तू अवघ्या आशांची पूर्ती

युवा विवेक    15-Oct-2021   
Total Views |
तू अवघ्या आशांची पूर्ती
 

chalin titkya wata g_1&nb
 
भारतीय संस्कृतीने स्त्रीला कायमच शक्तीचा दर्जा दिला आहे. ती पार्वती आहे, ती सीता आहे, अहल्या आहे, यशोदा आहे, कुंती आहे, राधा आहे, ती गार्गी आहे, मैत्रेयी आहे, ती शिवबाची जिजाऊ आहे, ती अब्बक्का आहे, चेन्नम्मा आहे, झाशीची लक्ष्मी आहे, मावळची अहिल्या आहे. ती सावित्री आहे, आनंदी आहे, इंदिरा आहे, कल्पना आहे, माधुरी आहे, मेरी आहे आणि ती आहे मिताली व स्मृतीदेखील. स्त्रीत्वाच्या वेगवेगळ्या छटा तिने आपल्या कर्तृत्वातून प्रकट केल्या आहे. शतकानुशतके समाजाच्या उद्धारासाठी स्वतःचं अस्तित्व पणाला लावलं आहे. देशाचं नाव जगाच्या पाठीवर कायम उंचावलं आहे. तिचा गौरव करण्याचा काळ म्हणजे नवरात्र.
पुरुषप्रधान आणि मागास संस्कृती म्हणून पाश्चात्य जगात भारताची यथेच्छ हेटाळणी केली गेली, आजही केली जाते. परंतु वरील यादी पाहिली तर गेली अनेक शतके भारतीय स्त्रियांच्या प्रगतीचा आणि कर्तृत्वाचा आलेख केवळ उंचावत गेला असल्याचंच आपल्या लक्षात येते. भटक्या टोळ्या नदीकाठी स्थिरावू लागल्या तेव्हा पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून शेतीमध्ये राबणारी स्त्री ही खरी क्रांतिकारक मानली पाहिजे. शेतीचा शोधही मुळात स्त्रीनेच लावला असं म्हटलं जातं. त्यातही तिच्या सृजनाला धुमारे फुटले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बहिणाबाई चौधरींनी आपल्या ओव्यांतून समाजाच्या मनीचे भावच प्रकटले.
ऊन वार्‍याशी खेळता एका एका कोंबातून, पर्गटले दोन पानं, जसे हात जोडीसन !
टाळ्या वाजवती पानं, दंग देवाच्या भजनी, जसे करती कारोन्या (करुणा), होऊ दे रे आबादानी !
त्या आद्य शतकरी स्त्रीपासून सुरू झालेला हा प्रवास बहिणाबाईंच्या वाटेवरून पुढे जात आज देशी, मूलभूत बियाण्यांचं रक्षण करणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरेंपर्यंत येऊन पोहोचला आहे.
स्वतः सैनिकी प्रशिक्षण घेतलेल्या व मराठ्यांचं राज्य प्रस्थापित व्हावं म्हणून शिवबाला घडविणाऱ्या जिजाऊ, इंग्रजांना ठणकावणारी राणी लक्ष्मीबाई, ब्रिटिशांच्या इस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात आंदोलन करणारी चेन्नम्मा, सोळाव्या शतकात पोर्तुगीजांशी लढणारी अबक्का यांनी या देशाच्या, मातीच्या रक्षणासाठी गाजवलेलं कर्तृत्व अनन्यसाधारण आहे. ‘त्वं हि दुर्गा दशप्रहरण धारिणी’ असं हे स्त्रीचं रूप अत्यंत सामर्थ्याने हाताळणाऱ्या स्त्रीशक्तीला प्रणाम. आजच्या काळातही लेफ्टनंट डॉ. माधुरी कानिटकरांनी महिला संरक्षण क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केलं आहे. आता तर महिलांना सैन्यात प्रवेश घेता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने 'एनडीए'मध्ये महिलांना प्रवेश घेण्यासाठी परीक्षेला बसण्यास परवानगी दिली आहे.
आरोग्य क्षेत्रातील आनंदीबाई, रखमाबाई, कदंबिनी गांगुली यांच्यापासून सुरू झालेला स्त्रियांचा प्रवास हा अत्यंत कठीण, तरीही रोमहर्षक असा राहिला आहे. ‘न भूतो’ अशा कोरोना महामारीच्या काळात तर आरोग्य व सेवाक्षेत्रात महिलांनी कोव्हिडयोद्धा डॉक्टर्स, नर्सेस, मदतनीस मावश्या, स्वच्छता कर्मचारी यांनी गाजवलेलं कर्तृत्व शब्दांच्या पलिकडलं आहे. स्वतःच्या घरापासून, मुलाबाळांपासून दूर राहून समर्पित वृत्तीने रुग्णसेवा करण्याचा वसा या कोविडयोध्यांनी पूर्णत्वास नेला म्हणूनच आज आपण संसर्गाच्या या टप्प्यातही सुरक्षित राहू शकलो. यात कित्येकींनी आपले प्राण गमावले कित्येकींनी त्यांचे आप्त. पण सेवेचा निश्चय मात्र ढळला नाही.
