाटेल की, मी तुझ्यावर जळतोय. तसं नाहीय. मी यातून गेलोय म्हणून सांगतोय. तुझा इगो बाजूला ठेव."
"मला इगो नाहीय. मी स्वतःहून तिच्याशी बोलतो, तिला मदत करतो."
"आणि हे सगळं बोलून दाखवतोस. उद्या ती नाही म्हणाली तर, करशील हे सगळं? नाही करणार. इगो कमी असेल कदाचित, पण तुझ्या अपेक्षा आहेत. त्यासाठी उगाच तिला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस."
"मी करत नाही कधीच."
"आज करत नसशील. उद्या करशील, तिला मिळवण्यासाठी. वाईट असतं ते खूप."
"लक्षात ठेवेन."
"प्रिया जाऊ दे. तुझी ती मैत्रीण अनुजा छान आहे ना? स्मार्ट आहे."
"हो. साधी आहे, पण बोअर करते कधीकधी."
"हाच प्रॉब्लेम असतो आपला. स्वतःहून भाव देणाऱ्या मुली बोअर वाटतात आपल्याला. वेडा आहेस."
"ती फक्त कलीग आहे रे. बाकी काही नाही."
"मग निदान माझी तरी ओळख करून दे."
"तुला आवडली का? पटवायची का??"
"हा हा! मी मुली पटवत नाही रे. सोडलं ते. टिकत नाही तशी नाती. ओळख करून दे मग बघू काय होतं!"
मग दोघांनी एका वीकेंडला लहानसा ट्रेक प्लॅन केला. प्रिया, महेश, अनुजा आणि राहुल. नीलची मीटिंग असल्याने त्याला येणं जमणार नव्हतं. बरेच आढेवेढे घेत प्रियाने ट्रेकसाठी होकार दिला. इतरही लोक सोबत असल्याने तिला जास्त ऑकवर्ड वाटले नसते. महेशला प्रियासोबत वेळ घालवायला मिळणार म्हणून तो खुश आणि राहुलला अनुजाशी मैत्री करायची होती म्हणून तो उत्साही होता. ट्रेकच्या दिवशी सकाळी सगळे जमले. दोन तास लागणार होते चढायला. महेशने सर्वांची एकमेकांशी ओळख करून दिली. अनुजाला या ट्रेकमध्ये जास्त वेळ महेशसोबत रहायचे होते, पण सगळे फासे उलट पडले. प्रिया आणि महेश भराभर चालत होते. नाजुकशी अनुजा मागे पडत होती. शेवटी ती एका दगडावर बसली. ते दोघे तिच्या दृष्टिक्षेपात असणाऱ्यांच एका जागी थांबले होते. इतका वेळ राहुल तिच्या आसपासच होता, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता.
"पाणी?"
"आहे माझ्याकडे. थँक यू." अनुजाने सॅकमधून पाण्याची बाटली काढली.
"पहिल्यांदा आलीस का तू ट्रेकसाठी."
"हो."
"तरीच दमलीस."
"मी चालू शकते हं. इतकी नाजूक नाहीये." अनुजा काहीशी चिडली.
"हो गं. तुला सवय नाही इतकंच, पण नाजूकच आहेस तू." तो गालात हसत म्हणाला.
"नाहीय. चल. बस झाला ब्रेक." ती उठून उभी राहिली. राहुलने तिचा हात धरून तिला खाली बसवले. तिचा राग पाहून त्याला मजा वाटत होती.
"बस ग. मी दमलोय. पोहोचू आपण अर्ध्या तासात."
"तुझ्यासाठी थांबतेय मी."
"हो. थँक यू. आपली काळजी करणाऱ्यांसाठी थांबावंच जरा."
"म्हणजे?"
"तुझे मित्र सोडून गेले तुला. मघाशी पडता पडता वाचलीस, मी होतो म्हणून बरं. मला काळजी आहे तुझी."
