आपल्या आकाशगंगेबाहेरील पहिला बाह्यग्रह

युवा विवेक    17-Nov-2021   
Total Views |
आपल्या आकाशगंगेबाहेरील पहिला बाह्यग्रह

The first extrasolar plan
 
आपल्या आकाशगंगेपासून दूरवर स्थित असणाऱ्या अशा व्हर्पूल आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एखादा न्यूट्रॉन तारा अथवा कृष्णविवराच्या भोवती प्रदक्षिणा करणारा असा बाह्यग्रह वैज्ञानिकांनी शोधून काढलेला आहे. वैज्ञानिकांनी या बाह्यग्रहाचा शोध घेण्यासाठी क्ष-किरण प्रणालीवर चालणाऱ्या दुर्बिणीच्या आधारे मिळालेल्या माहितीचा उपयोग केलेला आहे. यासाठी वैज्ञानिकांनी चंद्रा क्ष-किरण दुर्बिण आणि नासाच्या XMM-Newton नावाच्या दुर्बिणीचा उपयोग केला आहे. वैज्ञानिकांनी M५१ , M १०१ आणि M१०४ या भागातील आकाशगंगांमधील सुमारे २०० तारका आणि त्यांच्या भोवती असणारा परिसर पिंजून काढला. तेव्हा त्यांना या सर्व भागांमध्ये मिळून फक्त एक बाह्यग्रह शोधण्यास यश आलेले आहे.
 
आतापर्यंत वैज्ञानिकांनी जे ४००० बाह्यग्रह शोधलेले आहेत, त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने दोन पद्धती वापरल्या आहेत. एक म्हणजे जेव्हा एखादा ग्रह हा त्याच्या पालक ताऱ्याभोवती फिरत असतो, तेव्हा त्या बाह्यग्रहाच्या वजन आणि गुरूत्वामुळे मुख्य तारा हासुद्धा थोडा फार भोवऱ्यासमान डळमळीत प्रकारे फिरतो. याची गती शोधून त्याच्या भोवती एखादा बाह्यग्रह असू शकेल का, हे शोधले जाते. दुसरी पद्धत म्हणजे ग्रहणपद्धत. एखाद्या ताऱ्यासमोरून असा बाह्यग्रह जातो, तेव्हा पृथ्वीवरून पाहताना या बाह्यग्रहामुळे मूळ ताऱ्याला ग्रहण लागते आणि त्यामुळे किंचित त्या मूळ ताऱ्याचा प्रकाश कमी होतो. त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना मूळ ताऱ्याची तेजस्विता कमी होते, यावरून या बाह्यग्रहाचे आकारमान आणि इतर गोष्टी ठरवल्या जातात.
 
वरील दोनही पद्धतींचा एक तोटा असा आहे की, या पद्धतींद्वारे सुमारे ३००० प्रकाशवर्षे इतक्याच दूरवर असणाऱ्या बह्याग्रहांचा शोध घेणे शक्य आहे; परंतु जसे आपल्याला ठाऊक आहे की, आपल्या आकाशगंगेचा पसारा हा सुमारे एक लक्ष प्रकाशवर्षे इतका जास्त असल्याने वरील दोन्ही पद्धतींमुळे फक्त आपल्याच आकाशगंगेतील बाह्यग्रह शोधण्यास या पद्धतींची मदत होते. या वेळी मात्र वैज्ञानिकांनी एका वेगळ्या पद्धतीचा वापर आपल्या आकाशगंगेबाहेरील बाह्यग्रह शोधण्यास केलेला आहे. जेव्हा एखादा श्वेत बटू अथवा न्यूट्रॉन तारा अथवा कृष्णविवर यांच्याभोवती बाह्यग्रह असतो, तेव्हा हे मूळ ताऱ्याचे प्रकार या बाह्यग्रहाचे वस्तुमान खेचतात आणि त्या वेळी प्रचंड प्रमाणात क्ष-किरणांचे उत्सर्जन होत असते. या वेळी वैज्ञानिकांनी अशाच क्ष-किरण दुर्बिणीद्वारे या ताऱ्याचे निरीक्षण केले आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हा बाह्यग्रह शोधून काढलेला आहे. मुख्य म्हणजे या पद्धतीने अतिशय दूरवर असणाऱ्या म्हणजेच आपल्या आकाशगंगेबाहेर असणाऱ्या बाह्यग्रहांचा शोध घेणे सहज शक्य झाले आहे.
 
या पद्धती जरी सहज सोप्या वाटत असल्या तरीसुद्धा या पद्धतीनेदेखील बाह्यग्रह शोधणे प्रचंड किचकट आणि वेळखाऊ काम आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीपासून असणारे या बाह्यग्रहांचे अंतर. हे अंतर अतिप्रचंड असल्याने एखादा बाह्यग्रह त्याच्या मूळ ताऱ्यासामोरून जातो तेव्हा त्या मूळ ताऱ्याची पृथ्वीवरून दिसणारी तेजस्विता कमी होते; परंतु या बाह्यग्रहांच्या कक्षेचा विचार केला असता असे पुन्हा होण्यास सुमारे ७० वर्षांचा कालावधीसुद्धा लागू शकतो त्यामुळे हे अतिशय कठीण काम आहे. कुणास ठाऊक कदाचित भविष्यात वेगवान रॉकेटमुळे आपल्याला आणखी जवळ जाऊन या ग्रहांचा अभ्यास करता येईल!
 
- अक्षय भिडे