न्यूट्रॉन तारे : अवकाशीय ज्ञानाची खाण
आपणास ठाऊक असेलच की, आपण सर्व जण हे अवकाशातील घडामोडींमधून उत्पन्न झालेल्या घटकांपासून तयार झालेले आहोत. जसे की आपल्या शरीतर असणारे लोह, कॅल्शियम इत्यादी घटकसुद्धा अवकाशीय घडामोडींमधून पुढे आलेले आहेत. अवकाशात असणारे आणि सामान्यपणे आढळणारे तारे जसे की, आपला सूर्य, हे मानवाच्या शरीरात असणारे मूलभूत घटक पदार्थ तयार करत असतात. जसे की लोह, कार्बन, ऑक्सिजन, निऑन इत्यादी. परंतु, जड असणारे असे मूलभूत पदार्थ जसे की, प्लॅटिनम, सोने, चांदी असे घटक निर्माण करण्यासाठी अवकाशात असणाऱ्या प्रचंड मोठ्या न्यूट्रॉन ताऱ्यांची टक्कर व्हावी लागते. त्याचा परिमाण म्हणूनच ही जड मूलभूत द्रव्ये तयार होतात.
न्यूट्रॉन तारे फक्त मुलभूत द्रव्येच तयार करतात असे नसून, भौतिकशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा अवकाशीय वस्तू आहेत. कारण या ताऱ्यांच्या बाबतीत भौतिकशास्त्राच्या पलीकडे जाणाऱ्या घटना घडत असतात. या प्रकारात मोडणारे तारे हे त्यांच्या टकरीच्या दरम्यान गुरुत्वाकर्षणसुद्धा हादरवून टाकतात. न्यूट्रॉन ताऱ्यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर, या ताऱ्यांवर असणारे चुंबकीय क्षेत्रसुद्धा सामान्य भौतिकशास्त्राच्या नियमांच्या पलीकडे जाणारे असते. वैज्ञानिक म्हणतात ज्याप्रमाणे कृष्णविवर पृथ्वीवरून दिसू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अभ्यास करणे तितकेच कठीण आहे. त्याच्या उलट न्यूट्रॉन ताऱ्यांचे निरीक्षण करणे सहज शक्य आहे. त्यामुळेच या ताऱ्यांचे निरीक्षण करून विश्वउत्पत्तीबद्दल अधिकाधिक माहिती मिळवता येऊ शकते.
प्रत्यक्ष निरीक्षण करण्यापूर्वीच न्यूट्रॉन ताऱ्यांचे भाकीत १९३४ साली करण्यात आले होते. १९३४ साली वॉल्टर आणि फ्रित्झ या संशोधकांनी असे प्रस्तुत केले की, अवकाशीय महाविस्फोटाच्या दरम्यान आपल्या अवकाश गंगेच्या बाहेरून प्रचंड प्रमाणात कॉस्मिक किरण येत होते आणि या महाविस्फोटांच्या कारणामुळे त्या ताऱ्यांचे प्रचंड अशा न्यूट्रॉन ताऱ्यांमध्ये रूपांतर झालेले असावे. त्यानंतर प्रथम न्यूट्रॉन ताऱ्याचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यासाठी पुढे सुमारे ३० वर्षे लोटली. बर्नेल हा वैज्ञानिक रेडिओ दुर्बिणीच्या साह्याने अभ्यास करीत असताना त्याने वारंवारता असणाऱ्या एका सिग्नलचे निरीक्षण केले. प्रथमतर त्याला हा सिग्नल परग्रहवासीयांकडून आलेला आहे असेच वाटले परंतु नंतर त्याच्या लक्षात आले की हा सिग्नल परग्रह वासियांकडून नसून हा सिग्नल अति दूरवर असणाऱ्या एका न्यूट्रॉन तार्याकडून येत आहे. अशा प्रकारे १९६७ साली पहिला न्यूट्रॉन तर शोधण्यात वैज्ञानिकांना यश मिळाले. न्यूट्रॉन तारे आकाराने प्रचंड लहान असतात त्यांचा आकार साधारण २० किमी इतका लहान असतो परंतु, त्यांचे घनत्व अतिजास्त असते. साधारण एवढ्या २० किमी आकाराच्या न्यूट्रॉन ताऱ्यात आपल्या सूर्याच्या आकारा एवढा पदार्थ मावू शकतो. साधारण साखरेच्या एका लहान दाण्याच्या आकाराच्या न्यूट्रॉन ताऱ्याचे वजन सुमारे एक कोटी टन असते. तर मंडळी, असा हा न्यूट्रॉन तारा. तो खऱ्या अर्थाने वैज्ञानिकांसाठी ज्ञानाचा खजिना आहे. कारण या प्रकारातील ताऱ्यांच्या अभ्यासाने विश्वाची अनेक गूढ उकलली गेली आहेत आणि येत्या काळातसुद्धा कदाचित आपण एखाद्या न्यूट्रॉन ताऱ्याचा खूप जवळून अभ्यास करू शकू.