"मी माझी काळजी घेऊ शकते." एकतर महेश तिला सोडून पुढे निघून गेल्याचं दुःख होतं आणि त्यात हा इतकं बोलतोय. एरवी हसरी असणारी अनुजा आज वैतागली होती.
"माहीत आहे. मला सांग, तुला किती भाषा येतात? कसं शिकतेस नवे शब्द. माझ्या तर लक्षात राहत नाही." राहुलने तिच्या आवडीच्या विषयावर बोलणे सुरु केले. सुरुवातीला दोन शब्दात उत्तर देणारी अनुजा लवकरच बोलायला लागली. ट्रेक संपेपर्यंत त्यांची बरीच गट्टी झाली. दोघांचे क्षेत्र वेगळे. त्यामुळे बरेच प्रश्न होते. आता सगळे डोंगराच्या माथ्यावर पोहोचले होते. फोटोसेशन सुरु होते. राहुलला फोटो काढायची प्रचंड हौस. अनुजाने त्याचे बरेच फोटो काढून दिले. गप्पा, मस्करी सुरू होती. ऊन वाढायला लागलं तसं त्यांनी उतरायला सुरवात केली. आता प्रिया आणि महेश काहीसे गप्प होते. अनुजाची टकळी सुरू होती. खाली पोहोचल्यावर सगळे दमले होते. एका ठिकाणी ब्रेकफास्ट करून परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान राहुलने अनुजाचा मोबाईल नंबर घेतला. घरी पोहोचल्यावर महेश नाराज होता आणि राहुल आनंदी.
"काय झाले रे तुला? प्रिया काही बोलली का?"
"हो. तेच परत परत. तू मित्र आहेस वगैरे."
"मी तर सांगितले होते तुला. पण बरं झालं प्रत्यक्ष बोललात दोघे. आता तिच्यावरून लक्ष कमी कर आणि तुझ्या कामाकडे वळव."
"काम करतोच ना मी. रिकामा थोडीच बसलोय??"
"अरे, कामात मन गुंतव असं म्हणतोय. अनुजा किती बोलते रे.."
"मला कधीच कोणीच भेटणार नाही का? प्रेमच नाही माझ्या आयुष्यात." महेश रडवेला झाला होता.
"आयुष्य अजून सुरू झालंय. काहीही बोलू नकोस. प्रेम असंही पटकन उडून जातं. भेटेल तुलाही कोणीतरी."
"तुझं चांगलंय लेका. अनुजा पटली तुला."
"एक तर मी कोणाला पटवत नसतो. दुसरं, आमची केवळ ओळख झाली आहे. अजून बोलू, भेटू आणि मग ठरवू. मलाही समजू दे की ती कशी आहे."
"इतका वेळ का वाया घालवतोय?"
"नंतर पश्चाताप होऊ नये म्हणून." राहुल हे शांतपणे आणि सहजतेने बोलला पण महेशला ते वाक्य झोंबलं. त्याला आधीचे रिलेशन आठवले. 'आपणही खूप घाई केली होती कदाचित. एका भेटीला प्रेम समजून. मग त्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागला. हा सांगतोय त्यात पॉईंट आहे.'
"मी जे सांगतोय ते अनुभवावरून. तुला पटणार नाहीच, पण विसरू नको. मी जे सांगतोय ते. आपल्या मनाची काळजी आपणच घ्यायची असते."
आजचे प्रियाचे ठाम आणि तुटक वागणे, राहुलने पाजळलेले ज्ञान, अनुजाची असह्य बडबड या सगळ्याचा विचार तो करत होता. 'कमाल असते ना नशिबाची आणि आपल्या स्वभावाची. इतकी बडबड प्रियाने केली असती तर मला आनंद झाला असता पण हवं ते सहज कधी मिळावं मला. प्रयत्न सोडू नये म्हणतात, पण राहुल म्हणतोय तेही पटतंय. काय करावं? अजून काही दिवस वाट पाहावी हे योग्य!'
क्रमशः