यज्ञ – भाग ७

युवा विवेक    01-Oct-2021   
Total Views |

यज्ञ भाग ७


Sacrifice_1  H  

महेश प्रियामध्ये गुंतत होता आणि अनुजा महेशमध्ये. अनुजा आणि महेश आता बऱ्याचदा प्रियाबद्दल बोलायचे. महेशशी जवळीक साधण्याच्या नादात अनुजा त्यांच्या मैत्रीबद्दल आणि प्रियाबद्दल भरभरून बोलायची. कधीकधी नील आणि प्रियाच्या नात्याबद्दल नाराजी दाखवताना महेशला तिच्या पार्टनरबद्दलच्या अपेक्षा समजतील असे संदर्भ द्यायची. महेशला या सगळ्याची कल्पना नव्हती. इकडे प्रिया नीलपासून दुरावत होती, पण तिने मौन राखायचे ठरवले होते. महेश तर नाहीच, पण अनुजाकडेही आपले रडगाणे गायचे नाही असा तिचा निश्चय होता, पण लवकरच या निश्चयाला तडा गेला.

एक दिवस तिचे आणि नीलचे भांडण झाले. नेहमी लहानसहान वाद व्हायचे, पण आता खरंच मोठे भांडण होते. ती रागारागात कॉलेजला निघून आली आणि नील दोन दिवसाच्या टूरसाठी निघून गेला. प्रिया स्टाफरूममध्ये होती. आज परत महेशने चौकशी सुरू केली. नीलचे नाव निघताच ती परत भावनाविवश झाली पण तिने स्वतःला सावरले. महेशलाही एक संधी वाटली. त्याने खोदून-खोदून विचारल्यावर तिने भांडणाबद्दल सांगितले. तिचा मूड ठीक व्हावा म्हणून तो तिला कॅफेमध्ये घेऊन गेला. त्यानंतर त्यांचे प्लॅन्स ठरत गेले आणि प्रिया महेशसोबत मूव्ही पाहून घरी परतली. किती तरी दिवसांनी तिचा आजचा दिवस छान गेला. रात्री नीलचा फोन आल्यावर तिचे बोलण्याकडे लक्ष नव्हते, पण त्या भरात तिने त्याला माफ केले. 'क्वालिटी टाइम तरी काय असतो? आता आज काय मी फार मोठा प्लॅन केला नाही, पण ती काळजी, सोबत हवी असते. आपल्यात गुंतलेली व्यक्ती हवी असते. महेश असाच आहे. नीलही आधी असाच होता. नको, त्याचा विषयच नको.'

***********

महेशला आज आभाळ ठेंगणे झाले होते. जिच्यावर जीव जडला तिच्यासोबत इतका वेळ रहायला मिळालं. हे मंतरलेले क्षण असतात. त्याचा आज गझल ऐकायचा मूड झाला. तितक्यात राहुल त्याला भेटायला आला.

"काय सर? कुठे बिझी आहात? नुसतेच कम्युनिकेशन शिकवता वाटतं तुम्ही."

"अरे मुव्हीला गेलो होतो, म्हणून उशीर झाला."

"अरे वा? कोणा सोबत?"

"मैत्रीण आहे, म्हणजे कलीग खरं तर." हे बोलतांना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. राहुलला ते समजलं. महेशच्या मित्रमंडळींची नावे त्याला माहित होती. महेशच्या स्टेटसमध्ये त्याने फोटोज पाहिले होते.

"अनुजा? छान आहे ती."

"ती नाही रे. प्रिया.."

" प्रिया? ती तर मॅरीड आहे ना."

"हो, पण तिचा नवरा भांडतो तिच्याशी."

"तुला सांगितलं तिने?"

"हो. नेहमी सांगते, लग्न बोरिंग झालंय. कदर नाही त्याला."

"आणि म्हणून तुला वाटतंय की तुला चान्स आहे?"

या प्रश्नाने महेश बावरला. राहुलने पटकन ओळखले होते आणि तो सिरियसली बोलत होता.

"नाही. म्हणजे..मी फक्त मित्र आहे."

"असं ती मानत असेल. तू मानतोस का?"

महेशला बोलायला सुचेना. राहुल समजावण्याच्या सुरात म्हणाला,

"हे बघ. हे नवरा-बायको, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडची भांडणे होत असतात. मोनोटोनस आयुष्य आहेच, पण याचा अर्थ त्यांचे एकमेकांवर प्रेम नाही असे होत नाही. मुली भावनिक असतात. त्यांना फक्त मेंटल सपोर्ट हवा असतो बऱ्याचदा. तू त्याला प्रेम समजू नको."

"मी कशाला समजू? मलाही कळतं. मी फक्त मित्र आहे." आता तो थोडा चिडला.

"मग ठीक आहे. नाही तर मुलांना वाटतं की प्रेम आहे मग रडत बसतात, चिडतात." राहुलने बाजू सावरून धरली पण त्याचा महेशच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तो काही करूही शकला नसता. शिवाय आपण कुठे यांच्या भानगडीत पडा हा विचार करून त्याने विषय बदलला. त्यानंतर दोघे बोलत बसले. महेशच्या डोक्यात मात्र राहुलची वाक्ये घुमत होती. 'खरंच असं असेल? तिला मी आवडत नाही? माझी काय अपेक्षाही नाही तिच्याकडून. हा असं का बोलला? जळतो माझ्यावर. मी इतका साधा असून, मला भाव मिळतो आणि हा इतका हँडसम मुलगा सिंगल! यापुढे काही सांगायचं नाही.'

**********

महिनाभर प्रिया आणि महेश अजून जवळ आले. कॉलेजमध्ये बोलणे, मेसेजवर बोलणे सतत सुरू असायचे. महेश आता प्रियामध्ये पूर्णपणे गुंतला होता. अनुजाची त्याला बऱ्याचदा अडचण वाटायची. अनुजाला आता त्या दोघांची जवळीक खटकायला लागली होती. सुरवातीच्या काळात तिने दुर्लक्ष केले. नंतर तिला महेशचा राग आला आणि आता प्रियाची काळजी वाटू लागली. प्रियाला तिने याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने दुर्लक्ष केले. या सगळ्याचा परिणाम महेशच्या कामावर होत होता. शिकवताना बारीकसारीक चुका व्हायच्या, डेडला मिस व्हायच्या. त्यासाठी अनुजा मुकाट्याने मदत करायची. आता तिलाही याचा राग येऊ लागला आणि तिने महेशला टाळणे सुरू केले. प्रिया मात्र आता खुश असायची. ती चिडत नाही, वैतागत नाही म्हणून नीलला कामावर लक्ष केंद्रित करता येत होते. एका महिन्यात सगळेच चित्र पालटले होते.

क्रमशः