परकीय आक्रमणापूर्वीच्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार पुरुषांच्या बरोबरीचा होता. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा अशा विदुषींनी वेदाध्ययनावर स्वतःचा अधिकार सिद्ध केला होता. आद्य शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांच्या वादविवादात मंडनमिश्र यांची पत्नी भारती न्यायकर्ती होती. त्यावरून तिची धर्मशास्त्र, पूर्व व उत्तर मीमांसा, वेदान्त याबद्दलची खोली कळून येते. पुढे राजमाता जिजाबाई, अहल्याबाई होळकर यांनीदेखील सर्वप्रकारचं शिक्षण घेतलं होतं व त्याचा उपयोग राज्यकारभार चालवताना करून घेतला होता.
माळव्याच्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी तर उत्तम प्रशासक कसा असावा याचा वस्तुपाठच घालून दिला. मुघली प्रभावाने उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, तेथे वर्षासनाची सोय लावली, औद्योगिकतेचा पाया रचला, महेश्वरी कापडांच्या विणकरांना व्यावसायिक अधिष्ठान मिळवून दिलं. आजही मध्य प्रदेशातील माणसांच्या मनात अहिल्याबाईंविषयी अभिमान आणि मनात एक हळवा कोपरा निरंतर जागृत आहे.
आधुनिक कालखंडात सावित्रीबाई फुले, रमाबाई कानडे, काशिबाई कानिटकर यांनीही प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण सुरू ठेवलं आणि पुढील पिढ्यांनाही सुशिक्षित केलं. ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांच्यासारख्या शिक्षणकर्त्या महिलांनी प्रयोगशील शिक्षणाचा पाया वनवासी क्षेत्रांमध्येही रचला.
गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये भारतीय महिला क्रीडापटूंकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे. जागतिक स्तरावर काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय महिलांची कामगिरी ही समाधानकारक म्हणावी अशी नव्हती; पण गेल्या दशकापासून या क्षेत्रात महिलांनी आपला लक्षणीय आणि अनुकरणीय सहभाग राखला आहे. पी.टी. उषा, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, मेरी कोम, अंजली भागवत, करनाम मल्लेश्वरी, फोगट भगिनी, साक्षी मलिक, मीराबाई चानू, लोनविना बोरगोहाईन, दीपिका कुमारी, राही सरनोबत यांच्यासह मिताली राज आणि स्मृती मंधानासोबत संपूर्ण भारतीय क्रिकेट चमू या सगळ्यांनीच ऑलिम्पिक, विश्वचषक, विम्बल्डन, राष्ट्रकुल, आशियायी स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भारताचं नाव उंचावलं आहे. भारतात मुलींनाही क्रीडाक्षेत्रात समान संधी मिळत आहेत, याचंच हे द्योतक आहे.
जग बदलतंय, तुम्ही कधी बदलणार असा प्रश्न अनेक वर्षं महिलांना विचारला जात असे. आता मात्र परिस्थिती लक्षणीय स्वरुपात बदलत चालली आहे. याची नोंद जागतिक स्तरावर घेतली जात आहे. केवळ उपरोक्त क्षेत्रंच नव्हेत तर अर्थ, राजकारण, संशोधन, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत महिलांचं योगदान अनन्यसाधारण आहे.
तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर
पूर्णत्वाने नेई
हे मायभवानीचं सुधीर मोघे यांनी केलेलं वर्णन आज प्रत्यक्षात अनुभवायला मिळतंय. प्रगतीचा हा आलेख असाच उंचावत राहो हीच या नवरात्रीच्या निमित्ताने सदिच्छा.
- मृदुला राजवाडे