शुक्र ग्रहावरील सक्रिय ज्वालामुखी

युवा विवेक    10-Nov-2021   
Total Views |

शुक्र ग्रहावरील सक्रिय ज्वालामुखी

 
Active volcanoes on Venus

अनेक वर्षे शुक्र ग्रहाचा अभ्यास करूनदेखील अनेक प्रश्न हे अनुत्तरितच राहिले आहेत. शुक्र ग्रह आपला शेजारी असून तो रहस्यमय आहे. त्याचा अभ्यास करणे तितकेच कठीण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शुक्रवार असणारे दाट वातावरण. शुक्र ग्रहावर अत्यंत दाट असे वातावरण असून, त्यावर सल्फ्युरिक अॅसिड ढग आहेत. तिथे याच अॅसिडचा पाऊससुद्धा पडतो. तरी पण या शुक्र ग्रहावर आतापर्यंत शोधण्यात आलेल्या सुमारे १६०० ज्वालामुखींपैकी एखादा तरी जीवित आहे का, हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.

नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, शुक्र ग्रहाभोवती परिक्रमा करत असणाऱ्या अवकाशयानांच्या अभ्यासावरून या ज्वालामुखींपैकी एखादा तरी, जीवित आहे का याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. या यानांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शुक्र ग्रहाच्या वातावरणातील बदल आणि शुक्रवार असणाऱ्या ज्वालामुखीमधून बाहेर पडणाऱ्या पदार्थांचे ओहोळ यांचा अभ्यास करून आणि त्यांच्यातील बदल लक्षात घेऊन या सक्रिय ज्वालामुखींचा शोध घेणे शक्य झाले आहे.

या सक्रिय ज्वालामुखींचा शोध इतका महत्त्वाचा का आहे, याचे एक सोपे उत्तर आहे. मानव जेव्हापासून अवकाशाच्या खोलीचा अभ्यास करू लागला आहे. तेव्हापासून मानवाला पडणारा मूलभूत प्रश्न हाच आहे की, या विश्वात आपण एकटेच आहोत काय?’ आणि याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. तर अशा सक्रिय ज्वालामुखींमधून बाहेर पडणाऱ्या रसायानांमधून फॉस्फिन नावाचे मूलद्रव्य तयार होते, जे सजीवांच्या उत्पत्तीसाठी महत्त्वाचे आहे. यासाठीच आपल्या सूर्यमालेतील विविध ग्रह आणि त्यांच्या उपग्रहांवर असे ज्वालामुखी शोधण्याचे काम सुरू आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात शुक्र ग्रहावर याच फॉस्फिन मूलद्रव्याचे अवशेष आढळून आलेले आहेत. याचाच अर्थ तेथे सक्रिय ज्वालामुखी आणि कदाचित त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन तयार झालेले फॉस्फिनसुद्धा उपलब्ध आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार वैज्ञानिकांनी अवकाशयान, टेलिस्कोप आणि इतर माहितीच्या आधारे इडीयम नावाच्या शुक्राच्या भागात एका सक्रिय ज्वालामुखीच्या हालचाली टिपल्या आहेत आणि याच माहितीच्या आधारे त्याला पाठिंबा देखील दिला आहे. या सर्व संशोधनाच्या आधारे एवढेच सिद्ध झाले आहे की, शुक्र ग्रहावर मिळणाऱ्या फॉस्फिनचे प्रमुख उत्पत्तिस्थान सक्रिय ज्वालामुखींमध्ये दडले आहे. सध्या शुक्र ग्रहावर वैज्ञानिक अधिक जास्त संशोधन करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतानेदेखील आपले शुक्रयान नावाचे अवकाश यान घोषित केलेले आहे. या सर्व महतीच्या आधारे शुक्र ग्रहाप्रमाणेच सौरमालेतील इतर ग्रह-उपग्रहांवरसुद्धा अशीच जीवपोषक मूलद्रव्ये शोधण्याचे काम वैज्ञानिक करीत आहेत. येत्या काही काळात आपल्याला याचसंबंधी अधिक रंजक माहिती आणि कदाचित नवीन प्रगत जीवसृष्टीदेखील आढळल्याचे कळू शकेल.

- अक्षय भिडे